चूक नसतानाही कधी कधी खूप भीती वाटते, यावर उपाय सांगा.
हर्षदा पिंपळे
चूक म्हणजे मानवी आयुष्याचा जणू एक भागच.चुका नाही असं आयुष्य नाही.आयुष्यात माणूस एकदा तरी चुकतोच.माणसाकडून या चूका होतातच.कधी माणूस ठरवून चुका करतो तर कधी माणसाकडून अनावधानाने चुका होतात.
चुक केल्यावर जितकी भीती माणसाला वाटत नाही तितकी भीती चूक नसतानाही माणसाला वाटत राहते.आता भीतीच म्हणाल तर माणसाला आयुष्यात कोणत्याही प्रकारची भीती वाटते.भीती वाटत नाही अशी कोणतीच व्यक्ती सापडणार नाही.कधी कधी तर भीतीने माणूस अक्षरशः ग्रासलेला असतो.कधी कधी ही भीती केवळ भीती राहत नाही. तर ती एका समस्येमध्ये रूपांतरित होते.
माणसाला कशाची भीती वाटत नाही….??? अगदी झुरळ, मांजर,पाल,पाणी, गर्दी यांसारख्या कितीतरी गोष्टींची माणसाला भीती वाटत असते.फरक इतकाच की प्रत्येकाची भीती ही वेगवेगळी असते.कुणाला मांजरीची भीती वाटते तर कुणाला तीच मांजर हवीहवीशी असते.
इतकच नाही तर कधी कुणी आपल्याला ओरडेल,काही बोलेल,आपलं काही चुकेल याचीही भीती माणसाला वाटत असते.या भीतीमुळेच माणूस अर्धमेला होऊन जातो.क्षणाक्षणाचा आनंद घ्यायचा सोडून भीतीमध्ये तो गुरफटून जातो.
आणि आपल्या हातून काही चुकीच घडलं असेल भीती वाटणं साहजिक आहे. परंतु ज्यावेळी आपण काही चुकीच केलेलच नसतं अशावेळी देखील कित्येकांना उगाचच भीती वाटत राहते.
भीती वाटूच शकत नाही असं नाही. परंतु विनाकारण सारखी भीती वाटत असेल तर…….? तर मात्र याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.कारण भीती कोणतीही असुद्या, त्यामुळे जगणं मुश्कील होऊन जातं.आयुष्यातील इतर गोष्टींवरही त्याचा विपरीत परिणाम होतो.तर अशीच ही भीती कमी व्हावी यासाठी आपण काही उपाययोजना करणं आवश्यक आहे.या भीतीसाठी आपल्यालाच प्रयत्न करणं आवश्यक आहे.
चला तर असे या भीतीवर मात करण्यासाठी काही उपाय पाहूयात….
वर्तमानात जगा-
वर्तमानाचा विचार करून हा…आत्ताचा क्षण जगून घ्या. ‘आपलं नक्की काही चूकलं का..?खरच चुकलं नसेल नं..?आणि चुकलं असेल तर…आता.. काय..कसं….?’ हा असा विचार करणं थांबवा.कारण सातत्याने त्याच गोष्टीचा विचार करण्यात काहीही अर्थ नाही. म्हणून आत्ताचा क्षण जगून घ्या.भीतीमध्येच सगळं आयुष्य जगू नका.
मोकळा संवाद-
आपल्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधून मनातील भीती व्यक्त करा.तुम्हाला काय वाटत आहे,काय नाही हे जवळच्या, हक्काच्या व्यक्तीला एकदा सांगून पहा.मनातील भीतीचा निचरा होऊन थोडा रिलीफ ममिळेल.इतकच नाही तर त्या व्यक्ती तुमची मदत करू शकत असतील तर नक्की करतील.तुम्हाला मदतीचा एक मार्ग निश्चितच सापडेल.
आवडीच्या गोष्टी करा-
आवडीच्या गोष्टी करण्याला प्राधान्य द्या.म्हणजे एका आवडीच्या गोष्टीत मन रमून गेलं की वाटणारी भीती नकळतपणे निघून जाईल.आवडीच्या गोष्टी केल्या तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन मनातील भीतीच सावट कमी होईल.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवा-
भीतीने हार मानू नका.सगळं काही व्यवस्थित असेल यावर विश्वास ठेवा.कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
नकारात्मक विचार थांबवा-
भीती वाटतेय,भीती वाटतेय असा विचार करू नका.हा असा नकारात्मक विचार त्वरित थांबवण्याचा प्रयत्न करा.
भीतीवर फोकस करू नका. उलट भीती वाटतेय असं सतत वाटून घेण्यापेक्षा हीच भीती कशाप्रकारे दूर करता येईल यावर फोकस करा.चांगल्या गोष्टींवर फोकस करा.
अशा काही गोष्टी आठवून पहा ज्या तुम्ही निडरपणे केल्या आहेत. असे प्रसंग आठवा ज्यामध्ये तुम्ही इतरांना भीती घालवण्यास सहाय्य केले आहे.
मेडिटेशन
सर्वात महत्वाच म्हणजे मेडीटेशन. मेडीटेशन हे कोणत्याही वाईट गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी उत्तम मार्ग आहे.रोज मेडिटेशन केलं तर मन प्रसन्न होऊन मनातील नकारात्मक भावना, भीती दूर होण्यास मदत होते. त्यामुळे रोज मेडिटेशन करण्यास प्राधान्य द्या.
शक्यतो काही चुका केल्याच नसल्याने अतिविचार करणं टाळा.सतत अशा भीतीमुळे शरिराची आणि मनाची हेळसांड होऊ शकते. मानसिकता बिघडू शकते.त्यामुळे गोष्टी घडतील तेव्हा त्या घडू द्या. कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर विश्वास ठेवा.स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका.वरील गोष्टी करून पहा.आनंद वाटणाऱ्या गोष्टी करत रहा.अशी वाटणारी भीती हळुहळू दूर होण्यास मदत होईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
