एखादी गोष्ट मागितल्या क्षणीच मिळणं ही सवय अत्यंत घातक आहे.
हर्षदा पिंपळे
अनेकदा आपण गरीब श्रीमंत हा भाव ऐकतो.गरिबाची मुलं अशी आणि श्रीमंताची मुलं तशी असं आपण मागचा पुढचा विचार न करता बिंधास्त बोलतो.”ती काय श्रीमंताची मुलं,त्यांना काय सगळं हातात मिळतं.जे हवं ते लगेच मिळतं.काय पण यांच्या सवयी. “अशा ओळी नक्कीच प्रत्येकाने ऐकल्या असतील.
पण खरच असं काही असतं का हो ?
खरं तर गरीब आणि श्रीमंत हे माणसाच्या पुढे लावलेलं एक प्रकारे विशेषणच आहे. शेवटी माणूस हा केवळ माणूस असतो.तो गरीब किंवा श्रीमंत नसतो. खरं तर काय मॅटर करतात त्या सवयी आणि संस्कार !
जर संस्कार चांगले असतील तर निश्चितच मुलांमध्ये चांगल्या सवयी रूजल्या जातात. पण जर लहानपणापासूनच जर चुकीचे संस्कार, चुकीच्या सवयी मुलांमध्ये रूजत असतील तर त्याचा परिणाम हा पुढे जाऊन गंभीर होऊ शकतो.त्यामुळे आयुष्य चांगल्या प्रकारे घडविण्यासाठी संस्कारांना आणि सवयींना प्रथम प्राधान्य प्रत्येकाने द्यायला हवं.
आता प्रत्येक माणूस हा सारखा नाही आणि त्याच्या सवयीही सारख्या नाहीत. प्रत्येक मनुष्य हा वेगवेगळ्या संस्कारात वाढलेला असतो त्यामुळे त्याच्या सवयीही थोड्या फार वेगळ्याच असतात. कुणाला मुळातच चांगल्या सवयी असतात तर कुणाच्या सवयी अत्यंत घातक स्वरूपाच्या असतात.पण याच घातक सवयी पुढे जाऊन जास्त घातक ठरू शकतात.
असचं एखादं आपण उदाहरण पाहूयात.
‘एखादी गोष्ट मागितल्या क्षणी मिळणं’ ही एक प्रकारची सवयच म्हणावी लागेल. मित्रांनो,आपल्याला एखादी हवी असलेली गोष्ट क्षणात मिळाली की किती आनंद होतो नं ? त्या आनंदाला अनेकदा काही सीमाच नसते.आपणही त्या आनंदात वाहत जातो.आनंदाने उड्या मारतो.लहान मुलं तर आपण पाहतोच की ” मला ती रिमोट कंट्रोलची कार हवे,ते नवीन फिचर असलेला मोबाईल हवाय,तेच चॉकलेट हवय तीच गोष्ट पाहिजे.” असं सर्रासपणे बोलत असतात.आणि यामध्ये केवळ लहान मुलच नाही तर कित्येकांचा समावेश होतो.एकदा दोनदा ठीक आहे परंतु हेच जर सातत्याने होत असेल तर ती गोष्ट मुळातच अयोग्य आहे.कारण सातत्याने आपल्याला त्या गोष्टीची सवय होते.आणि ती सवय मुळातच चांगली नसते.
अशा सवयी पुढे जाऊन अत्यंत घातक वळण घेतात.कारण जसं पेरलं जातं तसच उगवत राहतं.या सवयीचही तसच होत जातं.कालांतराने मुलं/माणूस हट्टी बनत जातात. कधीतरी एखादी गोष्ट मिळायला थोडा जरी उशिर झाला तरी ही मुलं चिडचिड करायला लागतात.कारण त्यांना गोष्टी उशिरा मिळण्याची मुळातच सवय नसते.सहन करण्याची, वाट पाहण्याची यांच्यात क्षमताच जन्माला आलेली नसते.”आत्ता म्हणजे आत्ता” असा त्यांचा हट्टी स्वभाव वाढतच जातो.हट्टी स्वभावाबरोबर क्रोध, अनादर या भावनाही तिथे जन्म घेतात.आणि मग काय….? जे व्हायला नको ते होऊन बसतं.थोडक्यात सांगायचे झाले तर अशा घातक सवयी आयुष्यावर अत्यंत वाईट परिणाम करतात.
आणि मुळातच एखादी गोष्ट नेहमीच मागितल्या क्षणी मिळाली तर तीची किंमतही उरत नाही. ना की त्याचं मोल लक्षात येतं.आणि घरात म्हणून कधी कधी ठीक आहे परंतु बाहेर गेल्यावर तर याचे भयंकर परिणाम होऊ शकतात हे आपण लक्षात घ्यायला हवं.आपल्या मुलांनाच काय,तर कुणीही एखादी गोष्ट मागितली तर ती लगेच देऊ नये.त्या माणसालाही समजायला हवं,एखादी गोष्ट मिळण्यासाठी काय काय करावं लागतं..? किती मेहनत घ्यावी लागते? या गोष्टी समोरच्या व्यक्तीला कळणं गरजेचच आहे.
म्हणून अशा काही वाईट सवयी स्वतःला असतील तर त्वरित त्या बंद करा.आणि इतरांनाही अशा सवयींपासून शक्यतो दूरच ठेवण्याचा प्रयत्न करा.शक्यतो चांगल्या सवयी मुलांमध्ये/प्रत्येकामध्ये रूजवण्याचा प्रयत्न करा.चांगल्या संस्कारात मुलांना वाईट सवयी लागण्याचे चान्सेस कमी असतात. म्हणून शक्यतो मुलांवर चांगले संस्कार करायला विसरू नका.
आणि मुळातच काही गोष्टींच जसच्या तसं अनुकरण केलं जातं त्यामुळेच कोणत्या सवयी स्वतः अंगीकारायला हव्यात आणि कोणत्या नाही याचाही एकदा विचार करा.नाहीतर आपलं चुकीचं बघून समोरचाही चुकीचं करायला मागे पुढे पाहणार नाही.त्यामुळे एखादी सवय किती घातक ठरू शकते याचा विचार करूनच एखादी सवय अंगिकारा.कारण आयुष्य हे सवयींवर अवलंबून असतं.
आणि कुणीतरी म्हंटलच आहे की
“Your habits will determine your future.” (Jack canfield)
म्हणून आयुष्य सुंदर घडवायचं असेल तर सवयीसुद्धा चांगल्या असणं आवश्यक आहे.कारण,जशा चांगल्या सवयी आयुष्य घडवू शकतात तशाच वाईट सवयी आपलं आयुष्य बिघडवूही शकतात.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
