Skip to content

चांगल्या व्यक्तीसोबत वाईट सुद्धा त्याच्या चांगल्यासाठीच घडलेलं असतं.

चांगल्या व्यक्तीसोबत वाईट सुद्धा त्याच्या चांगल्यासाठीच घडलेलं असतं.


हर्षदा पिंपळ


आशा काकू मनाने खूप चांगल्या होत्या. घरदार तसं छोटच होतं.पण त्यांनी घर केवळ भिंतींनी बांधून ठेवलं नव्हतं. त्यांनी घराच घरपण जपलं होतं.प्रेम आणि मायेने त्यांनी घराला बांधून ठेवलं होतं. स्वतःकडे नसलं तरी चालेल पण दुसऱ्याची खळगी कधी रिकामी राहू नये असं त्यांना वाटायच.म्हणून नेहमी त्या दुसऱ्याची खळगी रिकामी राहू नये म्हणून प्रयत्न करायच्या. दुसऱ्याला जमेल तितकं देण्याचा प्रयत्न करायच्या.पण अचानक त्यांच्या आयुष्यात एकामागोमाग एक वाईट प्रसंग यायला लागले.त्यांच्या मुलाची नोकरी गेली.मुलीला कर्करोगाच निदान झालं.त्यामुळे पैशाची जास्तीची चणचण भासायला लागली.

अशावेळी सगळ्यांच सगळं चांगलं करून जेव्हा स्वतःवर वाईट प्रसंग येतात तेव्हा मनाची अवस्था बिकट होऊन जाते.आशा काकूंची अवस्थाही त्यावेळी खूप बिकट झाली होती. काय करावं नी काय नाही त्यांना काही कळत नव्हतं.सगळ्यांच सगळं चांगलं करून त्यांच्या बाबतीत असं एकामागोमाग घडलेलं त्यांना सहन होण्यासारख मुळीच नव्हतं. “मी सगळं चांगलं करून माझ्या बाबतीत इतकं वाईट का…?” असा प्रश्न आशा काकूंना पडला होता.

काही काळानंतर आशा काकू या सगळ्यातून सावरल्या. पुन्हा नव्याने सुरुवात करून न घाबरता आयुष्य जगायला लागल्या. अथक परिश्रमानंतर पुन्हा सगळं सुरळीत चालू झालेलं होतं.

पहा असेच प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात. आता वाईट प्रसंग कधीच सांगून येत नाहीत. ज्यावेळी जे घडणार असतं ते घडतं.त्याला अनेकदा आपण काहीच करू शकत नाही. कारण आपण रस्त्याने कितीही व्यवस्थित चालायचा प्रयत्न केला तरीही गाडी चालवणारी व्यक्ती नेहमीच गाडी व्यवस्थित चालवेल याची काही शाश्वती नाही.किंवा नेहमीच चालणारा व्यवस्थित चालत असेल याचीही काही शाश्वती नाही. त्यामुळे आयुष्यात वाईट प्रसंग कधी स्वतःच्या कर्मामुळे येतात तर कधी कधी नियती आपला घात करते.

“माझ्या आयुष्यात काही चांगलच घडत नाही.माझ्याच बाबतीत असं झालं. आणि नेहमीच असं होतं.मी कुणाचं वाईट केलय यार…चांगलं केलं तरीही नेहमी वाईटच का घडतं..?”

हे असलं काहीतरी आपण अनेकदा स्वतःशीच बडबडत असतो.आपल्या अवतीभवतीसुद्धा अशी अनेक लोकं असतात.आपणही कित्येकदा बोलून जातो की,”त्याने सगळ्यांच इतकं चांगल केलं,मनाने तो चांगला आहे पण तरीही त्याच्या बाबतीत काही हे किती वाईट झालं..”

पण खरं तर वाईट हे काय केवळ वाईट माणसाच्या आयुष्यात घडावं असं कुठेच लिहीलं नाही. आणि तसं नसावं सुद्धा. कारण जसं प्रत्येकाच्या आयुष्यात चांगलं घडत असतं तसच प्रत्येकाच्या आयुष्यात थोडफार वाईटही घडत असतं.खरं तर आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असतं.

कारण आयुष्यात जे काही वाईट प्रसंग येतात त्यातून खऱ्या अर्थाने आपण घडत असतो.आपली जडणघडण त्यांच्यामुळे तर होत असते.जर आयुष्यात वाईट प्रसंग आलेच नाही तर आपल्यातील क्षमतेची आपल्याला सहसा जाणीव होत नाही. आपल्यातील क्षमता आपल्याला ओळखता येत नाही. हेच जर आयुष्यात वाईट प्रसंग आले तर आपण यातून कसा मार्ग काढतो,यासाठी काय प्रयत्न करतो हे नियती बघत असते. नियती अशावेळी आपली एका अर्थाने परीक्षाच घेत असते.

आता साधारणपणे माणसाच्या आयुष्यात काय वाईट घडतं तर….

पैसे चोरीला जाणे,अपघात होणे,नुकसान होणे,फसवणूक होणे,वेगवेगळ्या प्रकारची संकटं येणे अशा अनेक वेगवेगळ्या वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. तर अशा वेळी आपल्याला वाटतं की हे सगळं माझ्याच बाबतीत का…? इतकं सगळं चांगलं वागून हे सगळं वाईट आपल्याच बाबतीत का घडतय…?

अर्थात असं वाटणं साहजिकच आहे. पण ज्या गोष्टी घडतात त्या आपल्या हितासाठीच घडतात हे लक्षात घ्यायला हवं.कारण त्या त्या प्रसंगातून आपल्याला एक नवीन धडा शिकायला मिळतो. आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात जेणेकरून भविष्यात कितीही अडथळे आले तरी आपण ते सहज पार करू शकतो याची जाणीव त्या वाईट प्रसंगामुळेच येते.

म्हणून वाईट घडलं तर चांगलं वागणं सोडून देऊ नका.कारण सुखासारख दुःख हे एकदा तरी आयुष्यात येणारच. हे स्वीकारून पुढे जायला हवं. सुखानंतर दुःख ,दुःखानंतर सुख असा हा खेळ चालू रहाणारच हे लक्षात घेऊन हसत हसत पुढे जायला हवं.

तेव्हाच तर आयुष्य जगण्यासाठी खरा कस लागतो.नियती आपली परीक्षा घेते.अशा वेळी “माझ्याच बाबतीत असं का ?” असा विचार करण्यापेक्षा “ही वेळही जाईल” असा विचार करून आयुष्य जगत रहा.

कारण आयुष्य जितकं वाईट वाटतं त्याहूनही ते कित्येक पटीने जास्त सुंदर आहे. थोडं जगून पहा….!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “चांगल्या व्यक्तीसोबत वाईट सुद्धा त्याच्या चांगल्यासाठीच घडलेलं असतं.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!