“आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा कायम रिकाम्याच राहतात, हा भ्रम तोडून टाका.”
मधुश्री देशपांडे गानू
“कुछ लोग इक रोज़ जो बिछड जाते हैं वो हजारों के आने से मिलते नहीं
उम्र भर चाहे कोई पुकारा करें उनका नाम
वो फिर नही आते, वो फिर नही आते”
गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिलेले हे अप्रतिम गीत. खरंच आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही खास प्रेमाची, आपली माणसं असतात. सर्वात प्रथम जन्मदाते आई वडील. त्यांची जागा खरंच आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही. त्यांचं प्रेम, त्यांचा त्याग, त्यांनी आपल्यासाठी खाल्लेल्या खस्ता दुसरं कोणीच करू शकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो जेव्हा आई-वडील कायमची साथ सोडून जातात. आणि आपण अनाथ झाल्याचे पचवणं फार फार कठीण असतं. या दोन जागा रिकाम्या झाल्या तर पुन्हा कोणीच भरून काढू शकत नाही. फारच कमी अशा व्यक्ती असतील ज्यांच्या आयुष्यात मातापित्याची जागा घेणारं, त्यांच्याजवळ जाणार कोणी माणूस असेल. तरीही आयुष्य सुरूच राहतं.
तोपर्यंत आपला संसार, आपलं हक्काचं माणूस नवरा किंवा बायको, आपली हक्काची मुलं असतात. आपण रमतो त्यांच्यात. आईची जागा जरी रिकामी झाली तरी ती संस्कारांनी आपल्या सोबत कायम असते. मग ते संस्कार आपण आई होऊन आपल्या मुलांवर करतो.
पण तरीही जीवन गतिमान आहे फिरत्या चाकासारखं. आपण या चाकाचा केंद्रबिंदू असतो आणि चाकाच्या वर्तुळाचा प्रत्येक बिंदू आपली जोडलेली माणसं, आपला गोतावळा. चक्र अव्याहत गतिमान असतं. त्याचप्रमाणे आपल्या गरजेनुसार, स्वार्थानुसार, काळानुसार, प्रेम, विश्वास या भावनांनुसार आपली ही नाती, आपला हा गोतावळा ही बदलत राहतो. जुनी माणसं अनोळखी होतात. नवीन माणसं जिवलग होतात. आणि रिकाम्या झालेल्या जागा भरत राहतात.
शेवटी तुम्हीं कितीही करिअर, शिक्षण, पैसा, स्टेटस, भौतिक सुखं काहीही काहीही मिळवलं तरीही तुमची जवळची, हक्काची, प्रेमाची, विश्वासाची माणसं जर तुमच्याजवळ नसतील तर हे सगळं फोल आहे. कितीही गर्भ श्रीमंत व्यक्ती असली तरीही वेळेला माणूसच कामाला येतो.
त्यामुळे माणसाला खरंतर आतून माणसाचीच ओढ असते. त्याचे सगळे प्रयत्न हे एखाद्या व्यक्तीला आपलंसं करण्यासाठीच असतात. आई-वडिलांसाठी, पती-पत्नीसाठी, मुलांसाठी, प्रेयसी साठी, मित्र-मैत्रिणींसाठी. माणसाला माणूस हवं असतं. अशावेळी आयुष्यात रिकाम्या झालेल्या जागा तो नव्याने भरून काढतोच.
एखाद्या व्यक्तीचा जोडीदार संसार अर्ध्यावर टाकून कायमचा निघून गेला तर नवीन जोडीदार शोधतो ना! नैसर्गिक आहे हे. आणि तरीही काही स्त्री/ पुरुष जोडीदार अर्ध्यातून निघून गेला तरीही ती जागा कायमची रिकामी ठेवतात. कारण त्यांच्या दृष्टीने ती जागा इतकी प्रेमाची, विश्वासाची असते की त्या जागी दुसऱ्या कोणाची कल्पनाही ती व्यक्ति करू शकत नाही. आणि हे एकटेपण घेऊनही त्या व्यक्ती जीवन आनंदाने, भरभरून, संपूर्णपणे जगताना दिसतात, यशस्वी होताना दिसतात. सगळ्या रिकाम्या जागा खरंच नाही भरून निघत…
आणि काही रिकाम्या जागा कायम रिकाम्याच राहतात हा खरंच भ्रम आहे. एखादी व्यक्ती अचानक निधनामुळे किंवा नातं कायमचं तोडून आपल्या आयुष्यातून निघून गेली तरी ती जागा कोणी नवीन व्यक्ती त्याच पूर्णत्वाने भरून काढू शकते. “फक्त हा सर्वस्वी एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक पातळीवरचा निर्णय आहे.” मित्र-मैत्रिणी नाही का नवीन मिळत आपल्याला! आणि जुने मित्र-मैत्रिणी तरीही असतातच की. शेवटी त्या व्यक्तीवर, त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर सगळं अवलंबून आहे. काही व्यक्ती खूप मनमोकळ्या, हसतमुख, सर्वांशी मैत्री करणाऱ्या असतात. त्यांचा गोतावळा खूप मोठा असतो. तर काही मितभाषी असतात. त्यांचा गोतावळा लहान असतो. पण प्रत्येकाच्या आयुष्यात अशा खास जागा असतातच.
नोकरदार व्यक्तीची दुसऱ्या शहरात बदली झाली तर त्याला नवीन सहकारी मिळतात. लग्न झाल्यावर आपल्याला नवीन नातलग मिळतात. रिकाम्या जागा भरत राहतात आणि नवीन जागाही निर्माण होत राहतात. यालाच तर जीवन ऐसे नाव.
आणि मला महत्त्वाचा वाटलेला पैलू सांगू! आपल्याच आयुष्यातील रिकाम्या जागा शोधणे आणि त्या नव्याने भरणे एवढाच संकुचित अर्थ आहे का हो आयुष्याचा?? आपण स्वतःही कोणाच्यातरी आयुष्यातली रिकामी जागा आपल्या स्वभावाने, मैत्रीने, नात्याने भरून काढू शकतो ना! आपणही कोणाचे तरी सुहृद होऊ शकतो ना! आपण कोणाला ममत्व, मित्रत्व, प्रेम देऊ शकतोच की!! एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील रिकाम्या जागा या रिकाम्याच राहतात हा त्याचा भ्रम आपण तोडू शकतो.
तर मग आज पासून असाही प्रयत्न करा. कोणाचेतरी मित्र, सखा, समुपदेशक व्हा. कोणाच्यातरी आयुष्यातली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करा. आणि त्याने जे समाधान तुम्हांला लाभेल ते काही औरच असेल.. पटलं ना!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
