आपल्या आयुष्यात अनेकदा अशा गोष्टी घडतात, ज्या आपल्याला अजिबात नको असतात. एखाद्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला दुखावणे, अपेक्षेप्रमाणे यश न मिळणे, नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणे, आर्थिक अडचणी येणे किंवा आयुष्यात अचानक एखादा मोठा बदल घडणे. अशा वेळी मन अस्वस्थ होतं. आपण सतत त्या परिस्थितीचा विचार करत राहतो. मनात एकच प्रश्न येत राहतो, असं माझ्याच बाबतीत का घडलं? हे असं व्हायला नको होतं. माझ्या आयुष्यात हे घडायला नको होतं.
खरं तर, अनेकदा आपल्याला त्रास केवळ घडलेल्या घटनेचा नसतो, तर ती घटना स्वीकारता येत नसल्याचा असतो. कारण वास्तव एक असतं आणि मनाला हवं असलेलं वास्तव वेगळं असतं. या दोन्ही गोष्टींमध्ये अंतर निर्माण झालं की मानसिक त्रास वाढू लागतो.
मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्या भावना केवळ बाह्य परिस्थितींवर अवलंबून नसतात. त्या परिस्थितीचा आपण कसा अर्थ लावतो, त्याबद्दल काय विचार करतो आणि ती घटना आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे, यावरही त्या अवलंबून असतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला नोकरीत अपयश आलं तर एक व्यक्ती स्वतःला पूर्णपणे अपयशी समजू शकते. तर दुसरी व्यक्ती या अनुभवाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहू शकते. परिस्थिती एकच आहे, पण तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे दोघांच्या भावनिक प्रतिक्रिया वेगळ्या असतात.
यालाच मानसशास्त्रात Cognitive Appraisal म्हणजेच परिस्थितीचे मानसिक मूल्यमापन असं म्हणतात.
आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. दुसऱ्या व्यक्तीचं वागणं, भूतकाळात घडलेल्या घटना, इतरांचे निर्णय, अनपेक्षित नुकसान किंवा आयुष्यात येणारे बदल आपण नेहमी आपल्या इच्छेनुसार घडवू शकत नाही. मात्र, या गोष्टींना आपण कसा प्रतिसाद द्यायचा, हे काही प्रमाणात आपल्या हातात असतं.
समजा, एखाद्या व्यक्तीने तुमच्याशी चुकीचं वर्तन केलं. तुम्हाला त्याचा त्रास झाला. अशा वेळी तुम्ही वारंवार त्याच घटनेचा विचार करत राहिलात, त्या व्यक्तीने असं का केलं, माझ्याबरोबरच असं का होतं, असे प्रश्न स्वतःला विचारत राहिलात तर तुमचं मन त्या घटनेतच अडकून राहू शकतं. पण त्याच वेळी तुम्ही स्वतःला असं सांगितलं की, त्या व्यक्तीचं वर्तन माझ्या नियंत्रणात नाही. मात्र, त्याचा माझ्या आयुष्यावर किती परिणाम होऊ द्यायचा, हे मी ठरवू शकतो, तर विचारांची दिशा बदलू शकते.
याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वाईट परिस्थिती आनंदाने स्वीकारावी किंवा अन्याय सहन करावा. स्वीकार आणि सहन करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्वीकार म्हणजे जे घडलं आहे ते घडलं आहे, हे वास्तव समजून घेणं. त्यानंतर त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी योग्य निर्णय घेणं. एखाद्या नात्यात सतत अपमान होत असेल तर ते स्वीकारण्याचा अर्थ अपमान सहन करत राहणं नाही. उलट, आपल्यासाठी योग्य मर्यादा निश्चित करणं आणि आवश्यक असल्यास त्या नात्यापासून दूर जाणं हाही स्वीकाराचाच एक भाग आहे.
मानसशास्त्रात याला Acceptance म्हणजेच स्वीकार असं म्हणतात. Acceptance and Commitment Therapy (ACT) मध्येही वास्तवातील अनुभवांशी अनावश्यक संघर्ष न करता आपल्या महत्त्वाच्या मूल्यांनुसार कृती करण्यावर भर दिला जातो.
अनेकदा आपण भूतकाळ बदलण्याचा प्रयत्न मनातल्या मनात करत राहतो. जे घडलं ते वेगळ्या पद्धतीने घडायला हवं होतं, मी तसं बोलायला नको होतं, त्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला नको होता, असे विचार वारंवार मनात येतात. पण भूतकाळ बदलता येत नाही. त्यातून शिकता मात्र नक्की येतं. त्यामुळे स्वतःला दोष देत राहण्यापेक्षा त्या अनुभवातून काय शिकता येईल, याचा विचार करणं अधिक फायदेशीर ठरतं.
त्याचप्रमाणे भविष्यात काय होईल, याची सतत चिंता करण्यापेक्षा वर्तमानात आपल्या हातात काय आहे, याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कारण आपण जितका वेळ बदलता न येणाऱ्या गोष्टींशी संघर्ष करण्यात घालवतो, तितकी आपली मानसिक ऊर्जा कमी होत जाते.
एखादी परिस्थिती स्वीकारण्यासाठी स्वतःला वेळ देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. दुःख, राग, निराशा, भीती या भावना लगेच नाहीशा होतीलच असं नाही. स्वतःच्या भावनांना दाबून ठेवण्यापेक्षा त्या समजून घेणं गरजेचं आहे. गरज वाटल्यास विश्वासू व्यक्तीशी संवाद साधावा किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.
लक्षात ठेवा, आयुष्य नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडेलच असं नाही. काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतील, काही माणसं आपल्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाहीत आणि काही स्वप्नं अपूर्ण राहतील. पण याचा अर्थ आपलं आयुष्य संपलं असा होत नाही.
दुःखद परिस्थिती बदलता आली नाही, तरी त्या परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलता येऊ शकतो.
म्हणून प्रत्येक वेळी परिस्थितीशी लढण्यापेक्षा स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जे बदलू शकत नाही त्याचाच विचार करत बसणार आहे की जे बदलू शकतो त्यावर काम करणार आहे?
कारण मानसिक शांतता म्हणजे आयुष्यात कोणतीही समस्या नसणं नाही, तर प्रत्येक समस्येशी स्वतःला त्रास न करून घेता योग्य पद्धतीने सामना करण्याची क्षमता विकसित करणं होय.
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण नसतं; पण त्या गोष्टींमुळे स्वतःला पुन्हा उभं करण्याची दिशा आपण नक्कीच निवडू शकतो.
धन्यवाद.

