जितकं नशीबात लिहिलंय तितकच मिळेल हा तर आपला मानसिक दुबळेपणा.
दिपाली मुळे
माणसाला आयुष्यात खूप काही मिळवायचं असतं पण जर का त्याला नाही मिळालं किंवा नाही मिळवता आलं तर मग स्वतःच्या अपयशाचे खापर तो नशिबावर फोडून मोकळा होतो की अमुक एक गोष्ट त्याच्या नशिबातच नव्हती म्हणून ती मिळाली नाही. असे म्हणण्यात काही तथ्य नाही.
माणसाची मूळ प्रवृत्ती अशी आहे की तो जबाबदारीतून सुटका कशी होईल ते बघत असतो. त्यामुळे आपले अपयश देखील तो पचवू शकत नाही त्यासाठी देखील तो नशिबालाच जबाबदार ठरतो .बहुतांश माणसे अशीच वागतात .फार कमी माणसे अशी असतात जी नशिबा पेक्षा आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवतात .
नशीब वगैरे काही नसतं असं माझं म्हणणं नाही पण नशिबा बरोबर तुमचा स्वभाव काम करण्याची पद्धत ,बोलण्याची रीत, कामाबद्दल समर्पण आणि सातत्य ,व्यापक व सकारात्मक दृष्टिकोन ,संपूर्ण क्षमतांची ओळख व त्यांचा योग्य वापर या सर्व गोष्टी देखील यश-अपयश किंवा साध्य(Achivement) ठरवतात .नशीब हा त्यातला एक भाग आहे. तीस टक्के हा नशिबाचा भाग असतो तर 70% हा वरील उद्धृत केलेल्या गोष्टींचा भाग असतो .
पण 70 टक्के आपल्या स्वाधीन असणाऱ्या गोष्टींपेक्षा आपण 30 टक्के परस्वाधीन असणाऱ्या नशिबावर अवलंबून राहतो आणि परिणामी हताश होतो .असे न करता आपल्या स्वाधीन असणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून प्रयत्न केले तर नशीबही साथ देते हे मात्र नक्की …..पण फक्त नशिबावर सारे सोडून आपण मात्र कर्म रहित झालो तर हा आपला मानसिक दुबळेपणा होय!!!
थॉमस अल्वा एडिसनने बल्ब चा शोध लावला तेव्हा 1 हजार प्रयोग केले त्यातही 999 प्रयोगातून बल्ब चा आविष्कार झाला नाही. पण एडिसनने हार न मानता प्रत्येक वेळी काय चूक झाली हे प्रत्येक प्रयोगानंतर शोधून काढले व ती चूक पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न करत 999 प्रयोग केले व शेवटी एक हजार आपल्या प्रयोगात मात्र त्याला यश प्राप्त झाले व बल्ब चा शोध लागला.
सांगायचा मुद्दा हा की माझ्या नशिबात नाही शोध लावणे असे म्हणून जर त्याने प्रयोग करणे थांबविले असते तर आज आपल्याला त्याचे नावही माहिती झाले नसते थोडक्यात काय तर आत्मनिरीक्षण व संयम यांच्यासमवेत चिकाटी व जिद्द या सर्वांमुळे एडिसनला नशिबाने साथ दिली………..
फार पूर्वी एक प्रसिद्ध ज्योतिषी राहत होता .त्याने सांगितलेले भविष्य कधीच चुकत नसे. एकदा एक अतिशय आळशी मनुष्य त्या ज्योतिषा कडे गेला आणि म्हणाला ,”महाराज माझे भविष्य काय आहे ते सांगा”…. ज्योतिषी म्हणाला ,”तुझ्या नशिबात राज योग आहे” पण यापुढे काहीही न ऐकता तो मनुष्य आनंदाच्या भरात तसाच निघून गेला आणि राज योग कधी येईल याची वाट बघत बसला. अनेक महिने उलटूनही त्याचा राजयोग काही आला नाही शेवटी न राहवून पुन्हा ज्योतिषाकडे गेला त्यांना चिडून म्हणाला ,”काय महाराज तुमचे भविष्य खोटे ठरले माझा राजयोग लवकर येईल असं म्हणाला होतात पण इतक्या महिन्यानंतर काही आला नाही “.
महाराज म्हणाले ,”अरे !अर्धवटच ऐकले आणि निघून गेला ….मी म्हणालो प्रयत्न केलास, काम धंदा केला तर लवकरच तुझा राजयोग सुरू होईल .तुझे नशीब तुझ्या हातात आहे पण तू तर नशिबाचा वर विसंबून बसला काहीच केले नाही. माझं भविष्य खोटे ठरलेले नाही पण तू मात्र कर्म रहित झाला आणि भविष्यावर विसंबून बसला म्हणून तुझा राजयोग आला नाही …..”
आपणही असेच अर्धवट ऐकून फक्त नशिबावर विसंबून राहतो हा खरोखर मानसिक दुबळेपणा आहे .जीवनात खरंच काही कर्तुत्व करायचे असेल तर आधी हा मानसिक दुबळेपणा सोडून द्यायला हवा . दुबळेपणा मानसिक असो वा शारीरिक वा बौद्धिक असो घातकच असतो. तेव्हा मानसिकता बदलू या….. आपला स्वभाव चांगला ठेवूया…. चांगला बनवूया…….
आपली काम करण्याची पद्धत आणि बोलण्याची रीत सृजनात्मक करूया …कामाबद्दल समर्पण व सातत्य ठेवून आपल्या सर्व क्षमतांची संपूर्ण ओळख करून घेऊया व त्यांचा संपूर्ण वापर करुया ..
जिद्दीने मेहनतीची तयारी ठेवूया.. काळाची ओळख करून घेऊया… कर्मयोगाची कास धरुयात .. सतत प्रयत्नरत राहूया…. आत्मनिरीक्षण संयम यांची साथ घेऊया…. प्रामाणिकपणा आणि सचोटीने काम करूया …….
मग असं म्हणण्याची वेळ येणार नाही हे जितकं नशिबात लिहिलंय तितकच मिळतं….आपलं नशीब आपण घडवू शकतो.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

दिपाली लेख छान लिहला आहेस .तुझा लेख खूपच सकारात्मक देऊन जातो .खरंच कुठल्याही कामात सकारात्मक व सातत्य असेलतर ते नक्कीच पूर्णत्वाला जाते
खूप छान लेख आहे.
खूप सुंदर लेख आहे, अगदी आपल्या रोजच्या जीवनाशी सांगड घालणारा
खुप छान…आणि अगदी खरंय
खूप छान लेख आहे
Lekh लेख खूप चांगला आहे परंतु लेखिकेच्या मनात स्पष्टता नाही. माझ्या मते नशीब वगैरे काहीही नसतं आपले प्रयत्न हेच नशीब. लेखिकेने मांडलेला 30 70 चा फॉर्म्युला चुकीचा आहे. मनुष्याने पूर्ण शंभर टक्के प्रयत्न केले पाहिजे.
Great thought
खूप छान