Skip to content

चढ-उतार चालूच असतात, कोणीच खुश नाहीये, फक्त सगळे जगण्याचा प्रयत्न करत आहेत.

चढ-उतार चालूच असतात, कोणीच खुश नाहीये, फक्त सगळे जगण्याचा प्रयत्न करत आहेत.


अपर्णा कुलकर्णी


सुधीर दीक्षित यांना चार मुले. तीन मुले आणि एक मुलगी. दीक्षित हे पूर्वी आर्मी ऑफिसर म्हणून काम करत होते पण आता रिटायर झाल्यामुळे घरीच बसून होते. आर्मी ऑफिसर असल्यामुळे ते सहसा फॅमिली पासून लांबच राहिले होते. अधून मधून घरी येत आणि जितके दिवस सुट्टी होती तितके दिवस फॅमिली सोबत मस्त वेळ घालवत होते. पण आता रिटायर झाल्यामुळे घरातच बसून फॅमिलीला वेळ देत होते.

त्यांच्या कामामुळे त्यांची चारही मुले कधी मोठी झाली हे त्यांना समजलच नव्हत. बघता बघता सगळे तारुण्यात गेले होते आणि शारदाने ही जबाबदारी खूप उत्तम पार पाडली याचा त्यांना अभिमान ही होता. शारदेने कधीच कोणत्याच गोष्टीची तक्रार केली नव्हती सुधीर दीक्षितकडे. घरातल्या आणि मुलांच्या सगळ्या जबाबदाऱ्या एकटीने पेलल्या होत्या आणि मुलांना छान घडवले होते. सुधीर दीक्षित यांचा मोठा मुलगा राजेश आता इंजिनियर होऊन जॉब करत होता, मुलगी सुधा कॉलेज मध्ये शिकत होती, विनयला आर्मीच जॉईन करायची होती त्यामुळे तो ट्रेनिंग घेत होता तर रचित बारावीला होता.

दीक्षित सर आणि शारदा ताई गप्पा मारत बसले होते तेवढ्यात राजेश ऑफिसमधून आला आणि त्याने तडक खोलीत जाऊन दार बंद करून घेतले. त्याच्या अशा वागण्याने सुधीर आणि शारदा दोघेही गोंधळून एकमेकांना बघत होते. राजेश आजवर असा कधीही वागला नव्हता आणि आज अचानक असे खोलीत बंद करून घेतल्याने शारदा काळजीत येऊन त्याला बोलवायला जाऊ लागल्या, तेंव्हा सुधीर दीक्षित यांनी त्यांना थांबवले आणि जरा वेळ दे त्याला तो येईल थोड्या वेळात बाहेर म्हणून समजूत घातली. तसे तर सुधीर सरांचा आपल्या मुलांशी फारसा संबंध आला नव्हता जितका शारदा ताईंचा आला होता.

पण सुधीरसर आर्मी ऑफिसर होते आणि या लोकांना माणसांची उत्तम पारख असते त्यामुळे आपली मुले कशी आहेत याचा बरोबर अंदाज त्यांना होता. पण शारदा ताई आई असल्याने त्यांना काही चैन पडत नव्हती, थोडा वेळ थांबून त्यांनी दार वाजवून राजेशला बाहेर यायला भाग पाडले, राजेश खूपच अस्वस्थ वाटत होता, रडून रडून त्याचे डोळे लाल झाले होते. त्याची ही अवस्था पाहून दोघानाही खूप कसेतरी झाले. दोघांनी त्याला विश्वासात घेऊन प्रेमाने विचारले, तर त्याने सांगितले की, माझी नोकरी गेली.

बरेच दिवस मी एका प्रोजेक्ट वर काम करत होतो पण कंपनीत खूप वशिलेबाजी झाली आणि माझे प्रेझेंटेशन चांगले असूनही मला नाकारण्यात आले म्हणून मी वाद घातला तर मला नोकरी वरून काढून टाकले. आता राजेश आईच्या कुशीत शिरून रडू लागला. शारदाताई पण खूप रडू लागल्या पण सुधीर सरांनी दोघांना हि समजावले आणि दुसरी नोकरी मिळेल का काळजी करतोस म्हणून धीर दिला.

