Skip to content

दुःखी राहणं जसं आपण सहजपणे निवडतो तसच सुखी राहणं पण जाणीवपूर्वक निवडल पाहिजे.

दुःखी राहणं जसं आपण सहजपणे निवडतो तसच सुखी राहणं पण जाणीवपूर्वक निवडल पाहिजे.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“ए आई, अग यात बघ ना मीठ जास्त झालय आणि भाजी पण कच्ची आहे जरा.” सुमित ओरडत होता. गायत्री मात्र तिच्या ताटात जे काही होत ते निमूटपणे खात होती. सुमितचा आरडाओरडा ऐकून आई बाहेर आली आणि त्याला म्हणाली, “सुमित रोज काय रे असत तुझ! एक दिवस जेवण करून बघ म्हणजे समजेल इथे माझी किती दमछाक होते ती!

जरा कमी जास्त झालेलं तुला चालत नाही, ती गायत्री बघ तुझ्याहुन लहान आहे तरी तिची काही तक्रार नसते. शांतपणे खाते. आणि एक तू आहेस, काही ना काही असतच तुझ. बरोबर ते नाही ते तुला दिसत. तिच्याकडून शिक काहीतरी.” अस म्हणून आई आत गेली. “हिला काय काहीही असल तरी चालत, चांगल वाईट काही फरकच समजत नाही.” गायत्रीबद्दल अस पुटपुटत तो जेवू लागला.

सुमित असाच होता. त्याला सर्व काही अगदी परफेक्ट लागे. जरा मागे पुढे झालेलं चालत नसे. याचा परिणाम असा होई की मनासारखं नाही झालं तर ती लगेच अपसेट होई. निराश, दुःखी होई. अगदी मोजक्या गोष्टी होत्या ज्या त्याला आनंद देत. पण बहुतेक वेळा तरी त्याची चिडचिड होई. आता खरच तस काही कारण आहे म्हणावं तर गायत्रीच्या बाबत तस होताना दिसत नसे. छोट्या छोट्या गोष्टी तिला आनंद देत. पाहायला गेलं तर अभ्यासात, बाकी ॲक्टिव्हीटीस मध्ये सुमित तिच्याहुन उजवा होता. काहीही करायचं असल तरी तो त्याच्यासाठी खूप मेहनत घेई.

गायत्री पण मेहनत घ्यायची, नाही अस नाही. पण त्या दोघांमध्ये महत्त्वाचा एक फरक होता तो म्हणजे गायत्री कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी करे. सुमितच मात्र हेच ध्येय असायचं की आपण जर हे करतोय तर त्यातून आपल्याला यश मिळालच पाहिजे. यातून व्हायचं अस की, त्याच लक्ष हे अंतिम ध्येयाकडे जास्त लागे आणि त्यातून त्या प्रक्रियेचा आनंद निघून जायचा. आणि आपणा सर्वांना माहीतच आहे आपण मेहनत करू शकतो यश अपयश आपल्या हातात नाही.

हीच गोष्ट सुमितला त्याच्या आई बाबांनी कित्येकदा समजावून सांगितली. पण त्याला ती समजत नसे. जे मनात आहे तस यश नाही मिळालं, जरा कुठे कमी पडल तरी हा लगेच दुःखी होई. साधं खेळाचच उदाहरण घेतल, सर्व मित्र मैत्रिणीनी काहीतरी खेळ खेळायचा ठरवला आणि त्यासाठी ते सर्व जमले. खेळ बाहेर खेळायचा होता पण त्यादिवशी झालं अस की अचानक आभाळ भरून आलं आणि पाऊस पडला आणि तो खेळ कॅन्सल करावा लागला. सर्व जण जरावेळ हिरमुसले पण लगेच त्यांनी दुसरा प्लॅन तयार केला. त्यांनी असा गेम शोधून काढायचं ठरवलं जो घराच्या आत बसून खेळता आला असता.

