Skip to content

चालढकलपणा कसा कमी करावा?

चालढकलपणा कसा कमी करावा?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


नितीन, अरे जरा बाजारात जाऊन सामान आणशील का? मला आता एक ऑर्डर आली आहे त्यासाठी लागणारं होत. नितीन ऐकतोस का मी काय म्हणते? जानकी आपल्या मुलाला हा प्रश्न चौथ्या वेळा विचारात होत्या. पण नितीन कडून कसलीच प्रतिक्रिया आली नव्हती. कशी येणार? साहेब मोबाईलमध्ये तोंड घालून बसले होते. हल्ली त्याला फोन समोर काही दिसत नसे. कॉलेज पास होऊन आता वर्ष होत आलं होत. इतक्यात त्याने नोकरी किंवा कामाचं काहीतरी पाहायला हवं होत. पण अजून तो कुठेच स्थिर झाला नव्हता. कधी विचारलं तर मला हवं तस काम मिळत नाही. मी जिथे जाऊन येतो तिथे बोलावलं जातं नाही अशी उत्तरं त्याच्याकडून येत. हे सर्व तरी तो आई बाबा सारखे मागे लागत म्हणून करत होता. त्याला काम करण्याची खरच इच्छा होती अस कुठूनही वाटत नव्हत. कारण एकदा त्याने फोन घेतला, त्यात मॅच पाहत बसला की दुसर काहीही त्याला दिसत नसे. कोणी काही काम सांगितल तरी थोड्या वेळाने करतो, नंतर करतो अशी तो उत्तरं देई.

त्याच्या या फोनच्या सवयीने घरामध्ये कितीतरी वेळा वाद झाले होते. कारण प्रसंगच तसे घडले होते. रोजच्याच घटना पण दुर्लक्ष केल्याने मोठी आपत्ती ओढवली असती. असच जानकी एकदा गॅसवर काहीतरी ठेवून बाहेर गेल्या होत्या, याला लक्ष ठेवायला सांगून देखील त्याने ऐकले नाही. आत गॅसवर जे काही ठेवलं होत ते जळून त्याचा वास येऊ लागला तरी तो आपल्या मॅचमध्ये गुंग. त्याला वाटलं बाहेरून वास येत आहे. काही वेळाने जानकीबाई आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की पूर्ण खोली धुराने भरून गेली होती. कसतरी आत जाऊन त्यांनी गॅस बंद केला. यासारख्या अनेक घटना घडल्या होत्या. सगळीकडे नितीन असून देखील त्याच लक्ष नव्हत, इतका तो फोन मध्ये अडकला होता. काहीही काम करायला सांगितलं की नंतर करतो, आता मला जमणार नाही अस म्हणायचं, केल तरी अर्ध लक्ष फोन मध्ये यासारख्या त्याच्या गोष्टी होत्या. आई बाबा तर कंटाळून गेले होते. त्याला बोलून झाल, ओरडुन झालं पण काही फायदा होत नव्हता. त्याच्या या फोनच्या सवयीने तो आपले दिवस, वेळ सर्व वाया घालवत होता. पण हे त्याला समजत नव्हत.

तो जे करत होता त्याला चालढकलपणा करणे अस म्हणतात. यामध्ये व्यक्ती काम टाळते व त्याची कारण देखील देते. इथे माणूस जास्त महत्त्वाची गोष्ट पुढे ढकलून कमी महत्त्वाची गोष्ट करत राहतो. तसच कारण का देतो? कारण स्वतःची प्रतिमा वाचवायची असते. ती खराब होऊ द्यायची नसते. अशी बरीच उदाहरण आहेत जिथे आपण चालढकलपणा करत असतो. मग ते लवकर उठायचं असेल किंवा व्यायाम करायचा असेल. आपण मनात तर खूप ठरवतो की उद्यापासून लवकर उठायचं. त्यासाठी अलार्म पण लावलेला असतो. तरी देखील आपल्याला शक्य होत का? नाही. आपण उठायच तेव्हा उठतोच वर हे कारण देतो की अलार्म वेळेवर वाजला नाही. अस यासाठी सांगितल जात कारण अपराधीपणा नको असतो. स्वतःवर काही यायला नको असत.

आता हा चालढकलपणा का केला जातो? कमी महत्त्वाची गोष्ट का केली जाते? कारण अस न करणं मला सहनच होणार नाही अस वाटत असत. म्हणजेच झोप मोडून लवकर उठण मला सहनच होणार नाही अस वाटत असत म्हणून आपण जास्त वेळ झोपतो आणि लवकर उठायचा आपला बेत पुढे जातो. अर्धवट झोप होईल आणि तो त्रास मला सहनच होणार नाही या जाणिवेने आपण झोपून राहतो. ही जी त्रासाची असहनशिलता आहे ती आपल्याला तस करायला भाग पाडते. तसच आपण असा कधी विचार केला आहे का की एरवी आपल्याला लवकर उठायला त्रास होतो पण तेच फिरायला जायचं असेल, ट्रीप असेल तर मात्र आपण उठायला तयार होतो. इथे देखील आपली झोपमोड होणारच असते. तरी देखील आपल्याला ते सर्व सहन होत कारण पुढची गोष्ट आपल्याला आनंद देणारी असते.

थोडक्यात काय, तर गोष्टी पुढे ढकलण्यासाठी आपण जी कारण निर्माण केलेली असतात, जी असहनशिलता आपल्याला जाणवत असते तस वास्तवात काहीही नसत. हे सर्व आपल्या मनाने तयार केलेलं असत. कारण जर वास्तवात तस काही असत तर ट्रीपला जाताना पण त्रासच व्ह्यायला हवा होता. तो होत नाही. म्हणजेच काय या सर्व गोष्टी आपणच मनात आणलेल्या असतात. म्हणून चालढकलपणा कमी करायचा असेल तर सर्वात आधी आपण जी कारण देतो ती काढून टाकली पाहिजेत. हे excuses काढून टाकले पाहिजेत. तसच जे काम आपण करायचा निर्णय घेतला आहे त्याच महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. जितकं आपल्याला त्याच महत्त्व समजेल तितकं आपण ते करायला जास्त प्रेरित होऊ. त्याच बरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण सर्व काही सहन करू शकतो.

कारण सहनशीलता आपल्या मनाची नसून शरीराची असते. ती कशी? विचार करा, समजा एखादा दहशतवादी आला आणि त्याने म्हटल की जर तू उठला/उठली नाही तर मी तुला गोळी घालेन. तर आपण उठणार की नाही? आपण नक्कीच उठणार. इथे जरी आपली झोप मोडली तरी आपण ती सहन करू शकतो कारण जीव महत्त्वाचा आहे. म्हणजेच काय तर आपण जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आपण सर्व सहन करू शकतो. फक्त आपल्याला काय सहन करायचं आहे? तर ज्यातून आपल्याला पुढे काहीतरी फायदा होईल, आपलं चांगल होईल. अश्या गोष्टींसाठी आपण सुरुवातीला थोडा त्रास सहन केला, कोणतीही कारण न देता आपण ती काम वेळेवर केली तर नक्कीच आपला चालढकलपणा कमी होईल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “चालढकलपणा कसा कमी करावा?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!