“धावणाऱ्या वेळेसोबत स्वतःला बदलत राहा, तरच बऱ्याच गोष्टी स्थिर राहतील.”
मधुश्री देशपांडे गानू
श्रीधरपंत गेले आणि मालतीबाई एकट्या पडल्या. सगळं आयुष्य आंजर्ले या छोट्या गावात नारळ सुपारी आंबा यांची वाडी सांभाळण्यात गेलं त्यांचं. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या मालतीबाईंना या पलीकडे फारशी जगाची माहिती नव्हती. एकुलता एक लेक प्रथमेश उच्च शिक्षणासाठी पुण्यात गेला आणि तिथेच कायमचा सेटल झाला. सून अर्पिता ही उच्चशिक्षित, नोकरी करणारी आणि सुस्वभावी होती. दोन गोड नातवंडं. श्रेया आणि पार्थ. वर्षातून एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत आंजर्ल्यास यायची सगळी. तेच काय ते भेटणं, कौतुक सोहळा. बाकी आधी पत्र आणि आता फोन यावर संवाद चाले. पण सगळ्यांना एकमेकांविषयी माया होती.
आता मालतीबाईंचा एकटीने राहण्याचा प्रश्न आला. सगळे व्यवहार श्रीधर पंतांच्या हातात. या एकट्या कशा सांभाळणार? शेवटी व्यवहारी निर्णय घ्यावा लागला. त्यांनी यशस्वीपणे सांभाळलेली घर वाडी, प्रेमाने केलेलं आलेलं गेलेलं सगळं विश्वासू माणसांच्या हातात सांभाळायला देऊन त्या कायमस्वरूपी पुण्याला लेकाकडे राहायला आल्या.
कधीही स्वतःचं गाव न सोडलेल्या मालतीबाईंना हा अचानक झालेला भौतिक, शारीरिक, मानसिक, बाह्य बदल स्वीकारणं जड गेलं. स्वतःच्या घरची मालकीण असण्याची बात काही औरच असते. तरीही त्यांनी हा बदल सकारात्मकतेने स्वीकारला. प्रथमेश, अर्पिता, मुलं यांनीही त्यांना प्रेमाने, आदराने सामावून घेतलं. मोठ्या घरात जागेबरोबरच त्यातल्या माणसांची मनंही फार मोठी होती. पण एकूणच सगळ्या बदलांना मालतीबाईंना सामोरे जावंच लागलं.
हवामान, वातावरण, धावपळीचे जीवन, प्रत्येकाचं ठरलेले रुटीन, येणारे जाणारे, कामाचा वेग, जेवणाच्या वेगळ्या वेळा या सगळ्या बदलांना स्वीकारून त्यात सामावतांना त्यांना वेळ लागलाच.. पण त्यांनी हे बदल आपलेसे केले. गरजेपुरता मोबाईल शिकून घेतला. ज्येष्ठ नागरिक संघात नाव घातलं. तिथल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. कधी नव्हे ते स्वतःच्या आवडीनिवडीसाठी सवड काढली. कधीतरी सहल, हॉटेलिंग याचीही सवय करून घेतली. प्रचंड बदललेल्या वेगवान पुणे शहराशी त्यांनी जमेल तेवढं जमवून घेतलं. इथे त्यांना नवीन मैत्रिणी ही मिळाल्या. एकूण एका वाईट घटनेने आयुष्यात सर्वार्थाने झालेला बदल त्यांनी मनापासून स्वीकारला. आणि स्वतःच्या आयुष्यात आरोग्य, मनःशांती, समाधान, आनंद या महत्त्वाच्या गोष्टी स्थिर केल्या.
माणसाच्या आयुष्यात बदल अनिवार्य आहे. तुमची इच्छा असो वा नसो बदल होणारच. आणि ते स्वीकारावे ही लागणार. तर आणि तरच तुम्हीं या प्रवासात पुढे जाऊ शकता. आज तर सर्वांगीण भरधाव वेगाने बदल होत आहेत. तंत्रज्ञान, बाह्य बदल, भौतिक सुख साधनं, सतत बदलणारे ट्रेंड्स, सामाजिक परिस्थिती, राजकारण, अर्थकारण या सगळ्यांमध्ये एवढे बदल होत आहेत. आणि तरीही ते आपल्याला स्वीकारावे ही लागत आहेत.
