Skip to content

एकाच निर्णयाबद्दल जर शंभर लोकांना विचाराल तर गोंधळ निर्माण करणारी ती 100 लोक नाही तर तुम्हीच आहात.

एकाच निर्णयाबद्दल जर शंभर लोकांना विचाराल तर गोंधळ निर्माण करणारी ती 100 लोक नाही तर तुम्हीच आहात.


मयुरी महाजन


आयुष्यात आपण घेतलेला कुठलाच निर्णय हा बरोबर किंवा चुकीचा नसतो ,परंतु आपण जो काही निर्णय घेतलेला आहे, तो बरोबर कसा होता, हे सिद्ध करावे लागते, कुठल्याही गोष्टीबद्दल निर्णय घेताना आपल्या मनात हजारो प्रश्न निर्माण होतात ,मग ते कसं होईल ,काय होईल, इथपासून तर आपण म्हणतोय तसं नाही झालं ,तर इथपर्यंत माणूस स्वतःच्याच विचारांना एक ना अनेक पैलूंनी उलगडून स्वतःच्याच विचारांचा गोंधळ उडवतो,

एका भिंतीवर लावलेल्या एखाद्या चित्राकडे जेव्हा एकापेक्षा जास्त लोक बघतात ,तेव्हा ती प्रत्येक व्यक्ती त्या चित्राबद्दल वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बोलताना दिसतात, तसेच मी स्वतः बऱ्याच जणांना बघितलेले आहे ,की त्यांनी एखादी गोष्ट नवीन घेतल्यावर ती बाकी लोकांना जेव्हा दाखवतात, किंवा ती वस्तू दिसल्यावर जर कोणी विचारलं ,तर मी नवीन घेतले वगैरे ते पूर्णपणे स्पष्टीकरण देऊन सांगतात,

आणि त्या बदल्यात समोरच्या व्यक्तीला काय वाटतं ,हा फीडबॅक घेण्यासाठी उत्सुक असतात, जर यदा कदाचित तो फीडबॅक नकारात्मक पद्धतीचा असेल, तर मात्र व्यक्ती आपल्याच विचारांनी स्वतःमध्ये इतकी गोंधळते ,की ते स्वतःलाही कळत नाही, की आपण आपल्या आयुष्याकडे आपल्या मर्जीने बघायला हवे… ना की दुसऱ्याच्या ….

बऱ्याचदा आपल्या सर्वांसोबतच असे होते ,की आयुष्याच्या एका निर्णायक टप्प्यावर जेव्हा एखादा निर्णय घ्यावा लागतो, तेव्हा तो चुकू नये, किंवा मग चुकल्यास त्याला सामोरे जाता आले नाही, तर मग ,हा प्रश्न निर्माण करणारे कुणी दुसरे नाही, तर आपलेच विचार असतात,

लहानपणी साधं मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या घरी जायचे असेल, तरी आपण त्या निर्णयाला घेण्या अगोदर कुणाला तरी विचारने योग्य समजतो, की मी जायचे का?? जर हो म्हटले तर जायचे, नाही सांगितले ,तर जायचे नाही, म्हणजेच आपण कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत एकदम 101% शोअर नसतोच ,आणि ते कधीच नसतो ,

आयुष्यात निर्णय कुठलाही असो, परंतु त्याला सामोरे जाण्याची तयारी आपली स्वतःची असायला हवी, कारण तो निर्णय आपल्या आयुष्याशी जोडलेला असतो, अनुभव असलेल्या माणसांना जरी आपण विचारत असलो, तरी एक गोष्ट कायम लक्षात घ्यायला हवी ,येथे प्रत्येकाला आलेले अनुभव हे वेगळे असतात, ती व्यक्ती ज्या परिस्थितीतून गेलेली असते, ती परिस्थिती व आपली परिस्थिती ही भिन्न असते ,येथे प्रत्येकाच्या आयुष्याचे पुस्तक हे वेगळे आहे,

असं बऱ्याचदा ऐकायला किंवा बघायला मिळतं जेव्हा व्यक्ती आपल्या आयुष्यात त्रासाला कंटाळलेली असते, तेव्हा आपसूकच व्यक्ती त्यासाठी कुणाला तरी जबाबदार ठरवते, कारण की आपल्या आयुष्यात जे काही घडले, किंवा घडत आहे, त्यालाही लोक जबाबदार आहे, त्यांनी माझं नशीब फोडलं…

अशी कितीतरी वाक्य व्यक्ती बोलताना दिसते, पण एक सांगू मला तरी असं वाटतं की आयुष्य जर आपलं आहे, तर त्यासाठी योग्य काय ,अयोग्य काय, हे ओळखून निर्णय घेण्याचा अधिकार हा वैयक्तिक रित्या आपला स्वतःचा असायला हवा, आणि स्वतःसाठी तशी तटस्थतेची भूमिका घेणेही गरजेचे आहे,

आपल्या निर्णयाबद्दल व्यक्ति इतरांना तेव्हाच विचारते, जेव्हा त्याच्या स्वतःच्या विचारांचा गोंधळ उडालेला असतो, व्यक्ती स्वतःसाठी आपल्या विचारांनी आधीच गोंधळलेली असते ,आणि अजून कुणाला विचारून व्यक्ती स्वतःच्या समस्या वाढवून घेते, त्याऐवजी आपणच आपल्या निर्णयाला सामोरे जाण्याची हिंमत ठेवली, तर आपण घेतलेला निर्णय जर बरोबर असेल, तर नक्कीच आयुष्याला कलाटणी मिळणार आहे, व चुकला निर्णय तरी आपण कुठे कमी पडलो, व नेमकी अजून काय असण्याची आवश्यकता आहे, हेही कळेलच….

एकाच निर्णयाबद्दल जर शंभर लोकांना विचारलं ,तर गोंधळ निर्माण करणारे ते शंभर लोकं नाहीत तर तुम्ही स्वतःच आहात, आपल्या चुकलेल्या निर्णयाबद्दल त्याचे खापर कुणावर तरी फोडायला कोणीतरी हवे म्हणून व्यक्ती स्वतःच आपल्या विचारांचा गोंधळ करून कुणाच्यातरी माथी त्याचे आरोप लावताना दिसते, पण त्या व्यक्तीला स्वतःलाही माहिती असते ,की आपणच त्याचे खरे भागीदार आहोत, फक्त ते स्वीकारणे जड असते, इतकेच…. त्यासाठी आपण स्वतःला ओळखणे, व आपल्या गोंधळलेल्या विचारांना एक वाट करून देणे गरजेचे असते, त्यासाठी आपण शांतपणे आपली परिस्थिती व आपल्या विचारांनाही निवांतपणा देणे आवश्यक आहे,
आपणच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आहोत, हे विसरू नये….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!