Skip to content

चुका स्वीकारण्याची तयारी असेल तर माणसं गमावण्याची वेळ येत नाही.

चुका स्वीकारण्याची तयारी असेल तर माणसं गमावण्याची वेळ येत नाही.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आपल्याला कधी आपल्याओळखी विषयी प्रश्न पडला आहे का? मी कुठे काम करतो? माझ्या नावाव्यक्तिरिक्त सुध्दा माझी आयडेंटिटी काय आहे? मी नेमका कोण आहे असा प्रश्न आपण स्वतःला जाणीवपूर्वक विचारला आहे का? जर आपण नीट विचार केला तर याच उत्तर आपल्याला मिळू शकेल. पहिली गोष्ट ही लक्षात येईल की मी कोण आहे? तर एक माणूस. पण फक्त माणूस म्हणणं हे आपल्या ओळखीचं स्पष्टीकरण नीट देत नाही.

कारण आपण सर्व माणूसच आहोत. याच्यापलिकडे सुध्दा एक माणूस म्हणून मी कोण आहे? मी कसा आहे? याचा शोध जर आपण नीट घेतला, आपल्याला आतापर्यंतच्या जीवनाचा आपण आढावा घेतला, आयुष्याकडे एका त्रयस्थ नजरेने पाहिले तर कदचित या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळू शकेल.

आपल्याला समजेल की आपण चुकू शकणारे, गुंतागुंतीचे माणूस आहोत. का? तर आपल्यामध्ये चांगले वाईट दोन्ही गुण असतात. कधी आपल्याकडून चुका होतात तर कधी आपण गोष्टी नीट करतो. आणि हे सर्वच लोकांच्या बाबतीत होत. आपल्या नेहमीच्या अनुभवातून आपल्याला हे दिसत जाणवत. चुका हा होतात तर कोणतातरी कौशल्य कमी पडत आणि गोष्टी नीट का होतात तर तेच कौशल्य कामी आलेल असत. आपण कश्याची खात्री देऊ शकत नाही. हे अस चक्र चालूच राहणार असत. आता ही जी चुका होण्याची आपली प्रवृत्ती आहे तिच्याकडे नीट लक्ष देण्याची गरज आहे.

अनेकांना हे मान्यच नसत, किंबहुना पटतच नसत की त्यांच्याकडून चुका होऊ शकतात. आपल्याकडून काही चूक होऊ शकते हेच पटवून घ्यायचं नसत. कारण पुन्हा हेच असत की आपली स्वतः विषयीची असलेली ओळखच अजून माहीत झालेली नसते. बऱ्याच जणांना अस वाटत असत की एकदम सर्वगुणसंपन्न आहे, परफेक्ट आहे. माझ्याकडून कधी काही चुका होऊच शकत नाहीत.

पण अस वाटणं आणि खरच तस असण यात खूप फरक आहे. कारण आपण कितीही चांगले असलो, गुणी असलो तरी चुका झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि त्या जेव्हा होतात तेव्हा ही माणसं काय करतात? तर माझ्याकडून चूक झाली हे स्वीकारतच नाहीत. मान्यच करत नाहीत. काहीही झालं असेल मी ते केलेलं नाही, माझी त्यात काहीही चूक नाही.

ही अशी चुका न स्वीकारण्याची जी माणसाची मनोवृत्ती असते ती तिच्या आयुष्यावर, त्यात जी विविध नाती असतात त्यावर पडसाद उमटवते. ज्यात आई बाबा असतील, आपलं भावंडांसोबत असलेलं नातं, नवरा बायकोच नात ज्यात हमखास अश्या गोष्टी होतात, मैत्रीमध्ये कामाच्या ठिकाणी अश्या ठिकाणी जिथे आपल्याला माणसांशी संबंध आहे तिथे जर आपल्याकडून काही चूक झाली आणि आपण ती स्वीकारली नाही तर अगदी शुल्लक गोष्टी सुध्दा टोकाला जातात.

ह्या चुका न स्वीकारण्याची अनेक कारण असतात ज्यातील महत्त्वाचं आणि पहिलं ते म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे चुका होऊ शकतात हेच माहीत नसते, त्यानंतर येत ते म्हणजे अनेक जणांना अस वाटत आपण जर चूक स्वीकारली तर आपण गुन्हेगार ठरणार, आपणच चुकीचे आहोत अस वाटणार, कमीपणा येणार.

हे अस वाटल्याने अनेक जण चुका स्वीकारत नाहीत. नवरा बायकोच्या वादात हे अनेकदा पाहायला मिळत, आपली चूक कोण मान्यच करत नसत. मग तो नवरा असुदे किंवा बायको. ठीक आहे मी चुकलो अस म्हणून ते स्वीकारून पुढे जाण्याहून आपला मुद्दा कसा बरोबर आहे आणि तूच कसा/कशी चुकीची/चुकीचा आहे हे पटवण्यावर जास्त भर असतो. अशीच जी साधी साधी वाटणारी भांडण नंतर टोकाला जातात आणि वेगळं व्हायची वेळ येतात. नंतर कधीतरी या गोष्टीची जाणीव होते की आपण तेव्हा आपली चूक मान्य करायला हवी होती. पण जेव्हा फार वेळ झालेला असतो. कारण शेवटी चूक ज्या व्यक्तीसमोर मान्य करायची असते तीच आपल्या आयुष्यात नसते.


त्यामुळे आपल्याला जर आपल्या आयुष्यात माणसं टिकवून ठेवायाची असतील, नाती चांगल्यापद्धतीने निभावायची असतील, तर जिथे आपल्याकडून चूक होत आहे तिथे ती स्वीकारून त्याला सुधारण्याची आपली तयारी पाहिजे. आणि चुका स्वीकारून, माघार घेऊन आपण काही कमी होत नसतो. उलट यातूनच आपल्याला अजून चांगलं कसं वागता येईल हे समजत असत.


कधी कधी चार पावलं पुढे जाण्यासाठी दोन पावलं यावच लागत. तेच शहाणपण आहे. आपल्यात ज्या काही उणीवा आहेत, जे काय आपल्याला सुधारायचा आहे ते कधी सुधारता येईल? जेव्हा त्या उणीवा, जेव्हा त्या चुका आपण नीट पाहू तेव्हा. आणि या सर्व गोष्टी आपल्याला जमतात, आपल्याकडे त्याच कौशल्य पण येत. त्यासाठी लागतो तो सततच सराव आणि त्यासाठी काय करायचं? तर स्वीकारायचं की हा माझ्याकडून ही चूक झाली आहे आणि ती कशी नीट करायची हे मी शिकेन.

साध्या साध्या गोष्टी असतात. गरज असते ती चिंतनाची आणि सतत शिकत राहण्याची!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”




1 thought on “चुका स्वीकारण्याची तयारी असेल तर माणसं गमावण्याची वेळ येत नाही.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!