Skip to content

एकेकाळी लोकांना समजाविण्याची आपली capacity असायची, आज आपणच कमालीचे अस्वस्थ झालोय.

एकेकाळी लोकांना समजाविण्याची आपली capacity असायची, आज आपणच कमालीचे अस्वस्थ झालोय.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


काळ एक अशी गोष्ट जी कधी स्थिर राहत नाही. सतत बदलत राहते. त्यामुळे कोणावर काय वेळ येईल कोणीच सांगुच शकत नाही. कारण आपलं आयुष्यच अनपेक्षित घटनांच, वळणांच असत. कोणत्या क्षणी काय होईल याची आपण कल्पना करू शकत नाही. आपल्याला शक्य होईल तितकं आपण वेळोवेळी येणाऱ्या आव्हानांना सामोरे जात असतो. पण आयुष्यात एक काळ, एक टप्पा असा येतो जेव्हा आपली ती क्षमता गमावून बसतो. अस्वस्थ, क्षीण होऊन जातो. कोणे एके काळी आपण इतरांना जगण्याची प्रेरणा दिलेली असते, त्यांना चांगल्या पद्धतीने समजावलेल असत. पण नंतर मात्र आपणच कुठेतरी कमकुवत होऊन जातो.

हे अस का होत? इतरांना समजावणारे आपण इतके अस्वस्थ का होऊन जातो? कारण समस्या, अडथळे, आव्हान ही कोणालाच चुकली नाहीत. कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर ती अनुभवायला मिळणारच. त्यांच्यापासून आपण पळ काढू शकतच नाही. आणि जरी काढला, जरी आपण त्यापासून लांब पळत राहिलो तरी कधीतरी त्यांचा सामना हा करावाच लागतो. दर वेळी आपल्याला हा सामना एकट्याने करायला जमेलच अस नाही. बरेचदा इतरांनी केलेली मदत या वेळी खूप कामाला येते. त्यातून खूप फायदा होतो. अशीच मदत जी आपण दुसऱ्यांना केलेली असते, त्यांना दुःखाच्या दलदलीतून बाहेर काढलेले असत. त्यावेळी आपण दुसऱ्यांना जर मदत करू शकत होतो तर आता स्वतः ला मदत करायला का कमी पडतो? अस काय होत की आपण स्वतः ला एकट पाडून घेतो. ही अस्वस्थता का निर्माण होते आणि तशीच राहते, वाढते?

अग बाई अरेच्चा हा केदार शिंदे दिग्दर्शित मराठी सिनेमा बऱ्याच जणांनी पाहिला असेल. यात दिलीप प्रभावळकर देखील आहेत. एके काळी लोकांसाठी त्यांनी आंदोलन केलेलं असत, उपोषण केलेलं असत. पण त्यांच्या कुठल्यातरी एका चुकीचा ते स्वतःवर इतका परिणाम करून घेतात, त्याचा अपराधीपणा त्यांच्या मनात इतका ठसतो की त्यानंतर ते कधीच बोलत नाहीत, मोकळे होत नाहीत. तो अपराधीपणा मनात घेऊनच ते जगतात. पूर्वीची त्यांची क्षमता, त्यांची धडाडी ते विसरून जातात. अखेरीस जेव्हा त्यांचा मुलगा त्यांना विश्वासाचा हात देतो, त्यांना जाणीव करून देतो की जे झालं त्यात पूर्णपणे तुमची चूक नव्हती तेव्हा कुठे ते स्थिर होतात. असच काहीस होत जेव्हा इतरांना मदत करणारे आपण कमालीचे अस्वस्थ होतो.

आयुष्यात अश्या काही घटना घडतात ज्यातून आपण पूर्णपणे कोलमडून जातो. त्याचा आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो. त्या समस्येत आपण इतके गुरफटून जातो की बाकी कोणत्याच गोष्टींकडे आपलं लक्ष जात नाही. आपल्या क्षमता, आपली बलस्थान देखील आपण विसरतो. जसं शरीर काम करून थकत तसा मानसिक थकवा येतो. आता बास! अशी एक स्थिती होऊन जाते आणि बऱ्याचदा अस होत की आपण इतरांना मदत करायला पुढे असतो पण जेव्हा आपल्यावर जेव्हा तशी वेळ येते जेव्हा खरच आपल्याला कोणाचीतरी मदत घेणं गरजेचं असत, ज्याने आपला त्रास कमी होऊ शकत असतो तेव्हा मात्र आपण कचरतो. आपण मदत घेत नाही. अनेक लोकांची अशी मानसिकता असते. मी बाकी लोकांना हवी तितकी हवी ती मदत करेन. पण मला मदतीची गरज नाही. माझा मी समर्थपणे सर्व हाताळू शकतो.

स्वतःवर विश्वास असण चांगली गोष्ट आहे. आपल्याला कोणत्याही समस्येला सामोरे जायचे असेल तर स्वतःवर विश्वास हा असलाच पाहिजे. पण एक माणूस म्हणून आपल्याही काही मर्यादा असतात. दर वेळी आपण एकट्यानेच सर्व हाताळू शकतो अस होत नाही. त्यामुळे वेळ प्रसंगी इतरांची मदत घेतली पाहिजे. यात देखील काही जणांना वाटत माझ्या ज्या काही गोष्टी आहेत, समस्या आहेत त्या समोरच्या माणसाला समजणार नाहीत. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण कधी काळी लोकांना समजावलेलं आहे. जर आपण त्यांना समजून घेऊ शकत असू तर आपल्याला कोणी का नाही समजून घेऊ शकत. जर योग्य व्यक्तीची आपण मदत घेतली तर आपली समस्या पण कमी होऊ शकते. पण ही मानसिकता नसल्याने, स्वतःच स्वतःच्या कोशात अडकल्याने आपण अजूनच अस्वस्थ होतो.

म्हणूनच जर ही अस्वस्थता कमी करायची असेल, त्रास कमी करायचा असेल तर आधी आपल्या पूर्वायुष्याकडे वळून पहा. आपल्या क्षमता ज्यांचा आपल्याला आता विसर पडलेला आहे त्या आठवा, त्या परत मिळवा, असे प्रसंग, याहूनही मोठे प्रसंग कधी काळी आपण हाताळले असतील त्यांना आठवा आणि सर्वात महत्त्वाचं मदत घ्या. समाज, नाती म्हणून जी काही गोष्ट आहे ती यासाठीच आहे. आपण एकटे आहोत ही भावना आधी मनातून काढून टाकली पाहिजे आणि गरजेच्या वेळी योग्य माणसाची मदत देखील घेतली पाहिजे. तरच आपण पूर्ववत होऊ शकतो.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *