Skip to content

एखाद्याला ठणठणीत जाब विचारायचा आहे, पण जमत नाही.. ही स्थिती अशी हाताळा!

एखाद्याला ठणठणीत जाब विचारायचा आहे, पण जमत नाही.. ही स्थिती अशी हाताळा!


 अपर्णा कुलकर्णी


ऋतुजाच्या लग्नाला जेमतेम पाच सहा वर्षे पूर्ण झाली होती. तिला एक गोंडस आणि खूपच हुशार मुलगा होता रचीत. तिचा नवरा एका कॉलेजमध्ये एक्झाम विभागात काम करत होता. नुकत्याच घराच्या वाटण्या झाल्यामुळे वाटणीनुसार आठ दहा लाख रुपये ऋतुजाच्या नवऱ्याला म्हणजेच शशिकांतला मिळाले होते. ऋतुजा उच्चशिक्षित होती पण रचीतला सांभाळणारे कोणीच नव्हते आणि पाळणा घरात ठेवून तिथेच सगळा पगार घालवण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. तसंही रचित खूपच अवखळ आणि चंचल सभवाचा होता.

शिवाय आईला सोडून तो कधीच राहिला नव्हता. त्यामुळे ऋतुजा घरातच बसून होती. शशिकांत आणि ऋतुजामध्ये फारसे काही पटत नव्हते. त्यांच्यात अनेक मतभेद होते. कोणत्याच गोष्टीत त्यांचे एकमत होत नसे. शेवटी ऋतुजा दुर्लक्ष करायला लागली होती.

शशिकांतच्या डोक्यात मात्र मिळालेल्या पैशातून घर घ्यायचं चालू होत. तसा विचार त्याने नाईलाजानं ऋतुजा जवळ बोलून दाखवला होता, पण ऋतुजाचा घर घ्यायला स्पष्ट नकार होता त्याला कारणही तशीच होती. एकतर शशिकांतचा पगार अगदीच जेमतेम होता, त्यावर लोन मिळणे कठीण होते, त्यात रचितचे शिक्षण सुरू होणार होते, पुण्यासारख्या ठिकाणी मुलांना शिकवणे खूपच कठीण गोष्ट होती आणि रचितचे शिक्षण ही तितकीच महत्त्वाची गोष्ट होती.

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे शशिकांत व्यवहारासाठी अतिशय नालायक माणूस होता. आजवर त्याने कधीच कोणताच व्यवहार सुरळीत पार पाडला नव्हता आणि कोणतीच गोष्ट खरी ऋतुजाला सांगितली नव्हती पण कुठून ना कुठून ती ऋतुजाच्या कानावर पडलीच होती. त्यामुळे त्याचा पगार किती आहे हे ही त्याने कधी ऋतुजाल कळू दिले नव्हते मग तो बँकेचे व्यवहार पूर्ण करेल यावर तिचा विश्वास नव्हता.

या उलट मिळालेल्या पैशातून काही पैसे रचितच्या नावे टाकूया आणि काही पैसे एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी वापर करुया असे तिला वाटत होते. कारण ऋतुजाला नोकरी ऐवजी स्वतःचा छोटा का होईना व्यवसाय करायचा होता. पण नेहमीप्रमाणे त्यांच्यात वादच झाले. शशिकांतने ऋतुजाचे काही ऐकून घेतले नाही आणि घर घेतले.

बघता बघता त्यांना घरात जाऊन वर्ष झाले पण त्या काळात रचितची शाळेची फी, घराचा हप्ता आणि बाकी घरखर्च शशिकांतला झेपेना. त्या दरम्यान दोनदा बँकेचे लोक घरापर्यंत आले. दुसऱ्या वेळी त्या लोकांनी सांगितले आता हप्ता भरला नाही तर लीगल अँक्शन घेतली जाईल. ऋतुजाने तसे विचारले तर शशिकांत सरळ खोटं बोलून रिकामा झाला. मी बघतो सगळं अस काही होणार नाही म्हणाला. पण पुन्हा बँकेतून ऋतुजाला फोन येऊ लागले मग मात्र ती खूप चिडली.

