Skip to content

बौद्धिक संपदा असूनही, भावनिक समतोल कुठेतरी हरवत चालला आहे….

बौद्धिक संपदा असूनही, भावनिक समतोल कुठेतरी हरवत चालला आहे….


मेराज बागवान


भावना आहेत म्हणून तर माणूसपणाला अर्थ आहे. खरे तर विविध प्रकारच्या भावनाच मनुष्याच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देतात.प्रेम,जिव्हाळा,राग,लोभ,माया,मत्सर,इर्षा, अहंकार अशा अनेक प्रकारच्या भावना प्रत्येक माणसामध्ये कमी-अधिक प्रमाणात असतात.ह्याच सर्व भावना आपले आयुष्य अर्थपूर्ण बनवित असतात.पण कधी कधी ह्या भावनांच अतिरेक हानिकारक असतो,स्वतःसाठी तसेच इतरांसाठी देखील.आजकाल तर बौद्धिकदृष्ट्या अत्यंत हुशार, चाणाक्ष असणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील भावनिक समतोल साधला जात नाही.आणि याचे अनेक विपरीत परिणाम ती स्वतः व्यक्ती तसेच तिच्या सानिध्यात येणाऱ्या व्यक्तींना देखील भोगावे लागत आहेत.

काही विद्यार्थी अभ्यासात खूप हुशार असतात.पण व्यावहारिक जीवनात कुठे तरी मागे पडलेली दिसतात.आणि मग असेच कुठेतरी फसगत झाल्यानंतर ,ती गोष्ट ,ती आलेली समस्या सोडवायला ती सक्षम नसतात.मग उदास,नैराश्याने ग्रासून ,अगदी आत्महत्या करेपर्यंत त्यांची मजल जाते.समस्या सोडविण्याऐवजी नकारात्मकतेकडे झुकलेली आजची पिढी दिसते.परीक्षेत नापास झाल्यानंतर व्यसनांच्या अधीन गेलेली कितीतरी महाविद्यालयीन युवक-युवती आहेत.वरून एकदम ‘ऍक्टिव्ह’ दिसणारी व्यक्ती , मनातून मात्र खूप खचलेली आहे.आणि त्यामुळेच अगदी भावनिक होऊन, मनाला लावून घेऊन ही मुले-मुली आपले आयुष्य उध्वस्त करीत आहेत.याचा त्यांच्या जीवावर खूप मोठा प्रभाव पडत आहे आणि त्यांच्या पालकांच्या आयुष्यवर देखील.

रिंकू ,अतिशय स्मार्ट ,अगदी मॉडर्न विचारांची, सुशिक्षित ,नोकरी करणारी तरुणी.नोकरीच्या ठिकाणी यशाची एक एक शिखरे ती पार करत होती.तीच्या आयुष्यात देखील ‘तो’ होताच.अगदी छान चाललं होतं त्यांचं.दोघेही खूप प्रेम करायचे एकमेकांवर.रिंकू ने असेच एक दिवस त्याच्याकडे ‘लग्नाचा’ विषय काढला.तेव्हा तो स्पष्टपणे म्हणाला.”रिंकू, तू मला खूप आवडतेस, माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत.”आणि त्याने त्याचे सर्व म्हणणे मांडले.हे सर्व ऐकून रिंकू ला खूप मोठा धक्का बसला.तो स्पष्टपणे बोलून मोकळा झाला.पण दुसरीकडे रिंकू स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकली नाही.इतकी हुशार असणारी रिंकू, प्रेमभंग झाला म्हणून एकाकी राहू लागली, कोणाशी बोलनाशी झाली.नोकरीत तिचे मन लागत नव्हते.

त्यामुळे नाईलाजास्तव तिला ती नोकरी सोडावी लागली.ह्या प्रसंगात रिंकू कदाचित ‘प्रेम’ ही भावना योग्यरित्या समजू शकली नाही.किंवा थोडा शांत डोक्याने ती विचार करू शकली नाही.तिने फक्त ती गोष्ट मनाला लावून घेतली आणि संपूर्ण विस्कळीत झाले.आज रिंकू सारख्या अनेक तरुणी-तरुण आहेत जे प्रेमभंग झाल्यामुळे स्वतःच्या आयुष्याची नासाडी करून घेताना दिसतात. हे सर्व होते ते भावना नीटपणे हाताळता न आल्यामुळे आणि त्या भावनांचा समतोल साधला न गेल्यामुळे.

