एखाद्याला प्रेम देण्यापूर्वी त्यातलं काही स्वतःसाठी राखून ठेवा.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
प्रेम, एक अशी भावना जी दोन माणसांना जवळ आणते. जीवन आनंदी बनवते. सर्व कसं छान, सुंदर वाटायला लागत. आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे जी आपल्या हक्काची आहे, जिच्याकडे आपण मन मोकळं करू शकतो, आपण जसे आहोत तसे राहू शकतो. तिथे आपलं कोणत पद नसत ना कोणता अधिकार नसतो. आपलं खर व्यक्तित्व आपण तिथे दाखवू शकत असतो. अशी व्यक्ती जी आपल्या सुख दुःखाची साथीदार असेल ही भावना, ही जाणीव खूप काही देऊन जाणारी असते. आणि म्हणूनच प्रेमाला इतकं महत्त्व दिलेले आहे. त्यात जर ते पहिलं प्रेम असेल तर त्याची गोष्टच वेगळी असते.
वी. स. खांडेकर यांच्या पहिले प्रेम या पुस्तकात तर प्रेमाची व्याख्या खूप सुंदर दिली आहे. ते म्हणतात, तुमच्याइतका मी काही काव्याचा शौकीन नाही, पण पहिलं प्रेम हे आयुष्यातील एक वादळ आहे. वादळात सापडलेला मनुष्य…अगदी जवळ असलेल्या मनुष्याचा गळ्यात पडतो ना! पहिल्या प्रेमाचही तसच आहे. एकमेकांच्या आवडी निवडी आवडल्या, दिसणं हसणं आवडल म्हणूनच फक्त प्रेम झाल अस नसत. त्याउलट जेव्हा एकमेकांचे दुःख जास्त तीव्रतेने समजत, त्याला कोणाची तरी सोबत मिळते, आधार मिळतो तेव्हा प्रेम अजून फुलत. इथे फक्त चार घटका एकमेकांशी बोललो, वेळ घालवला अस होत नाही. प्रेमामध्ये स्वतःच्या अहंला बरेचदा बाजूला ठेवावं लागत.
अनेक जणांच्या तोंडातून, कवितेतून देखील हे आपण ऐकल असेल, वाचलं असेल. जेव्हा माणूस स्वतःच्या पलीकडे, स्वतःला विसरून समोरच्या व्यक्तीसाठी जगायला लागतो तेव्हा ते प्रेम असत. इथे मीपणा नसतो. सर्व छान वाटत कारण समोरच्या व्यक्तीला तिच्या चांगल्या वाईट गुणासकट स्वीकारलेले असत. इथे त्याला आपल्याला पटत नाही म्हणून बदलण्याचा अट्टाहास नसतो. प्रसंगी त्याग करण्याची वृत्ती असते. पण हे करत असताना आपण स्वतः साठी कितपत प्रेम राखून ठेवलं आहे याचा कधी विचार करतो का? दुसऱ्यावर प्रेम करताना आपण स्वतः वर प्रेम करायचं विसरून तर गेलो नाही ना याचाही एकदा विचार केला पाहिजे.
आपण स्वतःसाठी पण थोड प्रेम राखून ठेवलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण स्वतः वर प्रेम करत नाही तोपर्यंत कोणीही आपल्यावर प्रेम करू शकत नाही. कारण प्रेमात आदर असतो, विश्वास असतो, साथ देणं असत. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर प्रेम करत असतात, या नात्यात असतात तेव्हा प्रत्येकवेळी मी म्हणेन ते खर, माझच ऐकलं पाहिजे, अस करून चालत नाही. पडती बाजू पण घ्यावी लागते. आणि हे दोघांकडून व्हावं लागत.या
नात्यामध्ये बरेचदा ताण तणाव, वाद निर्माण होण्याच कारणच मुळात हे असत की कोणा एका व्यक्तीकडूनच त्यागाची वृत्ती, पडती बाजू घेणं, माघार घेणे हे होत असत. इतकं की ती व्यक्ती स्वतःच अस मतच ठेवत नाही. मी ज्या माणसावर प्रेम करत आहे त्याच्या दृष्टीने हे योग्य आहे ना, मग मलाही ते योग्य वाटत. आपलं म्हणून काहीतरी मत असू शकत हेच माणूस विसरून जातो. इतकचं नाही तर व्यक्ती स्वतःचा आदर करायचा पण विसरून जाते. आता जी व्यक्ती स्वतःच म्हणून काही मत मांडत नाही, त्याची पुसटशी जाणीवही आपल्या पार्टनरला करून देत नाही, सेल्फ रिस्पेक्ट करण जिला माहीत नाही तिचा आदर समोरचा माणूस का करेल?
आपण अनेकदा हे पाहिलं देखील असेल, ऐकलं असेल. एक कोणतरी आपलं तेच खर करत असतो, दुसरा त्याच फक्त ऐकून घेणे, त्याने केलेला अपमान सहन करणे हेच करत असतो. इथे भांडण करण अपेक्षित नाही. तर स्वतःला प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. समोरचा माणूस आपण इतकं प्रेम करत असूनही अस वागत असेल तर याच काय कारण आहे? त्याने प्रेम करावं अशी अपेक्षा करत असताना आपण आधी स्वतःवर प्रेम करतो का? स्वतः ला आदर देतो का? आपला आपल्यावर विश्वास आहे का? हे तपासल पाहिजे.
वेळप्रसंगी त्याग करण वेगळं आणि स्वतःच स्वतंत्र्य अस्तित्व विसरून फक्त दुसऱ्यासाठी जगणे वेगळं. अस झाल तर ते आपलं आयुष्य राहत नाही.खर प्रेम अस असत देखील नाही. इथे दोघांमध्ये समानता असते, एकमेकांत आदर असतो आणि महत्त्वाचं म्हणजे दोघांनाही माहीत असत की या नात्याव्यातिरिक्त त्यांचं अस स्वतःच अस्तित्व आहे. जे त्यांनी स्वीकारलं देखील असत. अस असेल तर ते नात टिकत. म्हणूनच एखाद्याला प्रेम देण्यापूर्वी त्यातलं काही स्वतःसाठी राखून ठेवा.