इकडे सुधा कॉलेजमध्ये जात येत होती पण हल्ली तिच्या वागण्यात खूप बदल झाला होता. सुधीर सरांना ते जाणवले होते पण राजेश च्या नोकरीमुळे शारदा ताई टेन्शन मध्ये होत्या म्हणून त्यांनी सरळ सुधालाच विचारायचे ठरवले. एकदा सुधा खोलीत वाचत बसलेली असताना काहीतरी निम्मित करून सुधीरसर तिला बाहेर घेऊन गेले, इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, सुधाला तिच्या आवडीचे पदार्थ खाऊ घातले पण सुधाचा मुड म्हणावा तितका ठीक झाला नाही. तेंव्हा सरांनी तिला त्याचे कारण विचारले तर ती म्हणाली,माझ्या कॉलेजमध्ये माझी मैत्रीण आहे नीता. तिला एक मुलगा आवडत होता पण काही दिवसांपूर्वी त्या मुलाने मला लग्नासाठी मागणी घातली आणि नीताने माझ्याशी मैत्री तोडली.

माझी या सगळ्यात काहीच चूक नव्हती बाबा, माझ्या मनात त्या मुलाबद्दल अशा कोणत्याच भावना नाहीत. आता त्याने मला मागणी घातली यात माझी काय चूक ?? पण यात नीताने माझ्याशी मैत्री तोडण्याचे काय कारण होते ?? सुधा रडू लागली आणि सुधीर सरांनी कशीतरी तिची समजूत घातली. सुधा नॉर्मल होते ना होते तोपर्यंत विनयचा ट्रेनिंग दरम्यान अपघात झाल्याची बातमी कानावर आली. त्यामुळे सगळेच हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्याला घेऊन घरी आले. अपघातात त्याचा हात पाय चांगलेच दुखावले गेले होते. लागल्यामुळे त्यालाही अस्वस्थ वाटत होते शिवाय आत्मविश्वास कमी झाला होता.

बघता बघता सुधीर सरांची मुले अस्वस्थ, उदास झाली होती. राजेश नोकरी शोधत होता पण त्याला हवे तसे काम मिळत नव्हते, सुधा नॉर्मल होण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करत होती पण कॉलेजमध्ये गेल्यावर नीताच्या वागण्याने पुन्हा खचून जात होती आणि विनय मोडलेल्या पायावर पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत होता. शारदा ताई आणि सुधीर सर मुलांकडे बघून खचून गेले होते पण मुलांसमोर तसे दाखवत नव्हते.

सुधीरसर खूप स्त्राँग होते मनाने पण आपल्या मुलांना असे खचलेले पाहून त्यांनाही वाईट वाटत होते पण यातूनच आपली मुले जगायला शिकतील हे अनुभव त्यांना जगण्याचं शहाणपण देईल याची त्यांना खात्री होती. एक दिवस आपल्या सगळ्या मुलांसोबत सुधीर सर आणि शारदाताई गप्पा मारत बसले होते. त्यावेळी सुधीरसर आर्मीमधील काही अनुभव सांगत होते. जगणं किती क्षणभंगुर आहे याची प्रचिती त्यांना कशी आली, मिशन दरम्यान जीव पणाला लावून कसे लढले जाते आणि त्यातून आयुष्य जगायला मिळाल्यावर आपण ते कसे जगतो, हे सगळच ते मुलांना सांगत होते.

शेवटी ते म्हणाले, जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळणारच मुलांनो. सुधा तुझी मैत्रीण नीता तिचा तुझ्यावर विश्वास नव्हता आणि मैत्रीत सगळ्यात महत्त्वाचा असतो तो विश्वास. तिने तुझी बाजू एकदाही ऐकून न घेता तुझ्याशी मैत्री तोडली तर तू का त्याचे वाईट वाटून घेते, राजेश तू तुझ्या कर्तुत्वाने दुसरा खूप चांगला जॉब नक्की मिलवशील.

थोडा वेळ लागेल पण तुझ्या हुशारीची पारख करणारा नक्कीच कोणीतरी मिळेल आणि विनय शिकता शिकता असे खूपदा धडपडावे लागणार त्यामुळे एकदा लागले म्हणून खचून जाण्याची गरजच नाही. तू उत्तम आर्मी ऑफिसर होशील. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार चालूच असतात, कोणीच खुश नाहीये, फक्त सगळे जगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा प्रयत्न प्रमाणिक असायला हवा. निराश होऊ नका आयुष्य आनंदाने जगत रहा.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!