Skip to content

सोशल मीडियावर आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल जास्त चर्चा करू नका कारण…

सोशल मीडियावर आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल जास्त चर्चा करू नका कारण…


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे युग मानले गेल आहे. रोज नवनवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहेत. यात सर्वात प्रसिद्ध असलेलं आणि चर्चेत माध्यम म्हणजे सोशल मीडिया. ज्यामध्ये फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम यासारखे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म येतात. आता खूप कमी लोक असतील जी या सोशल मीडियाचा उपयोग करत नसतील. अगदी लहानातील लहान मुलं ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांचे यावर अकाउंट आहेत.

जेव्हा सोशल मीडिया आला तेव्हा असं म्हटलं गेलं की याने लोकांना खूप जवळ आणलं. कारण आधी साधा एक निरोप द्यायचा झाला तरी महिना महिना वाट पाहायला लागायची. साधा एक फोन करायचा झाला तरी अर्ध लक्ष वेळेकडे असायचं. कारण तेवढे पैसे मोजावे लागायचे.

परंतु हे सर्व या सोशल मीडियामुळे कमी झाल. कारण माणूस कितीही लांब गेला असला तरी आपला निरोप, आपला मेसेज सेकंदभरात त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. आपण कोणाशी किती वेळ आता संवाद साधू शकतो. परंतु जसे त्याचे फायदे आहेत त्याचप्रमाणे किंबहुना त्याहून जास्त या सर्वाचे तोटे देखील आहेत.

जरी याने संवाद साधणे सोपे झालं असलं तरी प्रत्यक्षातील संवाद, नातेसंबंध मात्र कमी झाले आहेत. आपल्या समोरच्या व्यक्तीसोबत जेवढ आपण बोललं पाहिजे त्याहून जास्त आपण सोशल मीडियावर सक्रिय असतो. बरेचदा ज्या माणसाशी बोलल जात त्यांना आपण प्रत्यक्षात कधी भेटलेलो नसतो. आपली ओळख पण नसते. जी काही ओळख असते ती यावरच झालेली असते.

अशा या झालेल्या ओळखीमध्ये आपण बरेचदा आपली वैयक्तिक, व्यक्तिगत माहिती पण सांगून टाकतो, त्याबद्दल गप्पा मारतो, चर्चा करतो. परंतु सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं नुकसानीचं, धोकादायक ठरू शकत. कारण जस आधी म्हटलं तसं समोरच्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष कधी भेटलेलो नसतो, पाहिलेलं नसत.

अशा माणसाला आपल्याबद्दल सर्व सांगणं हे धोक्याच ठरत आणि हे फक्त सोशल मीडियावर ओळख झालेल्या व्यक्ती बाबतच नाही तर आपल्या आयुष्यातल्या अनेक व्यक्तींबाबत ही लागू होतं. आपण कितीही विश्वासाने सांगितलं तरी ती व्यक्ती त्या माहितीचा कसाही उपयोग करू शकते. उदाहरणार्थ, चॅट चे फोटो काढून पसरवले जातात त्यातून ब्लॅक मेल केल जात. आपल्या फोटोज् च मोर्फिंग केलं जातं. यासारख्या अनेक गोष्टी घडतात.

आपल्या नकळत आपण अशी बरीच माहिती समोरच्याला देतो ज्याचा ती व्यक्ती गैरफायदा घेऊ शकते. ज्यातून आपण अडचणीत येतो. ज्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. यासंदर्भात टेक केअर गुड नाईट असा मराठी सिनेमा देखील येऊन गेला आहे. ज्यामध्ये सानिका(पर्ण पेठे) ही मुलगी चॅट करताना आपला मित्र गौतम (आदिनाथ कोठारे) याला आपल्या वडिलांचा बँक पासवर्ड सांगून मोकळी होते. ज्याचा उपयोग करून तो नंतर त्यांचे जवळपास ५०लाख रुपये काढून घेतो. सायबर क्राईम वर आधारलेला हा सिनेमा नक्की पाहण्यासारखा आहे.

घरातील अपुरा संवाद, स्वतःबद्दल असलेला न्यूनगंड, इंटरनेटचे, त्यातील आभासी जगाबद्दलचे असेलेल आकर्षण यातून काय काय नुकसान होऊ शकते हे यात अतिशय सुरेखपणे दाखवल गेल आहे. कोणतीही नवीन गोष्ट जरी आपल्या प्रगतीसाठी निर्माण केली गेली असली तरी आपण त्याचा कशा पद्धतीने वापर करतो यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतात.

आताच्या सोशल मीडियाच्या युगात आपल्या आयुष्यातील नेमके खरी नाती कोणती आणि आभासी कोणती हेच आपल्याला कळेनासे झाले आहे. समोरची व्यक्ती कोण आहे, तिच बॅकग्राऊंड काय आहे याचा जराही विचार न करता आपण आपली सर्व माहिती देऊन टाकतो.

म्हणून स्वतःच्या आयुष्यातील प्रत्यक्षातील खरी नाती वाढवा, त्यांना जपा. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलात, समोरचा माणूस कितीही जवळचा वाटत असला तरी विचारपूर्वक बोला, संबंध ठेवा आणि सजग रहा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!