“चुकीच्या लोकांकडून काहीतरी चांगलं घडण्याची अपेक्षा ठेवू नका, हेच तुमच्यासाठी चांगलं असेल.”
मधुश्री देशपांडे गानू
दिवेलागण झाली तरी अनु तशीच खुर्चीत बसून होती. तिचं डोकं सुन्न झालं होतं. इतकं कसं कोणी भावनाशून्य, पराकोटीचं वागू शकतो?? अनु स्वतःच्या आयुष्याचा फ्लॅशबॅक चित्रपट पाहत होती. सामान्य, निम्न मध्यमवर्गीय घरातील मुलगी. जन्मापासूनच डाव्या पायात दोष त्यामुळे लंगडत चालायची. बाकी नाकीडोळी नीटस, कामसू. अभ्यासात मात्र फार हुशार नाही पण पास होत होती. आई-वडिलांना तिन्ही मुलींमध्ये हिचीच जास्त काळजी होती. त्यामुळे दहावी झाल्यावर शिक्षणाच्या मागे न लागता हिचं लवकर लग्न उरकावं असाच त्यांचा हेतू होता. आणि झालंही तसंच. मध्यमवर्गीय घरातील दहावी पास अमोलचं स्थळ चालून आलं. त्याला कायमस्वरूपी सरकारी नोकरी होती. आणि फार विचार न करता आई-वडिलांनी अनुचं लग्न अमोल बरोबर लावूनही दिलं.
अमोललाही एका कानाने कमी ऐकू यायचं. पण संसार मात्र दोघांनी नेटाने, समाधानाने केला. त्यांना एक मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी आनंद ठेवलं. त्यांच्या आयुष्यात तो आनंद घेऊनच आला होता. अशा आई-वडिलांचा पूर्ण नॉर्मल असणारा मुलगा म्हणून, आई-वडील, आजी आजोबा सगळीकडून त्याचे लाड होऊ लागले. अगदी त्याच्या वयाला न साजेशा वस्तूही त्याला खेळ म्हणून मिळत. जास्त करून अमोलचे आई वडील आनंदचे फारच आवाजवी, फालतू लाड पुरवत असत. नकळत्या वयातही त्याला घरच्या, बाहेरच्या सगळ्या गोष्टी सांगत. त्यामुळे त्याला त्याची सवयच लागली. जसा तो मोठा होऊ लागला तसा त्याचा आगाऊपणा, उद्धटपणा वाढू लागला.
प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक महत्त्वाच्या, गंभीर बाबीतही तो लक्ष घालू लागला. आणि हे कोणालाच खटकत नव्हतं. जणूकाही तोच कर्ताधर्ता होता.
आई वडील, आजी आजोबा यांना उलट बोलणं, घरात कोणतेही काम न करणं, फक्त छानछोकी कपडे घालून बाहेर वेळीअवेळी फिरणं हे राजरोसपणे चालू झालं. वीस वर्षांचा आनंद आता कोणालाही ऐकत नव्हता. अमोल आता रिटायर झाला होता. त्याच्या साठवणुकीच्या पैशावर घर चालू होतं.
आनंद मात्र आई-वडिलांना न जुमानता वाटेल तसा पैसा उधळू लागला. महागडी बाईक, कपडे, घड्याळं, इलेक्ट्रॉनिक वस्तू हे तो धाकधपटशाने अमोल आणि अनु कडून पैसा उकळून मिळवत असे. त्यांना न सांगता त्यांचेच एटीएम कार्ड वापरून घरात महागड्या वस्तू खरेदी करत असे. या सगळ्याचा अमोल आणि अनुला फारच त्रास होऊ लागला. जाब विचारला असता त्याने एक दोनदा अमोलवर हातही उगारला होता. आजही असाच प्रसंग घडला होता. आणि आनंद असेच पैसे उचलून आईला ढकलून निघून गेला होता.
आणि अनु निश्चल बसून राहिली. पोटचं पोर इतकं पातळ यंत्री, भावना शून्य कसं असू शकतं? याचं तिला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. रडून रडून डोळे सुजले होते. पण आता त्याचा काहीच उपयोग नव्हता. त्याचे लाड करण्याचा तिला आता पश्चाताप होत होता. चूक तिची होतीच. योग्य संस्कार करण्यात सगळेच कमी पडले होते. आपलं म्हातारपण कठीण, अंधकारमय आहे, हे तिला जाणवत होतं.
