Skip to content

इतरांना ज्या गोष्टी करणं शक्य नाही त्याच करण्याचा अट्टाहास करा, त्यात स्वतःला झोकून द्या.

इतरांना ज्या गोष्टी करणं शक्य नाही त्याच करण्याचा अट्टाहास करा, त्यात स्वतःला झोकून द्या.


मेराज बागवान


यश-अपयश हा आयुष्याचा भाग आहे.प्रयत्न केल्याने यश मिळतेच.पण कधी कधी खूप प्रयत्न करून देखील लवकर यश मिळत नाही.त्यावेळेस नैराश्य येणे स्वभावीकच आहे.मग अशा वेळेस काही जण प्रयत्न करणेच सोडून देतात.त्यामुळे मग ते त्या गोष्टी करणेच सोडून देतात आणि आयुष्याला दोष देत बसतात.

पण ज्यांना आयुष्यात, कारकिर्दीत यश मिळवायचे आहे, स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण करायचे आहे, स्वतःचे एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचे आहे, त्यांनी मग इतरांना ज्या गोष्टी करायला जमल्या नाहीत त्याच करण्याचा अट्टाहास करावा.त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावे.

आयुष्यात प्रत्येकाला यश हवे असते. पैसा कमवायचा असतो.स्वतःची ओळख निर्माण करायची असते.नाव कमवायचे असते.नोकरीत उच्च पदावर पोहचायचे असते.व्यवसाय वाढवून जास्तीत जास्त नफा मिळवायची इच्छा असते.

मग हे सर्व मिळविण्यासाठी, चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करावा लागतो आणि तसे काम करावे लागते.कारण आहे त्याच चौकटीत राहून वेगळे काही करून दाखवता येत नाही.म्हणूनच उंच झेप घ्यायची असेल तर, कर्म देखील त्याच उंचीचे करावे लागते, जे आतापर्यंत कोणीच केले देखील नसेल.

काहींना व्यवसाय करताना कोणत्याही प्रकारचे नावीन्य आणणे जमतच नाही आणि वर्षोनुवर्षे ते तेच करीत राहतात, जे ते सुरवातीपासून करत आलेले आहेत.मग दुसऱ्या एका सारखाच उद्योग करणाऱ्या व्यावसायिकाला मात्र नेहमी नावीन्य आणणे आवडत असते.

मग त्याने असे काही तरी केले पाहिजे जे आतापर्यंत इतर कोणत्याच व्यावसायिकाने केलेले नव्हते.’आउट ऑफ दी बॉक्स’ जाऊन त्याने विचार केला पाहिजे की , मी माझ्या उत्पादनांची जाहिरात आणखीन कोणत्या वेगळ्या प्रकारे करू शकतो ? ग्राहकांना आणखीन कोणत्या पद्धतीने चांगल्या सेवा देऊ शकतो, जेणेकरून ग्राहक आपल्याकडे आकर्षिले जातील.

अशा प्रकारे त्याने प्रत्येक अंगाने विचार केला आणि स्वतःला त्यात झोकून दिले, आपले सर्वोत्तम दिले तर अशक्य असे काहीच नाही.फक्त कष्ट करण्याची आणि स्वतःला त्या कामात पूर्णपणे झोकून देण्याची इच्छा हवी.

नोकरीत देखील स्पर्धा असते.कार्यालयात काम करीत असताना , अनेक सहकारी आपल्यासोबत असतात.तसे पाहायला गेले तर आपण स्वतःच स्वतःशी स्पर्धा केली पाहिजे.पण आपल्याला उच्च पदावर पोहचायचे असेल , तर नक्कीच काही तरी वेगळे करून दाखवता आले पाहिजे, जे आतापर्यंत कोणीच करून दाखविलेले नाही.

जर , दैनंदिन कामाव्यतिरिक्त आपण त्यापलीकडे जाऊन काहीच करत नसू, तर आपण कायम आहे तिथेच राहू, आणि विशेष अशी काहीच प्रगती करू शकणार नाही.पण जर आपण रोजचे काम सोडून , अजून जादाचे आणि सर्वांच्या उपयोगाचे, फायद्याचे काम करणार असू तर नक्कीच संस्था आपल्या कार्याची दखल घेईल आणि आपण देखील आपल्या कारकिर्दीत मोठे यश संपादन करू शकू यात शंका नाही.फक्त या सगळ्यासाठी हवा एक वेगळा दृष्टिकोन, स्वतःला झोकून देण्याची वृत्ती , मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन.

