चुकीच्या वागण्यामागे काय कारण आहे, हे समजून घेणं म्हणजे प्रेम!
मेराज बागवान
‘प्रेम’, काय लिहावे ह्या प्रेमाबद्दल.ही आहे खरी अदृश्य गोष्ट.पण ही गोष्ट अशी आहे जी जाणून घ्यावी लागते, अनुभवावी लागते, कारण प्रेम ही भावना आहे.जी आतून येते, हृदयातून येते आणि मनात नेहमी रुजत जाते. प्रेम ह्या गोष्टीला स्पर्श करता येत नाही.पण आपले विचार, आपले मन,भावना; प्रेम ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगत असतात आणि प्रेमात असणारी व्यक्ती हे सर्व जाणून तशीच कृती करीत असते.
ह्या लेखात आपण ह्या विषयीच जाणून घेणार आहोत.प्रेमात इतकी ताकद असते की आपली जवळची व्यक्ती चुकीचे का वागत आहे, किंवा चुकीची का वागली हे सुद्धा आपण प्रत्येकवेळी समजून घेऊ शकतो आणि त्याला कारण असते ते प्रेम.प्रेम ही खूप सकारात्मक भावना आहे जी माणसाला माणसाशी धरून ठेवते.
प्रेम ही काही कोणती अवघड गोष्ट नाही, प्रेम ही तर खूप साधी, सोपी व्याख्या आहे. अगदी साधी साधी उदाहरणे आपण पाहुयात.मुले-मुली कधी कधी आपल्या पाल्यांशी खोटे बोलतात, काही गोष्टी लपवतात.आणि जेव्हा त्या गोष्टी पालकांना समजतात तेव्हा प्रथम ते नाराज जरूर होतात.पण दुसर्याक्षणी विचार करतात की, ‘अरे आपल्याशी कसे बोलावे हे माझ्या मुलीला समजत नसेल, आदरापोटी मुलगा बोलायला बिचकत असेल किंवा जनरेशन गॅप मुळे देखील आपली मुले आपल्याशी उघडपणे बोलत नसतील, बाकी त्यांना आपल्याला फसवयाचे कधीच नव्हते.’आई-वडील असा विचार करून नेहमी आपल्या पाल्यांना समजून घेत असतात आणि ह्यालाच प्रेम म्हणतात.
मित्र-मैत्रिण असतात.कधी त्यांची छोट्या छोट्या कारणांवरून भांडणे होतात. पण थोडा वेळ गेला की त्यांना वाटू लागते,अरे आपण उगाच त्याला इतके बोललो.तो आधीच त्रासात,ताणात आहे आणि मी त्याला उगाच डिस्टर्ब केले.त्यामुळेच तो इतका चिडला.आणि मनोमनी त्याला अपराधी वाटू लागते.हे सगळे तो समजून घेऊ शकला कारण त्याला त्याच्या मित्राबद्दल आस्था, प्रेम,आपुलकी होती.
प्रियकर-प्रेयसी,नवरा-बायको, यांची भांडणे तर नेहमीचीच जणू.स्वभाव जरी वेगळे असले तरी ती फक्त एकमेकांसाठीच बनलेली असतात. कधी नवरा रुसून बसतो, तर कधी बायको हट्टी बनून जाते. पण थोडा काळ गेला की जाणवायला लागते, अरे आपण उगाच इतके ताणत गेलो. मग अबोला जरी असला तरी देखील त्या व्यक्तीला पूर्ण पाठिंबा, मदत करण्याची दुसऱ्याची कायम तयारी राहते.मग ते एकमेकांसाठी जेवण करायला थांबणे, किंवा न काही बोलता काही तरी भेटवस्तू आणणे अशा काही गोष्टी आपोआप घडू लागतात आणि ह्यालाच प्रेम असे नाव असते.
अशा अनेक गोष्टी घडतात, कार्यालयीन जीवनात, कुटुंबातील इतर व्यक्तींसमवेत ,इतर आप्तजनांबरोबर.रक्ताच्या-बिनरक्ताच्या कित्येक नात्यांमध्ये प्रेम हे असतेच.आणि जिथे प्रेम असते तिथे समजूतदारपणा देखील असतोच.नात्यांमध्ये अनेक चढ-उतार चालू असतात.वाद-विवाद होतात,कलह होतात.पण खरे नाते तेच असते जे समजून घेते.कठीण काळात नेहमी उपलब्ध असते.चूक जरी झाली, तरी ती चूक त्या व्यक्तीकडून का झाली हे जे नाते समजून घेवू शकते तेच खरे प्रेमाचे नाते असते.
अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्ती आपल्याकडून नकळत दुखावल्या जातात.आपण त्यांना पटकन काही तरी बोलून जातो.त्यांच्या मनाला ती गोष्ट खूप लागते.आपण बोलून गेलेलो असतो.पण तरी देखील ती दुसरी व्यक्ती आपले दुःख बाजूला ठेवून असा विचार करते ,’काही तरी त्याची अडचण असेल, जबाबदारी असेल, कसलं तरी टेन्शन असेल,मला त्रास नको म्हणून ती मला सांगत नसेल आणि म्हणून अशी वागत आहे’.आणि जी व्यक्ती आपल्याला असे समजून घेते तिचे खरेच आपल्यावर प्रेम असते.
दोन व्यक्ती शरीराने जरी दूर असल्या तरी प्रेम आणि समजूतदारपणा त्या दोघांना बांधून ठेवत असतो. जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीचीच असते.पण चूक दाखवून देखील पुन्हा त्या व्यक्तीला समजून घेणे म्हणजे प्रेम असते.स्वतःपेक्षा जास्त समोरच्याची काळजी असणे म्हणजे प्रेम असते. स्वतःला आतून कितीही त्रास होत असला तरी देखील त्याकडे लक्ष न देता समोरच्याला मदत करणे, गरजेला उपयोगी पडणे म्हणजे प्रेम असते. समोरची व्यक्ती कोणत्या त्रासातून ,समस्येतून जात आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे त्याला सर्वोतोपरी मदत करणे म्हणजे प्रेम असते.
अनेकदा एकतर्फी प्रेमात देखील काही व्यक्ती अशा असतात की, त्याला माहित असते त्या व्यक्तीचे त्यांच्यावर प्रेम नाही.ज्या काही भावना आहेत ते फक्त त्यांच्याच मनात आहेत.आणि हे सर्व माहीत असूनही त्या व्यक्तीला मदत करणे,समजून घेणे, वेळपरी स्वतःचा स्वाभिमान देखील थोडा वेळ बाजूला ठेवणे ,अडचणीत नेहमी उपलब्ध असणे ,ती व्यक्ती आपल्याशी काही समस्या आहे म्हणून बोलत नाही हे सर्व ही व्यक्ती समजून घेते.कारण तिचे प्रेम जरी एकतर्फी असले तरी ते खरे आणि निस्वार्थी असते.
तर अशी ही महती आहे समजूतदारणा आणि प्रेमाची. अनेकजण म्हणतात प्रेम माणसाला कमजोर बनवते.खूपच भावुक बनवते.पण खरे तर प्रेम माणसाला निस्वार्थी बनवते.एक प्रकारची ताकद देते, आणि ही ताकद त्या व्यक्तीसाठी सर्व काही करण्यास एक प्रकारची प्रेरणा देते.त्या व्यक्ती खूप नशीबवान असतात, ज्यांना एकमेकांप्रति प्रेमाची भावना असते. दोन्हीकडून प्रेम असले की आयुष्ये सुरळीत होतात.पण ह्याहीपेक्षा त्या व्यक्ती जास्त नशीबवान असतात ज्यांच्या आयुष्यात प्रेम हे कायम एकतर्फी असते. कारण अशा व्यक्तींनाच खरे प्रेम काय असते ते ठाऊक असते.
प्रेम कसेही असो,एकतर्फी वा दूतर्फी, प्रेम हे प्रेमच असते. आणि हे प्रेम खऱ्या अर्थाने तेव्हांच बहरते जेव्हा त्या प्रेमाला समजूतदारपणाची जोड लाभते.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

खुपच सुंदर लेख आहे..
खरोखरच वास्तवात प्रेम हे असेच आहे.
प्रेमाची भाषा मुक्की आहे.
आणि ती फक्त नजरेने बोलली जाते.
आणि ति फक्त आणि फक्त ह्रदयालाच समजते…👌👌