आज काहीही करून शशिकांतला प्रश्न विचारायचेच हे तिने ठरवले होते पण त्याचा काही उपयोग होणार नव्हता. कारण शशिकांत उलट सुलट उत्तरे देऊन वेळ मारून नेणार याची तिला खात्री होती. शिवाय छातीठोक पण खोटं बोलण्यात त्याचा हात कोणीच धरू शकत नव्हते. त्यामुळे काय करावे हा विचार ती करत होती. तिच्या मनातील गोंधळ काही केल्या कमी होत नव्हता, उलट तो वाढतच होता. माहेरी निघून जावे तर तिथेही कड लागणार नव्हती आणि शशिकांत पासून वेगळे रहावे तर ती स्वतः आर्थिक दृष्ट्या तेवढी सक्षम नव्हती. मग आता काय पर्याय होता तिच्याकडे ??

तर आहे ती परिस्थिती जमेल तितक्या शांतपने तटस्थ होऊन बघत रहाणे हा एकच पर्याय होता ऋतुजा पुढे. पण शशिकांतच्या अर्धवट आणि चोरट्या व्यवहारामुळे तिला आणि पर्यायाने तिच्या मुलाला रस्त्यावर येण्याची वेळ आली होती. अशा परिस्थितीत गप्प कसे राहू शकणार होती ती. तिने मनाचा निश्चय करत शांतपणे शशिकांत समोर विषय काढायचा निर्णय घेतलाच.

घरी आल्यावर शशिकांतचा मुड बघून ऋतुजा शांतपने बोलायला गेली खरी पण त्याच्या नेहमीच्या थापा मारण्याने त्यांच्यात वाद झालेच. शेवटी पदरात निराशा घेऊन ऋतुजा गप्प झाली.

मित्रांनो असे प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात थोड्या फार फरकाने येतात. खरतर अशा वेळी कोणतेही सल्ले, उपदेश उपयोगी पडत नाहीत आणि कोणी ते द्यायलाही जाऊ नये. कारण मनस्थिती नसतेच काही समजून घेण्याची. सांगणं सोपं आहे पण आमलात आणणे तितकेच कठीण त्यामुळे तुम्हाला सांगायला काय जातंय असेच बोलेल कोणीही आणि ते खरं ही आहेच. अगदीच मान्य आहे मला. पण अशा वेळी जरा शांतपने विचार केलात तर लक्षात येईल की त्रागा करून, अती विचार करून स्वतःचे डोके दुखावून घेण्यात, आपला राग कोणावर तरी काढण्यात, परिस्थितीला,नशिबाला दोष देण्यात, सतत आपले दुःख लोकांना सांगत बसण्यात काहीच अर्थ नाही. तर अशी परिस्थिती हाताळण्यासाठी काही गोष्टी प्रयत्न पूर्वक करा.

– सगळ्यात आधी आपण ज्याला जाब विचारणार आहोत त्याला विचारण्याआधी आपले काही चुकत तर नाही ना ?? किंवा या परिस्थितीला आपण कुठे जबाबदार नाही ना ?? याचा विचार करावा. कारण कधी कधी आपल्याही नकळत आपल्याकडून काही चुका घडून जातात आणि समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याने आपल्या ते लक्षात येते.

– जर याचे उत्तर नाही असेल तर मग आपले मुद्दे शांतपने शक्य तितक्या नॉर्मल आवाजात मांडायला लागा.

– बोला कारण बोलल्याने मन मोकळे होते आणि आतल्या आत कुढत रहाणे बंद होते.

– बोलून मार्ग निघाला तर उत्तमच. पण त्यासाठी दोघांचे व्यवहार एकमेकांसमोर अगदीच transparant हवेत. तेच शशिकांत आणि ऋतुजामधे नसल्याने अडचण निर्माण झाली.

– संभाव्य परिस्थितीचा शांतपने विचार करावा अगदी दोन्ही बाजूंनी. असे झाले तर काय होईल आणि नाही झाले तर काय होईल ??

– दोन्ही बाजूंनी विचार केल्यावर त्या दृष्टीने मनाची तयारी ठेवावी.

– समोर कसलीही परिस्थिती आली तरीही आपण मानसिक,आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या खूप सक्षम असायला हवे. इतके की कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनाचा तोल ढळता कामा नये.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!