Skip to content

एखादी व्यक्ती वारंवार ताणत असेल तर आपण सैल सोडण्यातच आयुष्य घालवायचा का?

एखादी व्यक्ती वारंवार ताणत असेल तर आपण सैल सोडण्यातच आयुष्य घालवायचा का?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


विचार करा, आपल्याकडे रबर आहे आणि त्याने आपल्याला काहीतरी बांधायचे आहे. आता काही लोक काय करतात तर तो रबर ताणून त्याच्या जितक्या गाठी मारता येतील तेव्हढ्या मारायला पाहतात. ओढून ओढून फक्त गाठ मारायची असते. पण एका मर्यादेपर्यंत तो रबर ओढताना तुटतो कारण त्याची क्षमता नसताना आपण त्याला ओढत असतो. ज्यांच्या हे लक्षात येत की रबर तुटू शकतो ते त्याला जरा सैल सोडतात. जास्त गाठी मारत नाहीत. यातून काय होत? जे काय बांधायचं आहे तेही नीट बंद होत, रबर पण नीट बसतो आणि तुटत नाही.

या सर्व गोष्टी कश्याने झाल्या? तर योग्य वेळी सैल सोडल्याने; जास्त न ताणल्याने. नात्यांचं पण असच असत. गोष्टी खूप जास्त ताणल्या तर नात्यात अडथळे येतात. मग ते कोणतही नात असो, नवरा बायको, आई वडील, मुल आणि पालक, मित्र मैत्रिणी अगदी कामावर पण जी नाती असतात तिथेदेखील. म्हणून काही वेळा गोष्टी सैल सोडाव्या लागतात, ताठर होऊन चालत नाही. लेट गो करायला लागतात. पण त्या देखील किती करायच्या याची पण माहिती असावी लागते. नाहीतरी गोष्टी उलट्या होऊ शकतात. खालील उदाहरणातून हे लक्षात येईल.

सुनिता आणि दीपक यांच्या लग्नाला आता जवळपास सात वर्ष झाली होती. पण ही सात वर्ष म्हणजे सुनितासाठी एक रोलर कोस्टर राईड होती. स्थिरता अशी नाहीच. सारखी मनाची घालमेल आता काय होईल? आता काही होईल? आपण डोक्यातून विषय काढतो पण समोरचा माणूस तोच विषय डोक्यात घेऊन त्यावरून वाद घालत असेल तर किती आणि काय काय सहन करायचं अस होऊन जात. किती दुर्लक्ष करायचं असा प्रश्न पडतो. दीपकचा स्वभावच तसा होता.

एखादा विषय मनात धरला की त्यावरच बोलत बसायचं, त्यालाच ताणत बसायचं. पराचा कावळा करायचा अशी त्याची सवय होती. असाच एक प्रसंग घडला. सुनिताच्या माहेरची माणसं त्यांच्या घरी आली होती. तिची मावस बहीण, तिचे पती, मुल अशी सर्व आली होती. ती काही राहणार नव्हती. फक्त भेटून, काहीवेळ बसून जाणार होती. आल्याबरोबर खाण पिणं झालं, गप्पा चालू झाल्या आणि बघता बघता निघायची वेळ झाली. दीपक पण घरी होताच. पाहुणे येणार म्हणून तोही थांबला होता. ते निघू लागताच त्याने म्हटल “आलात तसे राहा दोन दिवस.

काम काय होत राहतात. तेवढाच विरंगुळा होईल.” तेव्हा सुनिताची बहिण हसुन म्हणाली, “अहो नाही भाओजी, नंतर कधीतरी येऊ राहायला, आता मुलांना पण सुट्टी नाही, त्यात तुमची पण काम असतील. उगाच आमच्यामुळे तुमची गैरसोय नको व्ह्यायला. पाहुणे आल्यावर कशी तारांबळ उडते मला चांगल माहीत आहे. येऊ आम्ही पुन्हा.” अस म्हणून ती दोघं निघाली. सुनिता त्यांना बाहेरपर्यंत सोडून आली. येऊन पाहते तर दीपक शांत बसला होता.

ती त्याच्याकडे येऊन बसली आणि बोलू लागली, “बर झालं नाही वर्षा येऊन गेली ते! किती दिवसांनी भेटणं झालं.” त्यावर त्याने फक्त हम्म केल आणि तिथून निघून गेला. सुनीताला आश्चर्य वाटलं. त्याच नेमक काय बिनसलं ते तिला समजलं नाही. कारण तस काही घडलच नव्हत. एरवी कोण काही उलट सुलट बोललं किंवा काही इकडच तिकडे झालं की त्याला तो विषय वाढवायची सवय होती. पण आज तस काही झालं नव्हत. ती दोघही त्याच्याशी नीट बोलली होती. निदान तिला तरी अस वाटत होत.