आता यात सुमितने असणं अपेक्षित होत पण तो एका बाजूला जाऊन बसला का तर आधीचा प्लॅन कॅन्सल झाला. सर्वांनी त्याला खूप वेळ बोलवलं पण तो काही गेला नाही.शेवटी ती सर्व जण त्यांचा त्यांचा खेळ खेळत मजा करून गेले. हा मात्र त्यांना एका कोपऱ्यात बसून पाहत राहीला आणि थोड्याच वेळात तिथून निघून आला. आता इथे सर्वांसाठी एकच परिस्थिती होती. पण दुःखी फक्त सुमित झाला. सर्वांचाच प्लॅन खराब झाला होता पण सुमित जितक्या सहजपणे निराश, दुःखी झाला तसे बाकी सर्वजण झाले का? नाही! उलट त्यांनी जाणीवपूर्वक त्यांचा आनंद शोधून काढला, निर्माण केला. ते सर्व पण जर सुमित सारखे बसून राहिले असते तर कोणालाच मजा करता आली नसती. चॉईस दोघांकडे होते पण सुमितने दुःखी राहायच चॉईस केला आणि बाकीच्यांनी मजा करायच ,आनंदी राहायचं चॉईस केलं.

या मानवी प्रवृत्ती आहेत. माणसाकडे दोन्ही प्रवृत्ती असतात जशी चांगली तशीच वाईट. एक प्रवृत्ती माणसाला त्याच्या उनत्तिकडे नेते तर दुसरी त्याच्या विनाशाकडे. माणूस कोणाचीही निवड करू शकतो पण; पण माणसाचा कल हा जास्त करून नकारात्मक गोष्टीकडे जास्त असतो. पहा ना आपल्याला जरा काही झालं तर आपण दुःखी होतो पण तेच जर हसायचं असेल, आनंदी व्हायचं असेल तर किती खटाटोप करावा लागतो. आताच्या काळात पण आपल्या अपेक्षाच इतक्या वाढल्या आहेत की यात आनंदी राहण, समाधानी राहणे माणूस विसरूनच गेला आहे.

आपल्या दुःखाला आपण कोणत्यातरी मुकुटासारख मिरवू लागलो आहोत आणि हे रोजच्या बोलण्यातून जाणवत. अगदी सहजपणे आपण बोलतो, तुला काय माहित मला किती टेन्शन आहेत. मुलांचं टेन्शन, कामाचं टेन्शन. आज तर बाई आली नाही वेळेवर मला किती भीती वाटली. माझ्या आयुष्यात किती त्रास आहे ते मलाच माहीत. अस आपण बोलतो. पण तेच अग आज आम्ही सर्व एकत्र बसून जेवलो, छान गप्पा झाल्या, माझा मुलगा परवा ट्रीपला गेला होता तिथल्या गमती त्याने सांगितल्या. बागेत सहज गेले तर तिथे एक नवीन फुल आलेल मला दिसल इतका आनंद झाला म्हणून सांगू! अस आपण कितीवेळा सांगतो? अश्या गोष्टीतून आपण किती सुखी आनंदी होतो.

आपला पहिला आणि मोठा गैरसमज हाच असतो की सुख हे फक्त मोठ्या गोष्टीतून मिळत. इथेच आपल्या दुःखी होण्याची सुरुवात असते. सुख हे मोठ्या गोष्टीत नाही तर अगदी रोजच्या आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला मिळू शकत फक्त आपली तशी नजर पाहिजे. आपण तितक्या जाणिवेने ते सुख पाहिलं पाहिजे, निर्माण केलं पाहिजे. याचा अर्थ आयुष्यातले वाईट क्षण, दुःखी प्रसंग यांना नाकरायच आहे का? नाही. ते नाकारता येणार पण नाहीत.

फक्त ते ते जितक्या लगेच आपल्याला जाणवतात तितक्याच सहजतेने आपल्याला आपल्या सुखाचे प्रसंग शोधता आले पाहिजेत आणि ते मिळतात. दोन वर्षाचं मुल जेव्हा नवीन रंगवलेल्या भिंतीवर खडूने रेघोट्या ओढत तेव्हा एका बापाला भिंत खराब झाली म्हणून दुःख होईल तर दुसऱ्या बापाला आपल्या बाळाच्या या छोट्याश्या यशाने देखील आनंद होईल. प्रश्न जाणिवेचा आणि दृष्टीचा आहे. आपण त्या दृष्टीने पाहू लागलो तर आपल्या आयुष्यातील ही छोटी छोटी आणि खूप सारी सुखे आपल्याला सहज दिसतील आणि आपण त्याचा आनंद घेऊ शकतो.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!