Skip to content

दिवसाची सुरुवात ही कालच्या तुटलेल्या दुःखांनी करू नका.

दिवसाची सुरुवात ही कालच्या तुटलेल्या दुःखांनी करू नका.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


एक गाव होत. गावातील लोक श्रद्धाळू, धार्मिक प्रवृत्तीची तशीच माणुसकी जपणारी होती. येणाजाणाऱ्या वाटसरूला मदत करणे, अडीअडचणीला धावून जाणे असा इथल्या लोकांचा स्वभाव होता. त्यांचे गुण जरी चांगले असेल तरी प्रत्येकाच्या वाट्याला कष्ट, त्रास, चढ उतार हे होतेच आणि ते कोणाला चुकणार होते? पूर्ण सुखी आयुष्य असतच कोणाचं? पण तरीही हे त्रासांनी, दुखांनी भरलेले जीवनही कोणाला नको असत. सर्वांना आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण हवेच असतात. बऱ्याचदा ते कसं मिळवायचं याची उत्तरच मिळत नाही. त्रास वाढतो तो तिथे.

गावात पण काहीशी तशीच परिस्थिती होती. एक दिवस या गावात एक साधू आले. गावच्या वेशीवर त्यांचं काही दिवस वास्तव्य होत. गावातील लोकांना जेव्हा त्यांच्याबदल समजलं तेव्हा ते त्यांना भेटायला गेले. सर्वांनी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि तिथेच थांबले कारण सर्वांचे काही ना काही प्रश्न होते. गावकरी साधूच्या समोर बसले होते. प्रश्न चालूच होते आणि त्यातच एकाने साधूला प्रश्न विचारला, “महाराज आम्ही इतके कष्ट करतो, काम करतो तरी आमच्या आयुष्यातल दुःख काही कमी होत नाही बघा! सारखं काही ना काही होत राहत.

अश्या वेळी सुखाने जगायचं कसं हेच समजत नाही. कारण समोर हे सर्व दिसत. कष्टाला आमची ना नाही. पण मग त्यातून सुध्दा आम्ही आनंदात कसं राहायचं. त्यासाठी काय केलं पाहिजे?” साधूने एक क्षण त्याच्याकडे पाहिलं, व नंतर ते बोलू लागले, “तुझ्या प्रश्नांचे उत्तर तुला मिळेल, पण त्याआधी तू मला एका प्रश्नाचे उत्तर दे! देशील. ती माणूस हो म्हणाला. साधूने विचारलं, मला सांग, समजा तुझ्या घरातलं एखाद भांडं फुटलय, त्याला तडा गेलाय आणि दुसऱ्याच दिवशी तुझ्याकडे वाटसरू आला मग अश्या वेळी तू त्याला त्या फुटलेल्या भांड्यातून खायला देशील का?” त्यावर तो गावकरी म्हणाला, “महाराज, अस कस करेन मी? वाटसरुला मी तडा गेलेल्या भांड्यातून कसं काही देईन?

कारण घरात येणारा वाटसरू देवासमान असतो. मुळात ती भांडी तुटल्यावर मी त्यांना घरात ठेवणारच नाही. कारण त्यांचा काही उपयोग होणार नाही. आणि वाटसरुला मी त्यातल्या त्यात चांगल्या भांड्यातून देईन, निदान प्रयत्न तरी करेन.” साधूला असच काहीस अपेक्षित होत. ते त्या माणसाला म्हणाले, “तू जर वाटसरूला भांडं देताना इतकी काळजी करत असशील, तर तोच नियम तुझ्या आयुष्याला लागू होत नाही का? त्या माणसाला काही समजेना. तो म्हणाला महाराज म्हणजे काय करायचं? साधू म्हणाले, अरे तुटलेल्या भांड्याला तू घरात ठेवू शकत नाही तर मग झालेल्या गोष्टींना, त्रासांना, दुःखांना उरात बाळगून सुख कसं मिळेल? आधी झालेल्या गोष्टी मनात ठेवून पुढचा आनंद मिळवता येईल का? त्यासाठी झालेल्या गोष्टींना तिथेच सोडून द्यायला नको.

ते जेव्हा तिथेच सोडून द्यायला शिकाल तेव्हा जीवन सुखी होईल.”प्रत्येक दिवस हा नवीन आशा, नवीन स्वप्न घेऊन येत असतो. आणि हे आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व गोष्टीतून जाणवत. निसर्ग देखील आपल्याला हेच दाखवत असतो. म्हणून तर आदल्या दिवशी कितीही अंधार झाला असला, काळोख झाला असला तरी दुसऱ्या दिवशी पहाट ही होतेच. सूर्याची किरणे नवीन प्रकाश घेऊन येत असतात, सर्व आसमंत उजळून टाकत असतात. निसर्गाकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात.

पण आपण तिकडे लक्ष देत नाही. आपण आपल्यातच गुंतून पडतो. अस न करता आजूबाजूला पाहिले पाहिजे. त्यातून शिकले पाहिजे. तुम्ही झाडाकडे कधी निरखून पाहिले आहे का? झाड जसजसे मोठे होते तश्या त्याला कळ्या येतात त्याची नंतर फुल देखील होतात. काहीवेळा अस होत की एखादी कळी न उमलता गळून पडते किंवा तिची वाढच खुंटते.

पण म्हणून ते झाड वाढायच थांबत का? बाकीची फुल यायची राहतात का? नाही. गेलेल्या कळीच दुःख असणारच आहे. पण त्यातच जर गुंतून राहील तर झाडाची वाढ होईल का? नाही. ते खुरटल्यासारख होईल. म्हणूनच आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यात नवीन उमेदीची, आशेची फुल उमलवायची असतील तर आधीच्या तुटलेल्या गोष्टींना विसराव लागेल. त्यांना मागे टाकून आयुष्याची एक नवीन सुरुवात करावी लागेल, दिवसाची एक नवीन सुरुवात करावी लागेल.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!