दुसऱ्यांच्या आयुष्यातील आपली जागा आणि गरज शोधणे बंद करा.
पल्लवी गवळी
मन हे स्थिर राहणार नसतं . सतत नवीन अपेक्षा , नवीन गरजा तयार होतात त्याच्या . एक संपली की दुसरी ती झाली की तिसरी , ही न संपणारी शृंखला आहे , आणि याच अपेक्षांमधून एक प्रवास सुरु होतो अवलंबून राहण्याचा .. कदाचित ती कारणं वेगवेगळी असतील पण ते अवलंबून राहणे गरज बनू लागते .
माणूस एकटा नाही राहू शकत त्याच्या मनाला सतत आधाराची गरज असते प्रेमळ शब्दांची आपुलकीची सहानुभूतीची गरज असते . ह्या मनाची मागणी देखील भिन्न असते . प्रत्येक नात्याकडून प्रत्येक व्यक्तीकडून अपेक्षा वेगळी . या भावनेतूनच मग पुढे सुरू होते आपली ह्या व्यक्तीच्या आयुष्यात नेमकी जागा काय ? मी अवलंबून आहे हिच्यावर पण ह्या व्यक्तीला पण माझी तितकीच निकराची गरज आहे काय ?
अवलंबून राहण्याचा हाच प्रवास जीवघेणा असतो मग ते कुठल्याही नात्यात असो …
म्हणूनच अपेक्षा करणं वाईट . एकेक नात्याचा जरी विचार केला तरी त्याचा एक ठराविक कालावधी असतो . कायमस्वरूपी असे कोणी आयुष्यात असणे किंवा आपण त्यांच्या आयुष्यात टिकून राहणे हीच गरज असते मनाची आणि तीच जागा तीच गरज शोधणे बंद करायला हवे ..
लहानपणी आईवर आपण अवलंबून असतो अगदी प्रत्येक गोष्टीसाठी पण ती त्या वेळेची त्या वयाची गरज असते पण त्या उलट जेव्हा आई अपल्यावर अवलंबून होते शरीराने थकते मनाने थकायला लागते तेव्हा तिची तीच गरज आपण पूर्ण करतो का ? तिच्या प्रत्येक गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपण सक्षम असतो का ? अशा वेळी त्या आईने काय करावे ?
पती पत्नीचा विचार केला तर तिथेही अपेक्षा , अवलंबून राहणे आलेच . ती कारणं वेगळी आहेत इथे आपण प्रेमासाठी अवलंबून राहतो , आधारासाठी राहतो आणि ती आपली गरज बनू लागते ती गरज असावी देखील पण स्वतः ला विसरून नाही . आपण स्वतः मनाने खंबीर असलो की नात्यात आपली जागा शोधत बसण्याची गरज उरत नाही ती ठराविक मर्यादेपर्यंतच राहते .. नात्यावर अवलंबून राहणे गरजेचे असते तरी ते आपल्यावर हावी व्हायला नकोय .
असे खूप सारे उदाहरण देता येतील पण मुळात माणूस स्वतः सक्षम असला की त्याला कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात स्वतःचे स्थान निर्माण करत बसण्याची , ते टिकवून ठेवण्याची केविलवाणी धडपड करावी लागत नाही , ती जागा आपोआपच बनते . ती तेव्हढीच रहावी पण आपल्याला बदलवून नाही याची काळजी करणे गरजेचे
स्वतः च स्वतः साठी सक्षम रहायला लागलो तर मन असे अपेक्षा करणं बंद करेल ही गरज शोधणे बंद करेल .
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

खुप सुरेख . . वैचारीक . .