आयुष्यात कोणतीही परीक्षा असो ,नोकरी अथवा व्यवसाय असो , कष्टाशिवाय पर्याय नाही. फक्त कष्ट देखील उपयोगाचे नाहीत.तर त्या कष्टासोबत वेळेनुसार ‘स्मार्ट वर्क’ देखील गरजेचे आहे.तसेच आपले उद्दिष्ट साध्य करता करता, इतरांना मदत करण्याची भावना देखील असणे जरुरीचे आहे.

कारण आपल्याला जरी जगावेगळे काम करून दाखवायचे असेल तरी ,आपण फक्त एकटे पुढे नाही गेले पाहिजे , तर ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना देखील मदत केली पाहिजे, मार्गदर्शन केले पाहिजे. कारण ‘अहंकार’ जर एकदा मनात निर्माण झाला की अपयश हळूहळू आयुष्यात प्रवेश करू लागते.म्हणूनच नेहमी ‘पाय जमिनीवर ठेवून’ राहता आले पाहिजे.

जेव्हा आपण कोणतेही काम हाती घेतो, तेव्हा ते काम पूर्वीपेक्षा आणखीन कोणत्या वेगळ्या पद्धतीने करता येईल, जेणेकरून ‘अफलातून यश’ मिळेल याचा विचार केला पाहिजे.आणि मग त्यानुसार कार्यपद्धतीत बदल करून , योग्य ती कार्यप्रणाली आखून कामकाज करता आले पाहिजे.त्या कामात तोचतोचपणा टाळून नावीन्य आणता आले पाहिजे.

एक काम अनेक प्रकारे करता येऊ शकते.पण मोठे यश मिळवायचे असेल , जे आतापर्यंत कोणीच मिळवू शकलेले नाही, तर मग चाकोरीबाहेर जाऊन नवीन गोष्टी अंगीकारता आल्या पाहिजेत. नवीन गोष्टींचा कायम ध्यास घेता आला पाहिजे, तर आणि तरच आपण जगावेगळ्या गोष्टी मिळवू शकू.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘बदल’ स्वीकारता आला पाहिजे.कोणतीच परिस्थिती कायम नसते.आणि आजच्या स्पर्धेच्या युगात टीकायचे असेल तर काळानुरूप बदलता आले पाहिजे.जुन्याच तंत्रज्ञानाला सदैव बिलगून न राहता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करता आले पाहिजे.नवीन तंत्रज्ञान शिकून घेता आले पाहिजे.आणि आपण हे करू शकलो तर आपण वेगळ्या गोष्टी करु शकू आणि यशस्वी होऊ शकू.

जे काही कार्य हाती घेतले आहे ते पूर्णत्वास जाईल असा विश्वास कायम मनात असावा.आणि तशी कृती देखील हवी.आणि हाती घेतलेले काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून देता आले पाहिजे.तर आणि तरच अशक्य गोष्टी शक्य होतील.तसेच ‘कनसिस्टन्सी’ हवी.उद्दिष्ट साध्य होईपर्यंत, थांबलेच नाही पाहिजे. जिथे जिथे वाटेल की ,आपल्याला मार्गदर्शन आवश्यक आहे तिथे तिथे नक्कीच इतरांची, वरिष्ठांची मदत घेतली पाहिजे.

आयुष्यात प्रत्येक गोष्ट शक्य आहे. काही तरी मिळविण्याची मनातील आग फक्त विझू देऊ नका.आपले मन जे इच्छा धरते, जे जे आपण विचार करतो तस तसे आपण नक्कीच बनू शकतो.म्हणून, विचार असे ठेवा की मोठे यश संपादन करून आयुष्याला एक नवी कालाटणीच मिळाली पाहिजे.

परिस्थितीला दोष देण्याऐवजी जर वेगळा दृष्टिकोन ठेवला , स्वतःला एखाद्या गोष्टीत झोकून दिले तर नक्कीच वेगळे यश, गोष्टी आपण आयुष्यात कमवू शकू.म्हणून सदैव मनात विश्वास ठेवा की ,”मी अशक्य गोष्टीच करणार आणि त्यात त्यात स्वतःला झोकून देणार”.मग पाहा , संबंध सृष्टीच तुम्हाला हवी असणारी गोष्ट मिळाविण्यासाठी तुमची सहायता करेल.

विश्वासाला, इच्छेला कृतीची जोड द्या.झोकून देऊन ‘वेगळे’ असे काहीतरी करून दाखवाच.

‘ऑल दि बेस्ट’!!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “इतरांना ज्या गोष्टी करणं शक्य नाही त्याच करण्याचा अट्टाहास करा, त्यात स्वतःला झोकून द्या.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!