म्हणजे मी नेहमी गंमतीने म्हणते की, “आमची पिढी आणि आमच्या आधीची पिढी यामध्ये एका पिढीचे अंतर होतं. पण आमची पिढी आणि आत्ताची तरुण पिढी यामध्ये चार पिढ्यांचे अंतर आहे.” साधारण २००० सालापासून जागतिक पातळीवर सगळेच बदल फार वेगाने होत आहेत. आज दोन वर्ष कोरोनाला सगळ्या जगाने तोंड दिल्यानंतर आजचे आपण अंतर्बाह्य किती वेगळे आहोत ना! तुम्हांला होणारा बदल आवडो वा ना आवडो स्वीकारावा लागतोच. दुसरा पर्याय नाही.
जर तुम्हीं वेगाने होणाऱ्या बदलांप्रमाणे स्वतःला लवचिक ठेवलं नाहीत तर तुम्हीं यशस्वी जगू शकत नाही. अशाच अचानक बदलांना स्वीकारता न आल्याने आज अनेक जण नैराश्य ग्रस्त, चिंता, ताणग्रस्त निद्रानाश आणि अनेक शारीरिक, मानसिक आजारांना बळी पडत आहेत. काही आत्महत्या करायला प्रवृत्त होत आहेत. पण हा कशाही वरचा मार्ग होऊ शकत नाही. बदल स्वीकारणे आणि त्याच्या सकट आपल्या आयुष्यात मार्ग काढणे, पुढे चालत राहणे हेच खरे यश आहे.
बहुतेक वेळा माणसं बदल स्वीकारायला तयार नसतात. कधी अहंकार, कधी आडमुठेपणा काहीही असो. बदल मग वैयक्तिक पातळीवर, सामाजिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक, भावनिक कोणत्याही पातळीवर असू शकतो. पण कोणताही असा बदल तुम्ही टाळू शकत नाही. त्यापासून लांब पळू शकत नाही. उलट त्याचा सामना करून, त्याचा स्वीकार करून त्यातून आपल्या चांगल्यासाठी काय करता येईल ते ते करणे हेच शहाणपण आहे.
आता बदलाचे काही सकारात्मक परिणाम पाहू.
१) बदल हा आपल्या वैयक्तिक प्रगतीचा मूलभूत भाग आहे.
२) होणाऱ्या वेगवान बदलांचं तुम्हीं स्वागत करायलाच हवं.
३) अत्यंत मौल्यवान असे जीवनाचे कौशल्य म्हणजे बदल.
४) जेंव्हा तुम्हीं स्वतःबद्दल, स्वतःच्या आयुष्याबद्दल दुःखी, असमाधानी असता, तेव्हा ते बदलण्याचा प्रयत्न करता ना!
५) बाह्य परिस्थितीतील बदल तुम्हांला अंतर्बाह्य बदलू शकतात.
६) बदलामुळे जीवनात एक प्रकारचे आकर्षण, उत्कंठा टिकून राहते.
७) बदलांमुळे नवीन संधी, नवीन अनुभव मिळतात.
८) तुम्हीं तुमची सध्या नकोशी असलेली परिस्थिती बदलू शकता.
९) तुमचा भूतकाळ तुम्हांला मागे खेचतो. पण त्याला मागे टाकून नवीन बदल स्वीकारून पुढे जाणं ही हळूहळू होणारी पण स्थिर प्रक्रिया आहे.
१०) रोजच्या दैनंदिन जीवनात तुम्हीं स्वतः मध्ये बदल करून प्रगती करू शकता.
११) पुन्हा एकदा, बदल अनिवार्य आहे. त्याशिवाय आपण जगू शकत नाही.
१२) सकारात्मक आणि कल्पक लवचिक विचारधारेने आपण बदल प्रत्यक्षात आणू शकतो.
१३) रोजच्या कंटाळवाण्या रुटीनमध्ये बदल अत्यावश्यक आहे.
यासाठी आवडत्या आणि नावडत्याही बदलांना समर्थपणे सामोरे जा. आणि तुमचे जीवन गतिमान, सुकर, समृद्ध, यशस्वी, आनंदी, समाधानी असे स्थिर आणि सुरक्षित होण्यासाठी नक्की प्रयत्न करा….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
