“आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका..”
मधुश्री देशपांडे गानू
“छोटी बातें….
छोटी छोटी बातों की हैं यादें बडी…
भुले नहीं बीती हुई एक छोटी घडी….
छोटी बाते….”
छोट्या छोट्या गोष्टींमध्येच, प्रसंगांमध्येच खरा मोठा आनंद दडलेला असतो. फक्त तो आपल्याला सापडायला हवा. मुठीत घट्ट धरता यायला हवा. त्याचा संपूर्ण आस्वाद घेता यायला हवा. शेवटी सुख, समाधान हे मानण्यावरच असतं ना! तुम्ही मानलं तरच समाधान!
आजच्या धावपळीच्या, अतिस्पर्धात्मक जगात आणि आजूबाजूला एवढं नकारात्मक घडत असताना, असे छोटे छोटे सुखाचे, समाधानाचे क्षण धरून ठेवणंच आपल्या हातात आहे. मनाची शांतता, एकाग्रता, समाधान हवं असेल तर हे आनंदी क्षणच वेचून कायम स्मरणात ठेवावेत.
दुःख, हेवेदावे, मत्सर, इर्षा, जीवघेणी स्पर्धा, तुच्छता, अपमान, आर्थिक स्थितीवरून माणसांची किंमत हे तर सगळीकडेच आज भरपूर आहे. आपल्यात असलेल्या गुणांची कदर न करणे, त्याचं मनापासून कौतुक न करणे, तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना शाबासकी न मिळणे हे तर अगदी रोज घडतंय.
नैसर्गिक आपत्ती, अपघातानेही दुःखाला सामोर जावं लागतं. मुळात प्रेमाची, आपुलकीची, तुमची कदर असणारी माणसं आज तुमच्या आयुष्यात कमी आहेत. याची जाणीव प्रत्येकाला हवी. त्यातून जर काही कारणाने ही दुरावली तर अतिव दुःख होतं. पण त्यातूनही आपण मार्ग काढतो. आपल्या या सुहृदांच्या गोड आठवणी जपून ठेवून..
अगदी सोपी उदाहरणं घ्या. खूप वर्षांनी शाळा, कॉलेजमधील मैत्रीण भेटते. मनमोकळ्या, मनमुराद गप्पा होतात. आणि तुम्ही तिला सांगता की, अमुक गोष्ट ना मी तुझ्यामुळे शिकले आणि आजही मला ती उपयोगी पडते. तुमच्या मैत्रिणीचा चेहरा एकदम खुलतो. तिला फार आनंद होतो. आणि हा आनंद तिला संपूर्ण दिवस पुरतो. बऱ्याचदा आपण कोणासाठी तरी काही चांगलं करून विसरून जातो. पण त्या व्यक्तीसाठी मात्र त्या क्षणी ते फार महत्त्वाचं असतं. त्याच्या मनात ती नोंद कायमची होते. आणि नंतर कधीतरी ती व्यक्ती आपल्याला त्याची जाणीव करून देते. आणि आपल्याला फार आनंद होतो. आपण असेही कोणाच्यातरी उपयोगी पडलो याचं समाधान फार मोठं असतं.
सकाळी सकाळी तुमच्या भावाचा फोन येतो आणि तो म्हणतो, ” तुला आनंदी पाहून मला फार आनंद झाला.” किती साधं वाक्य आहे.. पण तुम्हांला मात्र हे वाक्य दिवसभराचा आनंद, समाधान देऊन जातं.
तुमच्या आयुष्यात आजूबाजूला अशी काही माणसं असतात जी तुम्हांला अजिबात आवडत नाहीत. नैसर्गिक आहे हे. त्याची काही ठाम कारणंही तुमच्याजवळ असतात. पण तरीही अशा माणसांचा सहवास पाच मिनिटं जरी आला तरी तुमचा मूड बिघडतो. मग तुम्हीं दिवसभर त्याचाच विचार करता. अशावेळी दिवसभरात भेटलेली, आनंद देणारी माणसं जरूर आठवावीत. आणि एक छोटासा अप्रिय प्रसंग विसरून जावा.
पण माणसाचं मन हेच त्याचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. नकारात्मक विचार, दुःख देणारे विचार, घटना, अप्रिय प्रसंग, अप्रिय माणसं यांचाच तो अकारण विचार करत राहतो. दुःख कुरवाळायची मनाला सवयच असते म्हणा ना! आपणच प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक ही सवय मोडायला हवी. फक्त आनंद देणारे प्रसंग, घटना, माणसं लक्षात ठेवायची. यावरच काम करायचं. छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आणि समाधान मानण्याची आपल्या मनाला सवय लावायची. आणि “हा आठवणींचा सुगंध मनाच्या कुपीत दडवून ठेवायचा.” आणि कधीतरी ही कुपी उघडली की आठवणींचा दरवळ मनावर पसरतो आणि तुम्हाला खुदकन हसायला येतं.. हो ना!! हाच खरा आनंद आणि हेच समाधान…
पक्ष्यांचा आवाज, निसर्गाची वेगवेगळी उधळण, त्याचं सौंदर्य, योगासने, व्यायाम, ध्यानधारणा, चालणं, गाणी ऐकणं अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला अभूतपूर्व आनंद आणि समाधान देतात. तुमचा छंद, आवड जाणीवपूर्वक जोपासा. मात्र ही आवड “स्वान्त सुखाय” हवी. कोणाशीही स्पर्धा, कोणालाही कमी लेखण्याचा हेतू असेल तर तुम्हांला निर्भैळ आनंद आणि समाधान कधीच लाभणार नाही, हे पक्कं लक्षात ठेवा.
आनंद, समाधान मानणं आणि ते अंगी लावून घेणे सर्वस्वी आपल्या हातात असतं. त्यासाठी “रमता जोगी” असायला हवं. स्वतःमध्ये रमता यायला हवं. याने तुमचं मानसिक, शारीरिक स्वास्थ्यही उत्तम राहतं. स्वतःचे आणि आपल्या प्रेमाच्या माणसांचे आनंदी क्षण जपून ठेवा. आणि असे क्षण निर्माण करण्यासाठी स्वतः प्रयत्न करा आणि आयुष्यातल्या सुंदर, आनंदी, समाधानी अशा छोट्या छोट्या क्षणांचे साक्षीदार व्हा….