पण आता आनंद कडून चांगलं वागण्याची अपेक्षा ठेवणं अगदीच चूक होतं. त्याचा काहीच उपयोग नव्हता. आपल्या आणि आजी आजोबांच्या अति लाडाने चुकीच्या मार्गावर गेलेल्या आनंद कडून काहीतरी चांगलं घडण्याची अपेक्षा ठेवणंच चूक होतं. कधीतरी तो बदलेल, चांगला वागेल या आशेवर जगण्यापेक्षा यापुढे ठाम वास्तववादी निर्णय घेणे गरजेचे होतं. आणि अनुने आणि अमोलने तो घेतला. कधीही स्वतःची मिळकत, स्थावरजंगम आनंद च्या नावावर न करण्याचा. त्याला घरात यापुढे थारा न देण्याचा कटू पण ठाम निर्णय त्या दोघांना घ्यावा लागला. आणि म्हणून आता उरलेले दिवस तरी शांतपणे जगू असा विश्वास त्यांना वाटू लागला.
वाचक हो खरं तर माणूस पूर्णपणे वाईट किंवा चांगला नसतो असं आपण म्हणतो. चूक आणि बरोबर या सुद्धा व्यक्तीसापेक्षा संज्ञा आहेत. पण खरंच जी माणसं तुमच्याशी चुकीची वागतात त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणंच तुमच्यासाठी चांगलं असतं. अशा माणसांना तुमच्या विचारांमध्ये, मनामध्ये, कृतीत कधीच थारा देऊ नका. मुळात तुमच्याशी चुकीचं वागणाऱ्या लोकांकडून काहीतरी चांगलं घडण्याची, ते तुमच्याशी चांगलं वागण्याची अपेक्षाच करू नका. अशांपासून तातडीने, कायमचे दूर व्हा. तुमच्या मनःशांती साठी तेच चांगलं आहे.
उदाहरणार्थ तुम्हीं तुमच्या आयुष्यात यशस्वी, श्रीमंत, सुखी होण्यासाठी एखादा मार्ग निवडता. नवीन व्यवसाय सुरू करता तेंव्हा दहा पैकी नऊ लोक तुम्हांला नाव ठेवणारी असतात. तुमच्याबद्दल खोटं-नाटं पसरवणारी, तुमच्या माघारी गॉसिप करणारी असतात. उगाचच तुम्हांला बदनाम करणारी माणसं ही तुमच्यावर प्रचंड जळत असतात. मत्सर, ईर्षा, हेवा, असुया या नकारात्मक भावनांनी पछाडलेली माणसं अशीच वागतात. यात अगदी तुमचे जवळचे नातलग, मित्र, मैत्रिणी म्हणवणारी ही असतात.
आपण आपलं माणूस म्हणून अशांकडून कौतुकाची, प्रोत्साहनाची, शाबासकीची अपेक्षा ठेवतो आणि तिथेच आपण चुकतो. मुळात कोणाही बद्दल अशा अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे आणि सच्चेपणाने आपलं काम करत राहायचं. यश खात्रीने आणि नक्की मिळतच मिळतं. “अशा चुकीच्या माणसांकडून काहीतरी चांगलं घडण्याची अपेक्षा करून आपला मौल्यवान वेळ आणि मौल्यवान ऊर्जा कधीच वाया घालवायची नाही. हेच आपल्या यशस्वीतेसाठी चांगलं असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. मराठीमध्ये “अनुल्लेखाने मारणे” असा सुंदर चपखल वाक्प्रचार आहे. अशा लोकांचा चुकून सुद्धा उल्लेखही करायचा नसतो.
तुम्हीं यशस्वी झालात की अख्खं जग तुमचं कौतुक करतंच..मग या थोडक्या नकारात्मक चुकीच्या लोकांना महत्त्व का द्यायचं??? नाहीच द्यायचं. आपला यशस्वी, आनंदी, सुखी राहण्याचा मार्ग आपणच अशा चुकीच्या लोकांना बाजूला करून बिनधोक सुंदर बनवायचा.. हो ना!
ळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

