चेहऱ्यावर हसू आणून दुःख गिळणाऱ्या व्यक्तींना पुढे हे त्रास होऊ शकतात.
दिपाली मुळे
(इमेज कन्सल्टंट अँड लाईफ कोच)
रीमा बँकेची नोकरी करत होती. वरवर सगळं छान दिसत होतं पण चेहऱ्यावर कायम हसू ठेवणारी रिमा आतून मात्र दुःखी होती.
घरचे सगळे व्यवस्थापन ,सणवार, मुलांची देखभाल, नोकरी, सासू-सासर्यांची देखभाल, नवऱ्याची काळजी एवढे करूनही घरामध्ये रीमाला काडीचीही किंमत नव्हती. कोणतेही निर्णय स्वातंत्र्य नव्हते. नवराही फार बरा वागत नसे. माहेरीही परिस्थिती फार बरी नसल्यामुळे रीमा माहेरी काहीही सांगत नसे. चेहऱ्यावर हसू ठेवून सगळं आतल्या आत सहन करत असे.
नोकरीतला ताण तणाव काही कमी नव्हता. असेच दिवस जात होते…. रीमाला बँकेमध्ये चक्कर आली…तिची सहकारी मैत्रीण तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी तिला तपासून काही चाचण्या करून घेतल्या. त्यातूनच तिला हायपर टेन्शन झाल्याचे निदान झाले .औषधे व घ्यायची काळजी कशी घ्यायची हे रीमाला डॉक्टरांनी समजावून सांगितले.
रीमाने सगळे घरी गेल्यावर घरच्या मंडळींना सांगितले. घरच्यांनी याबद्दल तिलाच जबाबदार धरत बोल लावला. सगळे काही व्यवस्थित आहे तरी टेन्शन घ्यायला काय झाले तुला ?असे म्हणून सगळ्यांनी हात झटकले. आता रीमा पुरती कोसळली.
मंडळी, हे प्रातिनिधिक उदाहरण झाले. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं आपण बघू शकतो .अनेक माणसे चेहऱ्यावर मुखवटे चढून जगताना दिसतात. त्यांच्या मागचे खरे चेहरे मात्र दुःखात आहेत. कायम असे वागण्यामुळे मात्र विविध शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतात हे मात्र कोणाच्याही लक्षात येत नाही .
मित्रहो ,माणूस म्हणजे भावना युक्त असणे. याच भावनांचे समायोजन नीट न करता आल्याने अनेकविध त्रासाचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ मनात अनेक दुःखाचा डोंगर साचला कि ,सतत चिडचिड होणे, छोट्या छोट्या गोष्टींवर एकदम रागाने व्यक्त होणे, स्वभाव तापट होणे ,सतत एकटेच रहावेसे वाटणे, निराशा, न्यूनगंड,भय अशा भावनांचे वारंवार आंदोलन येणे, आत्महत्या करावीशी वाटणे, डिप्रेशन मध्ये जाणे अशा अनेक मानसिक त्रासातून जावे लागू शकते. याचा परिणाम शारीरिक त्रास देखील जाणवतो म्हणजे बीपी ब्लड प्रेशर सारखे,शुगर सारखे आजार होणे, स्मृती कमी होणे, विचार करण्याची क्षमता कमी होणे, शारीरिक व मानसिक थकवा ….असे अनेक त्रास….
मित्र हो पण घाबरून जाऊ नका. यावर उपाय आहे .वेळेत हा उपाय केला तर हे सर्व त्रास आपल्याला होणार नाही .उपाय एकच तो म्हणजे ‘भावनांचे समायोजन’ करता येणे हा होय. भावनांवर नियंत्रण मिळवणे नाही तर योग्य वेळी ,योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने, योग्य शब्दात, आपल्या भावना योग्य त्या व्यक्ती पर्यंत पोहोचविणे .
म्हणजे भावनांचे समायोजन करणे होईल. भावनांना नियंत्रित केल्यास कधीतरी भावनावेग अनावर होतो .भावना दडपून टाकल्यास शारीरिक मानसिक त्रास संभवतात .भावना लपवल्यास, मुखवटे घालून जगण्याचा, एकसुरीपणा चा कंटाळा येतो. जगण्यातला उत्साह निघून जातो. यापेक्षा भावनांना योग्य रीतीने अभिव्यक्त करण्याचे शिकलो तर अनेक त्रास वाचतील.
भावना व्यक्त करण्याच्या अनेकविध पद्धती असू शकतात. व्यक्तिपरत्वे त्या बदलू शकतात. म्हणूनच ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असे म्हणले जाते. सतत दुःख गिळणार्यांच्या शरीरात त्रिदोष निर्माण होऊ शकतात. वात, पित्त, कफ यांचे संतुलन बिघडून शारीरिक आणि मानसिक संतुलन देखील खराब होऊ शकते .
मंडळी ,आपण एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेलो असता तिथे एखादं साचलेलं तळ आणि एखादा धबधबा आहे.. आपल्याला काय बघायला आवडेल ?धबधबा की साचलेलं तळ? बहुतेकांना धबधबा आवडेल कारण तो प्रवाही आहे, नितळ आहे ,स्वच्छ आहे ,सुंदर आहे, त्याला साचलेपण नाही. तळ्याप्रमाणे वर स्वच्छ आणि तळाशी गाळ नाही .
तर निर्मळ, नितळ ,सुंदर, स्वच्छ ,पिण्याजोगे पाणी त्या धबधब्यात आहे .तुम्ही कोणते निवडाल ….तळ्याचे पाणी किती धबधब्याचे पाणी? मंडळी आपल्या जीवनाचे ही असेच आहे. साचलेपणाचेअसे दुःख झाले आले की जगण्यातला उत्साह आणि चैतन्य जाते. शेवाळ्याचा एक थर तयार होतो जीवनावर आणि जीवनाच्या पाण्याला दुर्गंधी यायला लागते. जगणे कुठेतरी हरवून जाते.
मानसिक शारीरिक व्याधी जडतात ,माणसे दुरावतात ते वेगळेच. मग सतत प्रवाही नितळ स्वच्छ व सुंदर राहू या ना….. धबधब्यासारखे !!मुखवट्यांशिवाय आपल्या नैसर्गिक चेहऱ्याने… भावनांचे समायोजन करून …एकदा करून बघायला काय हरकत नाही का ….?

खुपच प्रेरणादायी
Very nice