“एक स्वप्न नेस्तनाबूत होऊनही दुसरं स्वप्न पाहण्याच्या आशावादाला जिंदगी म्हणतात..”
मधुश्री देशपांडे गानू
“जिंदगी कैसी हैं पहेली, हाय…
कभी तो हसाये, कभी ये रुलाये….”
आज अथर्व खूपच आनंदी होता. त्याची आणि त्याच्या कुटुंबाची मनोकामना, अनेक वर्षांचं स्वप्न आज साकार झालं होतं. खरं तर हे अथर्वच स्वप्न नव्हतंच कधी. पण नियतीने वेगळेच स्वप्न त्याच्यासाठी पाहिलं होतं. आणि आज ते पूर्णत्वाला गेलं होतं.
अथर्व मध्यमवर्गीय घरातील एकुलता एक मुलगा. सरधोपट मार्गाने चालणारा. सरळ स्वभावाचा, संस्कारी. सॉफ्टवेअर इंजिनियर. सर्वसामान्य रिवाजाप्रमाणे नोकरी आणि मग लग्न. श्रिया त्याची पत्नी सुस्वाभावी. आई, वडील, अथर्व आणि श्रिया चौकोनी आनंदी, सुखी कुटुंब. वडील नुकतेच सेवानिवृत्त झालेले. आणि आई उत्तम गृहिणी, अन्नपूर्णा. श्रिया ही गृहिणीच. त्यामुळे आता कुटुंबाची सर्व जबाबदारी अथर्ववर होती. त्याचं स्वप्न नोकरीत सर्वोच्च पदावर पोहोचून सुखी संसार करायचा. कुटुंबाची सर्व स्वप्नं पूर्ण करायची. पण अचानक त्याची कंपनी बंद पडली. आणि त्याची नोकरी गेली. खरंतर त्याची सुरुवात होती. दुसरीकडेही पटकन नोकरी मिळेना.
त्याला हताश, निराश वाटू लागलं. काळजीने तो ओढग्रस्त होऊ लागला. अशातच त्याच्या आईने आणि पत्नीने त्याला धीर दिला. आणि असं सुचवलं की हल्ली नोकरीचा काही भरवसा नाही. तर आपणच एखादा छोटा व्यवसाय का सुरू करू नये? प्रथमदर्शनी अथर्वला पटलं नाहीच. मराठी माणूस आणि व्यवसाय???
आजही आपल्या समाजात नऊ ते पाच नोकरी करणाऱ्यांनाच, डॉक्टर, इंजिनियर यांनाच मानसन्मान आहे. कितीही छोटे-मोठे व्यवसाय करून अगदी उत्तम जीवन जगणारी माणसं या जगात आहेत. पण तरीही नोकरी करणाऱ्याला जो मान मिळतो तो व्यावसायिकाला नाही. याच संकुचित विचारसरणीमुळे आजही मराठी माणूस व्यवसायाकडे वळत नाही. आणि मराठी माणूसच मराठी माणसाला मदत करत नाही. हे कटू वास्तव आहे. खरंतर आज मराठी मुलांनी स्वतंत्र व्यवसाय करायची काळाची गरज आहे. असो..
तरी अथर्वने सकारात्मक विचार केला. आई सुगरण होतीच. श्रिया ही आता आईच्या हाताखाली तयार होत होती. मग घरगुती खाद्यपदार्थांचा व्यवसाय करण्याचे ठरले. अथर्वने जरा नाखुशीनेच, पण हो म्हटले. अगदी सुरुवातीला जवळचे नातेवाईक, शेजारीपाजारी यांच्याकडे वाढदिवसाच्या पार्ट्या, छोट्या पार्ट्या यांची ऑर्डर घेणे सुरू झालं.
वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ, जेवणाचे डबे, सणासुदीला दिवाळीला फराळाचे, गोडाचे पदार्थ असं हळूहळू व्यवसायाचं स्वरूप वाढवत नेलं. प्रथम अथर्वला सगळीकडे नेऊन डबे पोहोचवायला लागायचे. त्याला मनातून फार वाईट वाटायचं. मी एवढा इंजिनियर पण आज डबे पोहोच करतोयं. “पण प्रामाणिकपणे केलेलं कोणतंही काम कधीच वाईट नसतं” , हे त्याच्या आईने त्याला पटवून दिलं. आणि बघता बघता व्यवसायाची भरभराट होऊ लागली.
उत्तम दर्जा आणि वेळ ( Quality and Time ) पाळली की कोणताही व्यवसाय मार्गी लागतो. अत्यंत प्रामाणिकपणे खूप मेहनत घेऊन अथर्व आणि त्याच्या कुटुंबाने हा व्यवसाय नावारूपाला आणला. हळूहळू सगळीकडे नाव होत होतं. मोठ्या ऑर्डर्सही मिळू लागल्या. आणि आज आठ वर्षांच्या अथक मेहनत व प्रयत्नांनी अथर्वने मुंबईत अंधेरी सारख्या उपनगरात छोटंसं का होईना पण स्वतःचं दुकान खरेदी केलं होतं. आज त्याचं सुंदर पद्धतीने उद्घाटन झालं होतं.
उत्तमोत्तम चवींचे मराठमोळे खाद्यपदार्थ मिळण्याचं हक्काचे ठिकाण, असं नाव तर झालं होतं. त्यामुळे आज अथर्व आणि त्याचं कुटुंब खूप खुश होतं, समाधानी होतं. त्यांच्या कष्टांना फळ मिळालं होतं. अजूनही अनेक मोठे टप्पे गाठायचे होते. आज त्याचा अथश्री हा ब्रँड लोकप्रिय झाला होता. नोकरीचं मनासारखं स्वप्न नेस्तनाबूत झाल्यावरही दुसरं स्वप्न मनातील आशा प्रबळ ठेवून अथर्वने पाहिलं. आणि पूर्णही केलं.
जर अथर्वने तेव्हा आईचं, पत्नीचं ऐकलं नसतं तर?? जर तो फक्त नोकरीच्या शोधात भटकत राहिला असता तर?? कदाचित मिळाली ही असती नोकरी त्याला. पण आज स्वतःच्या मालकीचा व्यवसाय लोकप्रिय असणं, स्वतःचा मोठा ब्रँड करणं, हे झालं असतं का?? तो निराश, हताश झाला असता तर?? नैराश्याच्या गर्तेत गेला असता तर?? पुढे काहीच चांगलं घडलं नसतं. पण त्याचं मनाजोगतं स्वप्न नेस्तनाबूत होऊनही आशावाद जिवंत ठेवून त्याने मनाविरुद्ध का होईना पण दुसरं स्वप्न पाहिलं. आणि ते पूर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली. आणि आज त्याचा उत्तम ब्रांड तयार झाला होता. यालाच तर जिंदगी म्हणतात ना!!
शेवटी माणूस आजचा दिवस उद्याच्या आशावादावरच जगतो. पण काहीही झालं कितीही कठीण प्रसंग आले तरीही आशावाद आणि सकारात्मकता कायम ठेवायलाच हवी. “फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा राखेतून भरारी घेता यायला हवी.” कितीतरी लोकप्रिय, यशस्वी व्यक्ती अशा आहेत, ज्यांनी आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर शून्यातून पुन्हा सुरुवात केली आणि ते यशस्वीतेच्या शिखरावर पोहोचले. आशावाद जिवंत ठेवताना प्रामाणिकपणा, मेहनत, कष्ट हे मात्र चोख हवे. नुसता फुकाचा आशावाद काय कामाचा??
जरी तुमचं एखादं स्वप्न नेस्तनाबूत झालं तरीही दुसरं स्वप्न बघायला घाबरू नका. नव्या उमेदीने हे नवीन स्वप्न पूर्ण करण्याचा सर्वार्थाने प्रयत्न करा. हेच तर जीवन आहे. पुढे चालत राहणे हीच तर जिंदगी.. मग तुम्हींही म्हणाल….
“जिंदगी एक सफर हैं सुहाना….”
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
