अपूर्ण स्वप्न कधीतरी पूर्ण होतील या आशेवर रोज नव्याने जगावे…
दिपाली मुळे
“दिल हे छोटासा ,छोटीसी आशा, मस्ती भरे मन की ,भोली सी आशा,
चांद तारो को छूने की आशा, आसमानो मे उडने की आशा…..”
प्रत्येक व्यक्ती जन्माला येते ते स्वतः सोबत काही स्वप्न घेऊनच… वयाच्या कळणे या टप्प्यावर आल्यानंतर काही स्वप्न प्रत्येक जण बघत असतो. प्रत्येकाचे स्वप्न आहे वेगळे असू शकते.
कोणाला नाव कमवायचे असते, कोणाला खूप पैसा कमवायचा असतो ,कोणाला जीवनात विशिष्ट पद हवे असते, तर कोणाला विशिष्ट ध्येय पूर्ण करायचे असते, कोणाला देश-विदेश बघायचे असतात तर कोणाला स्वतःचे घर गाडी वगैरे हवे असते .असे एक ना अनेक स्वप्ने माणसाने बघितलेली असतात .
पण प्रत्यक्षात ती सर्व स्वप्न पूर्ण होतातच असे नाही .कधी परिस्थितीमुळे कधी जबाबदारीमुळे तर कधी पैशामुळे कधी वेळेमुळे तर कधी कोणा व्यक्ती मुळे देखील स्वप्न अपूर्ण राहतात .स्वप्न पूर्ण राहिली म्हणून कधी आयुष्य संपत नाही….. जगरहाटी थांबत नाही…. हो ना? मग आपणही आपली आशा का सोडायची? मुळात आपला जन्म का झाला तर आनंद व समाधान मिळवण्यासाठी .त्यासाठी पैसा आहे लागणारे एक साधन आहे.
मात्र आनंद व समाधान मिळवण्यासाठी पैशा सोबतच अजून ही इतर साधने आहेत. म्हणून स्वप्न पाहणे कधीच थांबवायचे नाही उलट अपूर्ण स्वप्न कशी पूर्ण होतील व कधीतरी निश्चित पूर्ण होतील या आशेने पुन्हा नव्याने रोज जगावे….. म्हणतात ना ,”उम्मीद पे दुनिया कायम है !”आशा आहे म्हणूनच येणारा प्रत्येक दिवस हा उत्साह घेऊन येतो अन्यथा उद्याची वाट पाहणे थांबून जाईल व सोबतच जगण्याचा उत्साह देखील…. म्हणूनच असे म्हणतात की ,स्वप्न ते बघू नका जे झोप लागल्यावर येतील तर स्वप्न असे बघा की ते पूर्ण करण्याच्या ध्यासाने तुमची झोप उडून जाईल …..
ईश्वराने आपल्याला खूप अमुल्य अशी गोष्ट दिली आहे ती म्हणजे ‘आशा’……. याच आशेवर माणूस कठीणातला कठीण संघर्ष पार करतो. जगण्याला बळ देते ती आशा, संघर्षाला आधार देते ती आशा, दिवसाला उत्साहात येते ती आशा, जगणे रोज नवे करते ती फक्त आणि फक्त आशा,पण फक्त आशेवर स्वप्न पूर्ण होत नाही बर का!
तुम्ही म्हणाल कि मी खूप आशावादी आहे मग आता माझी सारी स्वप्न पूर्ण होतील. तर आशावादी असलेच पाहिजे पाहिजे त्यासोबतच त्याला जोड हवी ती प्रयत्नांची ,कृतीची, सातत्याची ……”दे रे हरी खाटल्यावरी” असे कसे होईल? स्वप्न कधी तरी पूर्ण होतील अशी आशा बाळगून रोज नव्याने जगणे चूक नाही पण अपूर्ण स्वप्न कधीतरी आपोआप पूर्ण होतील अशी आशा बाळगणे अत्यंत चुकीचे आहे .आशेसोबत रोज नव्याने जगायचे ते आपले अपूर्ण स्वप्न कसे पूर्ण होईल यासाठी च्या रोजच्या नव्या प्रयत्नाने …छोट्या छोट्या कृतींचा पावलांनी आपल्या स्वप्ना कडे जाण्याचा प्रवास पूर्ण करायचा तो आशेचा रस्त्यावरून आणि प्रयत्नांच्या गाडीतून कृतीच्या वाहकासोबत म्हणजे ड्रायव्हर सोबत …….
काय पटतय ना! मग वाट कसली बघताय तयार व्हा आशेचा रस्त्यावरून प्रयत्नांची गाडी पकडून कृतीच्या ड्रायव्हर सोबत अपूर्ण स्वप्न पूर्ण करायच्या प्रवासाला… रोजच नव्याने जगायला…….
” एकाच ह्या जन्मी जणू
फिरूनी नवी जन्मेन मी
लहरेंन मी ,बहरेन मी ,
शिशिरातुनी उमलेन मी ,
एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी……”
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लेख खुप सुंदर आहे