डोळ्यात पाणी येईपर्यंत हसणं आणि शेवटी रडू कोसळण हे खरंच नॉर्मल नाही.
अपर्णा कुलकर्णी
मालती ताई आज बऱ्याच वर्षांनी टीव्हीसमोर बसल्या होत्या. मुकुंदराव बाहेर सामान आणायला गेले होते आणि घरात मालती ताई एकट्याच होत्या. दोघांचे काम करून बराच वेळ हातात शिल्लक रहात असे मालती ताईच्या. त्यामुळे त्या घरातली साफ सफाई करण्यात तर कधी मुकुंदरावांनी हट्टाने बाहेर नेले तर फिरायला जात असत.
पण आज मात्र मालती ताईनी टीव्ही लावला होता. बराच वेळ चेनेल फिरवत फिरवत त्यांची बोटे एका कॉमेडी शो वरती येऊन स्थिरावली. त्यात काही जोड्या होत्या ज्या एकामागे एक येऊन काही वेळ स्किट सादर करत प्रेक्षकांचे मनोरंजन करत होत्या.
मुकुंदराव घरात आले आणि आश्चर्य चकित झाले. मानस गेल्यानंतर इतक्या वर्षांनी प्रथमच मालतीताई टीव्हीसमोर बसल्या हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले त्यात त्या हसत असल्याचे बघून तर मुकुंदरावच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. कारण मानस गेल्यापासून आज प्रथमच त्यांनी टीव्हीला हात लावला होता. त्यांना आठवले मानस आणि मालती दोघे रोज संध्याकाळी एकत्र टीव्ही बघत असत.
आईला आवडते म्हणून मानस मराठी मालिका, कॉमेडी शो बघत असे आणि तिच्या आनंदात आनंद मानत असे. पण तो गेला आणि मालतीताईचे सगळे रूटीन बदलून गेले. मानससाठी रेसिपी बघून काहीतरी नवे बनवणे, त्याच्या कपड्यांना इस्त्री करून ठेवणे, तो ऑफिस मधून आला की त्याच्या सोबत बसून कॉफी पित दिवसभराचा आढावा घेणे आणि काहीतरी वेगळे खायला करून त्याला पोट फुटेपर्यंत खाऊ घालत टीव्ही बघणे हे सगळे मालती कुठेतरी विसरून गेली होती.
तिच्या शेजारी बसत मुकुंद रावांच्या डोळ्यासमोरून क्षणार्धात सगळे क्षण गेले आणि हळूच ते मालतीताईच्या शेजारी बसले. आज कितीतरी वर्षांनी प्रथमच मालतीच्या चेहऱ्यावर हसू बघून मुकुंदराव खरंच समाधानी होते. एक जोडी जाऊन दुसरी जोडी येते. त्यात एक मुलगा आणि आई दोघे मिळून सादरीकरण करत असतात. मुलगा शब्दा शब्दाला आईच्या चेहऱ्यावर काहीतरी बोलून हसू आणत असतो आणि प्रेक्षकवर्ग बघून खरंच खूप हसत असतात. निखळ मनोरंजन करणारा तो कार्यक्रम मालतीताईना हसवून ठेवण्यात यशस्वी होतो.
ती जोडी परफॉर्म करून निघून जाते. मालतीताई खूपच हसतात त्यांच सादरीकरण बघून, इतक्या हसतात की हसून हसून त्यांच्या डोळ्यात पाणी येते आणि अचानक त्या रडायला लागतात. इतक्या रडतात की त्यांना त्यांचे हुंदके अनावर होतात. त्यांची अशी अवस्था पाहून मुकुंदराव आतल्या आत तीळ तीळ तुटतात. मालती ताईंच्या खांद्यावर डोक्यावर हात फिरवत मुकुंदराव त्यांना शांत करत होते
पण त्यामुळे त्यांना अजुनच रडू येत होते. बऱ्याच वेळाने त्या शांत होतात आणि मुकुंदरावांच्या खांद्यावर डोके ठेवून तशाच बसून राहतात. मालू बरं वाटत का ग आता ?? मुकुंदराव विचारतात तसे त्या म्हणतात, आता मेल्याशिवाय मला बरं वाटणार नाही ओ. आता उतारवयात मुलाने आपल्याला खांदा द्यायचा तर त्यालाच खांदा देण्याची वेळ आपल्यावर आली. अशी वेळ वैऱ्यावर पण कधी येऊ नये.
त्या दिवशी किती आनंदात होता आपला मानस. प्रमोशन मिळाले होते त्याला, फोन करून किती आनंदाने त्याने आपल्याला सांगितले होते ते, त्याच्या आवडीचे गुलाबजाम करून ठेवले होते मी त्याच्यासाठी. तो कधी येतो याची आतुरतेने वाट पहात होतो आपण अगदी वेड्यासारखी आणि तो न येता त्याचे पार्थिव घरी आले.
येताना त्याचा असा अचानक झालेला अपघात त्यात क्षणात गेलेला माझा मानस घरी आला. मृत्यूनंतर ही त्याच्या चेहऱ्यावर प्रमोशनचा आनंद जणू काही मला हसून सांगत होता. चेहऱ्यावर कसलीही खंत नाही की तक्रार नाही. तो निघून गेला पण मागे आपण मात्र जीवंतपणी रोज मरण यातना भोगत आहोत त्याच काय ???
शांत हो, शांत हो मालती. मला कळते ग तुझी वेदना पण आता सावर स्वतःला. किती वर्ष त्रास करून घेणार आहेस ?? तू बोलून मोकळी होतेस ग पण तुला असे बघून मी बोलू ही शकत नाही. माझ्यासाठी तरी नको असे करू.
डोळ्यात पाणी येईपर्यंत हसणं आणि शेवटी रडू कोसळण हे खरंच नॉर्मल नाही मालती. तुझे इतक्या वर्षांचे दुःख अशा प्रकारे बाहेर पडले पण तुझा त्रास असा दाबून ठेवत जाऊ नकोस. वेळोवेळी व्यक्त होत जा. अशाने तुला त्रास होईल आणि तुझा त्रास पाहून मलाही.
