एखाद्याने वापरलेल्या अप शब्दाचा त्रास झाल्यास तो त्रास कसा शांत करावा?
मेराज बागवान
आयुष्यात सगळेच दिवस आनंदात ,सुखात जात नाहीत.बरेच वेळा वाईट वेळ देखील अनुभवावी लागते.कधी कुठल्यातरी गोष्टींमुळे मन दुःखी होते तर कधी कोणत्यातरी व्यक्तीसोबत वाद-विवाद होतात.जेव्हा अशी काही संकटे तुमच्यावर येतात तेव्हा त्रास होणे स्वभाविक आहे.जेव्हा एखाद्या माणसाशी तुमचे भांडण होते किंवा कोणीतरी तुम्हाला काही वाईट,अपशब्द वापरते तेव्हा मात्र थोडा जास्त त्रास होतो.मग मानसिक शांतता बिघडते.
मग अशा वेळी काय केले पाहिजे? कारण फक्त मला त्रास होतोय,मला तो असे म्हणाला त्यामुळे खूप वाईट वाटत आहे,असे फक्त बोलूम काहीच उपयोग नसतो.ह्याऐवजी ह्या त्रासातून तुम्ही कसे बाहेर पडाल हे पाहणे आणि त्यासाठी पावले उचलणे गरजेचे असते.ह्या लेखात आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत ज्या तुम्हांला त्रासातून बाहेर काढण्यासाठी मदत करतील आणि तुम्हाला मानसिक शांतता लाभेल.
१) शांत राहावे – जेव्हा कोणी काही कारणास्तव अपशब्द वापरतो तेव्हा तुम्ही देखील अनेकदा काही ना काही प्रतिउत्तर देतात.कधी देत ही नाहीत.पण त्रास मात्र तुम्हाला नक्की होतो.मग अशा वेळी मन एकदम शांत करावे.शांत डोक्याने विचात करावा.नक्की ती व्यक्ती असे का बोलली ह्याचा सर्वांगाने विचार करावा. असा विचार केल्यानंतर तुम्हाला हळूहळू लक्षात येऊ लागेल की असे का घडले.आणि मग आता तुम्ही काय केले पाहिजे हे तुम्हाला स्पष्ट होईल. आणि तुमचा त्रास कमी होऊ लागेल.
२) आत्मपरीक्षण – कधी तरी कोणी तरी तुम्हाला अपशब्द बोलते आणि तुम्ही रागात जातात किंवा अति भावनिक होतात.पण ही वेळ भावनिक होऊन बसण्याची नसते आणि रडत बसण्याची तर अजिबात नसते.जेव्हा तुमच्या बाबतीत असे काही घडले,तर त्या घटनेनंतर तुम्ही सर्वप्रथम आत्मपरीक्षण केले पाहिजे.कारण टाळी एका हाताने वाजत नाही.समोरची व्यक्ती उगाच अपशब्द वापरत नाही. काही माणसे अपवाद असतीलही. पण शक्यतो कोणी कोणाला उगाच काही बोलत नाही.म्हणूनच तुम्ही आत्मपरीक्षण केले पाहीजे की ,माझं काय चुकलं,मी काही वेगळे तर वागत नाही ना,मी माझ्यात काय बदल पाहिजेत.माझा दृष्टिकोन कसा आहे.अशा काही गोष्टी तुम्ही अभ्यासल्या की तुम्हाला सर्व काही स्पष्ट होईल आणि तुमचा त्रास कमी होऊ लागेल आणि तुम्ही काही कालांतराने ह्या त्रासातून मुक्त व्हाल.
३) मन मोकळे करणे – कोणीतरी मला बोलले असे सतत सर्वांकडे बोलत बसण्यापेक्षा कोणाकडे तरी मन मोकळे केले पाहिजे.तुम्हाला कोणी वाईट बोलले तरी सतत तेच मनात धरून ठेवू नका.कोणाकडे तरी व्यक्त व्हा.प्रामाणिकपणे हे काही झाले आहे ते त्या व्यक्तीला सांगा.ह्यातून तुम्हाला नवीन काहीतरी मार्ग सापडेल आणि तुम्ही त्रासातून बाहेर येऊ शकाल.
४) स्वतःमध्ये बदल करणे – दुसर्याने बदलायला हवे असे प्रत्येकाला वाटत असते.पण स्वतःला बदलायला प्रत्येकजण तयार असतोच असे नाही.मग जेव्हा तुम्ही अपशब्द कोणी तुम्हाला वापरले म्हणून त्रासात असाल तर त्याक्षणी तुम्ही स्वतःला बदलून घेतले पाहिजेत.स्वतःच्या चुका स्वीकारून त्या दुरुस्त केल्या पाहिजेत आणि त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही असे स्वतःला वचन दिले पाहिजे.ह्यासाठी तुम्हाला अहंकार बाजूला ठेवावा लागेल आणि त्यानंतरच तुम्ही स्वतःला बदलू शकाल.
५) एखाद्या शांत ठिकाणी जाणे – जेव्हा तुम्ही असा त्रास अनुभवत असाल तेव्हा थोडा काळ तुम्ही कोणत्यातरी शांत ठिकाणी जा. थोडा स्वतःला सगळी कामे बाजूला ठेवून वेळ द्या. स्वतःच्या मनाला शांत करा.निघून जाणे म्हणजे माघार घेणे नाही, तर स्वतःला पुन्हा ‘Recharge’ करणे होय. शांत ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टींचा अंदाज येऊ लागेल.विचारसरणी योग्य राहील आणि तुम्ही तणावमुक्त होऊ शकाल.
६) छंद जोपासणे – अपशब्द विसरून जाण्यासाठी आणि त्यामुळे झालेला त्रास मोकळा करण्यासाठी छंद खूप मोलाची मदत करतात.स्वतःच्या आवडत्या गोष्टींमध्ये थोडा काळ व्यतीत केल्यानंतर माणूस रिफ्रेश होतो आणि त्रास देखील कमी होतो.
७) ध्यानधारणा/अध्यात्म/देवपूजा – तुमची ह्या गोष्टींवर श्रद्धा असेल ती गोष्ट करा.मग ते कर्मकांड असू शकते,अध्यात्म असू शकते किंवा मग ध्यानधारणा.काहीही करा पण मनापासून आणि श्रद्धेने करा.ह्या तीनही गोष्टी तुम्हाला त्रासातून मुक्ती मिळवून देतील हे नक्की.
अशा काही गोष्टी तुम्ही करू शकतात ज्यामुळे तुमचा त्रास कमी होईल,तुम्ही त्या त्रासातून बाहेर येऊ शकाल.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,जे काही होते ते चांगल्यापसाठीच असते.काही गोष्टी आपण स्वीकारत नसतो किंवा स्वतःमध्ये काही बदल घडवत नसतो ,जे की गरजेचे असते.मग अशा काही घटना,गोष्टी घडतात ज्या आपल्याला बदल करायला भाग पाडतात.म्हणून जेव्हा कधी कोणती नकारात्मक गोष्ट घडते तेव्हा प्रथम त्या गोष्टीची सकारात्मक बाजू पाहायला शिका.आणि त्यानुसार स्वतःमध्ये बदल करा.कारण कोणतीच गोष्ट कायम नसते,फक्त ‘बदल’ कायम असतो, हा निसर्गाचाच नियम आहे.
काळजी घ्या…
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Very nice
Nice
लेख आवडला