जेवताना पण तो नीट काही बोलला नाही. पण तिने जेव्हा परत त्यांच्या विषय काढला तेव्हा तो जरा तिरसटपणे बोलला, “मोठी लोक ती, त्यांना कुठे वेळ असतो गरिबांच्या घरी यायला!” तिने विचारलं, “अस का बोलत आहात? काय झालं आहे नेमक?” रागातच तो बोलला, “तू मला विचारते आहेस काय झालं ते? त्यांचं बोलणं नाही ऐकलं तू? मी त्यांना इतकं अगत्याने बोललो राहून जा. तेव्हा काय म्हणाली तुझी बहीण? उगाच आमची गैरसोय नको.

आता तू सांग मला, याचा काय अर्थ आहे? आपली काय गैरसोय होणार होती? सांग ना, तिला नेमक काय म्हणायच होत?” खर तर यात वर्षा काहीही उलट सुलट बोलली नव्हती. तिच्या बोलण्याचा हेतू चांगलाच होता. आपल्यामुळे कोणाला त्रास नको इतकच तिला वाटत होत म्हणून ती तस बोलली होती. आणि हे सुनीताला देखील समजलं होत. आणि तिला हे देखील माहीत होत की वर्षाला हसण्याच्या सुरात बोलायची सवय आहे. पण दीपकने मात्र त्याचा उलट अर्थ काढून घेतला. त्याच म्हणणं, वर्षाला अस म्हणायच होत की आम्हाला नीट पाहुणचार करता येत नाही, आमची तितकी परिस्थिती नाही.

प्रत्यक्षात अस काही नव्हत. बर त्यादिवशी जेवताना तो बोलला तिथपर्यंत ते ठीक होत. सुनिता तो विषय विसरूनपण गेली होती. पण तो विसरला नाही. पुढचे काही दिवस तो त्याच विषयावरून सारखं बोलत होता. ती अस कस बोलली, आम्ही काही गरीब नाही वैगरे तो सुनीताला ऐकून दाखवत होता. सुनिताने त्याला खूप समजावलं की तिला अस काही म्हणायच नव्हत आणि समजा अस धरून चालू की ती त्या अर्थाने म्हणाली, तरी तो विषय किती वाढवायचा आणि कश्यासाठी? ती सोडून द्यायला पाहत होती तर दीपक सारखं तेच तेच बोलत होता.

झालं गेलं सोडून द्यायचं अस त्याच नव्हतच. एका वेळेनंतर सुनीताला देखील वाटू लागलं की वर्षा का आली घरी? ज्यातून इतकं रामायण निर्माण झालं. असेच अनेक प्रसंग होते जे कोणत्या कारणाने घडले असतील पण दीपक ते वाढवायचा. त्याच्या वागण्याकडे आतापर्यंत सुनिता दुर्लक्षच करत आली होती. ना ती त्याला कधी उलटून बोले की त्याला कसले स्पष्टीकरण द्यायला जाई. कारण त्याचा काहीही उपयोग होत नव्हता हे तिला समजलं होत. पण आता तिची सहनशक्ती संपत चालली होती. हे सर्व किती वर्ष सहन करायचं अस तिला झालं होत. आपण सैल सोडतो तर उलटून आपल्यावरच येत तिचा एकंदरीत अनुभव होता. त्यातूनच मनात एकप्रकारची अस्थिरता आली होती. अस्वस्थता आली होती.

या अश्या गोष्टी आपल्या आयुष्यात देखील होतात. अशी एकतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असते जी छोट्या छोट्या गोष्टी पण ताणत असते. तिथल्या तिथे विषय संपवला अस नसतच. आपण दुर्लक्ष करतो, विषय सोडून देतो पण सतत अस होत असेल तर किती सैल सोडायचं असा प्रश्न आपल्याला देखील पडतो. म्हणून इथे स्वतः मध्ये देखील बदल केला पाहिजे. आपण गोष्टी निवळाव्यात म्हणून सोडून द्यायला पाहतो, काही प्रतिसाद देत नाही.

पण यातून बरेचदा समोरची व्यक्ती आपल्याला गृहीत धरण्याची शक्यता असते. ही काही बोलत नाही, ऐकत राहते, सोडून देते म्हटल्यावर आपण कसही वागल तरी चालत अशी एक वृत्ती निर्माण होते. वर म्हटल्याप्रमाणे बंध नीट हवा असेल तर गाठ खूप जास्त घट्ट पण चालत नाही खूप सैल पण चालत नाही. तसच गोष्टी खूप जास्त ताणल्या जात असतील तर त्या सारख्या सैल सोडून पण चालत नाही. आपल्याला योग्य शब्दात आपली बाजू मांडता आली पाहिजे. समोरच्याच आपल्याला गृहीत धरण कमी करता आलं पाहिजे. स्वतःसाठी स्टँड घेता आला पाहिजे. तरच नात्याचा बंध नीट होऊ शकतो.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!