Skip to content

भावनिकदृष्ट्या भुकेले असलेल्या व्यक्तीला कोणतेही नाते छान वाटते.

भावनिकदृष्ट्या भुकेले असलेल्या व्यक्तीला कोणतेही नाते छान वाटते.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“राखी तु खुप भोळी आहेस, तुझा स्वभाव निरागस आहे ना म्हणून तुला सर्व जग तसच वाटत. पण अस नाही. आपल्याला वाटतं तशी सर्व लोक चांगली नसतात. तुझ्या या स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात; किंबहुना याआधी घेतलेला देखील आहे. हे जग साध्या भोळ्या लोकांसाठी नाही. आपल्याला माणसं ओळखता आली पाहिजेत.” नम्रता इतकं जीव तोडून राखीला सांगत होती पण तिच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. कारण ती सध्या वेगळ्याच दुनियेत वावरत होती. मैत्रीच्या, प्रेमाच्या दुनियेत. सौरभ तिच्या आयुष्यात आल्यापासून ती अशी वागत होती. हे जग, तिचं आयुष्य तिला छान वाटू लागलं होत.

पण तिच्या या छान वाटण्याला, आनंदी राहण्याला फक्त सौरभ जबाबदार होता अस नाही. अशी कोणतीही व्यक्ती जी तिला आपलेपणाची भावना देईल, तिच्याशी चांगल वागेल ती व्यक्ती तिला आपली वाटायची, ते नात तिला चांगल, छान वाटायचं. याला कारण खूप होती. आपलं म्हणून कोणीतरी असावं, आपल्याला समजून घ्यावं या तिच्या मानसिकतेमागे, तिच्या या भावनिक स्वभावामागे खोलवर रुतलेल्या लहानपणीच्या आठवणी होत्या. राखीच सर्व बालपण तिच्या दूरच्या एका काका काकूंच्या घरी गेलं. आई वडील नव्हते. तिला त्यांना पाहिल्याच आठवतदेखील नव्हत इतक्या त्यांच्या आठवणी पुसट होत्या.

काका काकूंकडे राहिल्यावर आसरा तर मिळाला, पण प्रेम, माया, जिव्हाळा जो लहान मुलांना सर्वात जास्त गरजेचा असतो तो मात्र तिच्या वाट्याला आला नाही. मनात कायम एक उपरेपणाची जाणीव घेऊनच ती वावरली. तिने स्वतः हुन त्यांना कितीही आपलं मानून घ्यायचा प्रयत्न केला, त्यांच्याशी नात जोडायचा प्रयत्न केला तरी त्यांनी मात्र तिला आपलं केल नाही. नात्यातल्या एका पोरक्या मुलीला आपण सांभाळत आहोत ही इतकीच भावना त्यांच्या मनात होती. त्यामुळे आई वडील गमावलेली राखी या अश्या वातावरणात अजूनच एकटी पडत गेली आणि अधिकच भावनिक झाली.

याचाच परिणाम म्हणून की काय तिच्याशी जरा कोण दोन शब्द गोड बोलू लागल की ती त्या माणसाशी अगदी नाते जोडून मोकळे होई. आणि मग त्या माणसाने काहीही सांगितले तरी ते पूर्ण करणे तिचे पहिले कर्तव्य असे. तिच्या याच साधेपणाचा अनेक लोकांनी गैरफायदा घेतला होता. बाळ बाळ म्हणून आपलस करीत लोक आपला स्वार्थ साधून घेत. तिच्याकडून आपली काम करून घेत. पण तिला त्याच काही वाटत नसे. कोणत्याही कारणाने का असेना आपल्याला कोणतरी जवळ करत हेच तिला पुरेस होत.

पण लोक छोटी मोठी काम करून घेत होती इथपर्यंत हे ठीक होत. एकदोनदा असे प्रसंग आले होते की राखीच्या जीवावर बेतल असत आणि तिने ज्या माणसांसाठी हे केल ती मात्र यातून नामानिराळी झाली होती. या सगळ्यात एकच चांगली गोष्ट झाली होती ती म्हणजे तिला नम्रतासारखी मैत्रीण मिळाली होती. ती अगदी सावलीसारखी तिच्यासोबत असे. राखीचा स्वभाव त्याची कारणं हे सर्व नम्रताला माहीत होत म्हणून ती तिला कोणत्याही धोक्यात पडू देत नसे. तिला वेळोवेळी सावध करत असे. राखी पण तीच ऐकायची, नाही अस नाही. पण अजूनही तिला पुरती माणसं ओळखता येत नव्हती.

नम्रता जरी बोलली की या आधीचे अनुभव लक्षात ठेवून नवीन नाती तयार कर. परत तस व्हायला नको. त्यावर ती म्हणायची, “अग तूच म्हणतेस ना, सर्व माणसं काही चांगली नसतात, मग सर्व लोक वाईट, फसवी असतील अस तरी कश्यावरून? आणि मी काही लहान राहिले नाही आता! मला समजत कोण कस आहे ते!” नम्रताच पण अस अजिबात म्हणण नव्हत की सर्वच वाईट आहेत. फक्त हिचा असा स्वभाव पाहता तशी लोक मिळण्याची शक्यता जास्त होती अस तिला वाटायचं.

अस होत जेव्हा आपण भावनिक दृष्ट्या भुकेलेले असतो. जेव्हा आपल्याला कोणाच्यातरी आधाराची गरज असते. कोणाच्यातरी सोबतीची गरज असते. अश्या वेळी आपल्याला दिसेल ते नात छानच वाटत. आपण त्यात वाहवत जातो. नाती तयार करण, ती जोपासणे हे काही चुकीचं नाहीये. हा मानवी मनाचा स्थायीभाव आहे. त्यातूनच समाज निर्माण होत असतो, बंध निर्माण होत असतात. पण आपण कोणत्या कारणांनी ही नाती तयार करतोय, त्यात गुंतून पडण्यामागची, त्याबद्दल अती भावनिक होण्यामागची आपली काय कारण आहेत याचा ही आपण शोध घेतला पाहिजे. कुठेतरी मनाला झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी आपण दिसेल त्या व्यक्तीशी नात जोडत असू तर ते आपल्याला धोकादायक ठरू शकतं.

आपल्याला अजून दुबळ करू शकत. आपल्याला कधी कधी इतरांची गरज ही लागतेच आणि ती आपण घ्यावी देखील. पण आपण भावनिक दृष्ट्या इतकं कमकुवत, इतकं परावलंबी होऊ नये की आपलं जगणं या नात्यांवर अवलंबिलेल असेल. पूर्ण आयुष्यात आपलं म्हणून कोणीच माणूस नसेल अस कधी होत नाही. आपल्याला नक्की अशी व्यक्ती मिळते. पण ती मिळावी म्हणून आपण कमकुवत, अतीभावनिक असून चालणार नाही. आपण आधी भावनिक दृष्ट्या खंबीर, स्थिर झालं पाहिजे. कोणी असल तरी चांगलच पण समजा नसल तरी आपलं आयुष्य आपल्याला चांगल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “भावनिकदृष्ट्या भुकेले असलेल्या व्यक्तीला कोणतेही नाते छान वाटते.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!