आजकाल स्पर्धेचे युग असल्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रांत ,अनेक डेडलाईन सांभाळव्या लागतात. आयटी संबंधित क्षेत्रांत सर्वत्र आज ‘वर्क फ्रॉम होम’ ही संस्कृती आहे.व्यावसायाच्या दृष्टीने हे सर्व ठीक आहे.पण याचा परिणाम वैयक्तिक जीवनावर झालेला दिसून येत आहे.कामाच्या ठराविक वेळा न राहिल्यामुळे नात्यांमधील संवाद हरवत चालला आहे. सर्व काम घरीच बसून होत असल्यामुळे ‘वर्क लाईफ बॅलन्स’ साधला जात नाही.यातून मग कलह, वाद,भांडणे होताना दिसत आहेत.तसेच समाजात मिसळतात एक प्रकारचा ‘फोबिया’ दिसून येत आहे.

स्वतःच्याच आयुष्यात व्यक्ती रममाण होताना दिसत आहेत.त्यात तंत्रज्ञान, लॅपटॉप,कम्प्युटर, मोबाईल फोन यामुळे प्रचंड मानसिक ताण येतो.अतिशय हुशार असणारी ही माणसे, बौद्धिकदृष्ट्या कणखर असणारी ही काही ‘आयटीशियन्स’ ,कामाच्या ह्या स्वरूपामुळे भावनिकरित्या कुठेतरी कमकुवत होत आहेत.आणि याचे परिणाम म्हणजे, नात्यांमध्ये दुरावा येणे,घटस्फोट,कलह आणि लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम.

अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत.जिथे आपल्या भावनांचा कस लागतो.अनेक घटना घडतात, ज्या आपल्या भावनांना आव्हाने देत असतात.स्वतःचे मन, भावना आणि सामाजिक जीवन याचा समतोल साधण्याची वेळ येते.कोणीच परिपूर्ण नसतो, किंवा कोणालाच एखादी बिकट परिस्थिती कशी हाताळली पाहिजे आणि त्यावर तोडगा कसा काढला पाहिजे हे पूर्वीपासून कधीच माहीत नसते.एखादी परिस्थती ओढवल्यानंतरच प्रत्यक्षपणे ती गोष्ट अनुभवली जाते.मात्र असे जरी असले तरी आपल्या आजूबाजूला अनेकजण असतात ज्यांनी अशी परिस्थती अनुभवलेली असते. त्यांच्या हातून काही चुका झालेल्या असतात.किमान आपण त्यांचे निरीक्षण करून काही अंशी आपल्यावर समस्या आल्यानंतर योग्य तो भावनिक समतोल ठेवून त्या सोडवू शकतो.

आज सोशल मीडिया, इंटरनेट यामुळे खूप प्रगती झालेली आहे. पण ह्या सगळ्याचा एक प्रकारे भावनिक परिणाम आपल्यावर झालेला दिसतो. काहीजण सोशल मीडिया च्या आहारी गेलेले आहेत. स्टेटस, डीपी,रिल्स असे शब्द रोजच्या बोलण्यात अगदी सहज येत आहेत.आणि त्यावरून देखील लगेच भावनिक होणारे देखील बरेचजण आहेत.हिने/ह्याने अमुक एक स्टेटस माझ्यासाठीच ठेवले आहे, कोणीतरी मला मुद्दाम चिडवत आहे , कोणीतरी माझ्यावर जळत आहे असे काहीसे नकारात्मक विचार करणारे ‘नेटिझन’ देखील खूप आहेत.आणि यामुळेच भावनिक समतोल साधला जात नाही.अगदी सुशिक्षित लोकांची ही व्यथा आहे.

