Skip to content

“काहीतरी चांगलं घडण्याची सुरुवात झाली तरी काहींना उगाचच चिंता वाटायला लागते.”

“काहीतरी चांगलं घडण्याची सुरुवात झाली तरी काहींना उगाचच चिंता वाटायला लागते.”


मधुश्री देशपांडे गानू


” मन चिंती ते वैरी न चिंती”

हे अगदीच खरं आहे ना! आपलं मन कोणत्याही प्रसंगात पटकन नकारात्मक, काहीतरी वाईट घडेल या चिंतेनेच त्रस्त होतं. खरंतर असं घडतच असं नाही.

” मना मानसी दुःख आणू नको रे
मना सर्वथा शोक चिंता नको रे ”

श्री समर्थ रामदासांच्या “मनाचे श्लोक” मधील वरील दोन ओळी. समर्थ म्हणतात, मनात उगाच दुःख आणू नको. त्याचं चिंतन करत बसू नको. आणि मनात चिंता, शोक यांना कधीही थारा देऊ नकोस. खरंतर देहाला सगळे भोग आहेत. म्हणूनच दुःख, वेदनाही आहेत. माणूस भूतकाळात झालेल्या दुःखद घटना उगाळत राहतो. आता वर्तमानात जे घडतंय त्याचं दुःख करतो. आणि भविष्यकाळाची चिंता करतो. म्हणजे खरंतर माणूस कधीच सुखी, समाधानी नसतो. कारण त्याचे मनोव्यापार नकारात्मक असतात. अगदी आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडत असतानाही तो साशंक होतो. काहीतरी वाईट घडेल याची त्याला सारखी चिंता वाटायला लागते. समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक म्हणजे मानसशास्त्राचे धडे आहेत. पण हल्ली आपण वाचतोच कुठे???

आपल्यावर लहानपणापासून झालेले संस्कार, काही चुकीचेही संस्कार, परिस्थिती, स्वानुभव, आजूबाजूची माणसे, सामाजिक जडणघडण यानुसार आपली एक विचारांची बैठक तयार होते. एखाद्या प्रसंगाकडे, घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यानुसार तयार होतो. मग एखाद्या व्यक्तीचा सकारात्मक, वास्तववादी दृष्टिकोन असेल तर उत्तमच.. नाहीतर बहुतेक वेळा नकारात्मक, निराश, चिंताग्रस्त असाच दृष्टिकोन जास्त आढळून येतो. प्रत्येकाला भल्या बुऱ्या प्रसंगातून, अनुभवातून जावंच लागतं. त्याशिवाय शहाणपण येत नाही. काहींना तर अनेक अनुभवांनीही शहाणपण येत नाही. जे आपली सद्सद्विवेकबुद्धी, जागृत ठेवतात, विचारांचे सुनियोजन जाणीवपूर्वक करतात ते अशा दुःखद प्रसंगातून लवकर सावरतात. आणि नव्या अनुभवांना सामोरे जायला सिद्ध होतात. पण बरेचदा वाईट, दुःखद प्रसंगाची सावली, छाया बहुतेकांच्या मनावर दाटून राहते. यातून ते बाहेर पडू शकत नाहीत. जे या भूतकाळात अडकून पडतात ते मात्र नकारात्मक भावनेने पछाडले जातात. काहीही चांगलं घडायला लागलं की त्यांना काहीतरी वाईट घडेल याची चिंता वाटू लागते. खरंतर हा त्यांच्या मनोवृत्तीचा दोष आहे.

तुम्हीं सहज तुमच्या आजूबाजूला पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल, लोक सहज नकारात्मक, दुःखद, चिंता, ताण वाटणाऱ्या गोष्टींबद्दलच जास्त बोलतात. माझी तब्येत कशी चांगली नाही? मला कसा मोठा आजार आहे? याचं रसभरीत वर्णन सुरू होतं. घरातील, कुटुंबातील माणसं कशी माझ्याशी चांगलं वागत नाहीत. मी कसं सगळ्यांचं करते/ करतो, पण माझी कुणालाच किंमत नाही. आर्थिक परिस्थिती कशी वाईट आहे? हे आणि असंच बोलताना दिसतात. किती माणसं स्वतःच्या आनंदाबद्दल, एखाद्या छोट्याशा यशाबद्दल भरभरून बोलतात. आणि खरंच असं कोणी बोलत असेल तर मनापासून ऐकणारे किती जण असतात?? सर्वसाधारणपणे कोणाचंही कौतुक न करणे, असुया मत्सर बाळगणे, अहंकार जोपासणे असेच मनोविकार जास्त दिसून येतात. कोणाचंही एका शब्दानेही कौतुक न करणारेच असतात.