प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही.आपण प्रयत्न मात्र करू शकतो.पण त्या प्रयत्नांना शंभर टक्के यश येईलच असे नसते.आणि मग असे होत नाही म्हणून राग, मत्सर आशा भावना बाहेर निघतात.प्रत्येक गोष्टीसाठी वेळ यावी लागते.निसर्ग आपले वेळापत्रक कधीच चुकत नाही.पण जर का आपण त्यात हस्तक्षेप केला तर मात्र होत्याचे नव्हते होते.म्हणूनच वास्तव कितीही कडू असले किंवा आपल्या मनाविरुद्ध असले तरी ते पूर्णपणे स्वीकारता आले पाहिजे. आणि एकदा का आपल्याला हे जमले तर भावनिक समतोल आपोआपच साधला जातो आणि समस्या देखील लवकर सुटते.

एकमेकांशी बोलत असताना अनेक समज-गैरसमज होतात.आजकाल ‘वर्चुअल’ बोलणे वाढले आहे.कामाच्या व्यापामुळे प्रत्यक्ष भेटून बोलणे तसे कमीच होते.मग काही जण अशा बोलण्यातून देखील अनेक गैरसमज करून घेतात.एखादी मुलगी किंवा मुलगा आपल्याशी खूप गोड ,छान छान बोलत आहे म्हणजे त्याचेही आपल्यावर प्रेम आहे असे समजणारे देखील बरेच सापडतील.आजच्या मुलांची ही मोठी समस्या बनली आहे. आणि यामुळे भावनांचा कल्लोळ माजत आहे.यातून मग नकळत अपेक्षा ठेवल्या जातात आणि मग अपेक्षाभंग झाला की , जणू आयुष्यात काही राहिलेच नाही असा समज आजची पिढी करून घेताना दिसते.म्हणूनच अपेक्षा जरी ठेवल्या तरी त्या योग्य कारणासाठी आणि योग्य त्या व्यक्तीकडूनच ठेवल्या पाहिजेत.म्हणजे भ्रमनिरास होणार नाही.

जेव्हा भावनांचे योग्य ते व्यवस्थापन करता येत नाही, तेव्हा त्याचा परिणाम विचारशक्तीवर, निर्णयक्षमतेवर होतो.तसेच मानसिक आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो आणि ह्या सगळ्याचा शेवट म्हणजे शारीरिक दुखणी कायमची मागे लागतात.म्हणूनच स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी भावनिक समतोल साधला आला पाहिजे.

‘मला कोणी विचारात नाही, माझी कोण काळजी घेत नाही, मलाच सगळे बोलतात, मला कोणीच समजून घेत नाही’ असे अति भावनिक किंबहुना नकारात्मक विचार करण्याऐवजी, ‘माझ्यासोबत माझा विधाता कायम आहे, मी सर्व प्रकारच्या अडचणी सोडविण्यासाठी सक्षम आहे, मी एक जबाबदार, कणखर , संयमी,सकारात्मक,आणि ‘बॅलन्सड’ व्यक्तिमत्व आहे’ असे विचार कायम सोबत ठेवले पाहिजे. यामुळे आजूबाजूची अदृश्य शक्ती तुम्हाला हवी ती मदत आपोआप करू लागेल आणि कोण जाणे विधात्याच्या मनात असेल, नियतीच्या मनात असेल तर, तेच घडेल ज्यासाठी तुम्ही इतका आटापिटा करीत आहात.

म्हणूनच जेव्हा कधी अति भावनिकता मनात घर करू लागेल, त्या त्या क्षणी, ‘थोडा वेळ थांबून, शांत डोके ठेवून , स्वतःला वेळ देऊन,संयम ठेवून आत्मपरीक्षण करावे. आयुष्याचा खरा मार्ग नक्की सापडेल’.

अति भावनिकता आयुष्य कुठेतरी ‘स्टक’ करून ठेवते.आणि भावनिकतेला जरा ‘प्रॅक्टिकल’ विचारांची जोड मिळाली तर आयुष्य ‘मूव्ह ऑन’ होते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!