याचे महत्त्वाचे कारण आपल्याला दुसऱ्यांचा आनंद बघवत नाही. आणि स्वतःचा आनंदही दिसत नाही. हे जळजळीत वास्तव आहे. एखाद्या घरात लग्न ठरलं असेल तर मुलीकडची मंडळी कायम धास्तावलेली, काहीतरी विघ्न तर येणार नाही ना, वाईट तर घडणार नाही ना या मनस्थितीतच असतात. अर्थात आपली सामाजिक जडणघडण याला कारणीभूत आहेच. कारण कोणत्याही व्यक्ती बद्दल आपण काही ही माहित नसतानाही पूर्वग्रहदूषित मतं ठामपणे मांडतो.

अशा दोलायमान मानसिकतेला खरंतर आपले आपणच जबाबदार असतो. आता तुम्ही म्हणाल की फक्त सकारात्मक विचारांनी काय वाईट घटना घडत नाहीत की काय?? तर तसं नाहीच. जे बरं वाईट घडायचं ते घडणारच आहे. पण त्यासाठी आधीपासूनच आपण आपली मानसिकता अशी दुःखी, नैराश्यग्रस्त का तयार करतो??

मराठीत कितीतरी सुंदर म्हणी आहेत. त्यापैकी एक “शुभ बोल नाऱ्या, तर म्हणे मांडवाला आग लागली.” या म्हणीचा अर्थ असा की तुम्हीं शुभ, चांगलं, सकारात्मक बोलाल तर तसंच घडेल. पण तुम्हीं जर सतत काहीतरी वाईट घडेल अशी चिंता करत राहिलात तर मात्र फक्त आणि फक्त वाईटच प्रसंगांना तुम्हाला सामोरे जावे लागेल. सहज चिंता वाटू शकते तर मग सगळं चांगलंच होणार असं सहज का नाही वाटू शकत??? प्रयत्न केला तर नक्कीच वाटेल नाही का??

आता तर हे सिद्ध झालंय की, तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी तुमचे विचार ऐकत असते. मग जर तुम्हीं स्वतःबद्दल, शरीर मनाबद्दल, घडणाऱ्या प्रसंगांबद्दल, माणसांबद्दल, नात्यांबद्दल, स्वतःच्या चांगल्या यशस्वी आयुष्याबद्दल चांगलं आणि फक्त चांगलंच बोललात, सकारात्मक विचार केलात, तर सगळं फक्त चांगलंच घडत जातं. सकारात्मक, वास्तववादी विचारसरणी ही काही नवीन गोष्ट नाही आता. ज्या एकाच उर्जेने आपण बनलो आहोत, ती ऊर्जा सातत्याने चांगली, शुद्ध, सकारात्मक असायलाच हवी. तुम्ही जी ऊर्जा ब्रम्हांडाला देता तीच तुमच्याकडे परत येते. मग ही ऊर्जा अकारण चिंता करण्यात का व्यर्थ घालवायची??

कबूल आहे, भूतकाळातील वाईट प्रसंगांमुळे, अनुभवामुळे माणूस सुखाला सामोरे जायला बिचकतो, घाबरतो. त्याचा विश्वास बसत नाही. आपल्या बाबतीत खरंच काही इतकं चांगलं घडू शकतं याची त्याला स्वतःलाच खात्री वाटत नाही. मीही आनंदी, सुखी होऊ शकतो हे त्याला सहज पचवता येत नाही. पण सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि त्या नाण्याचं नाव आहे “आयुष्य”. दुःख आहे तर सुखही असणारच.

म्हणूनच काही चांगलं घडताना, सुख दाराशी हात जोडून उभं असताना संपूर्ण आनंदी मनाने, मोकळेपणाने, कसलाही किंतु न बाळगता त्याचं स्वागत करा. दुःखी करणाऱ्या या चिंतेला कदापि थारा देऊ नका. नक्की प्रयत्न करा…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!