Skip to content

कशावरूनही भावनिक होण्याआधी त्यामागचं वास्तव नीट तपासायला हवं.

कशावरूनही भावनिक होण्याआधी त्यामागचं वास्तव नीट तपासायला हवं.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


माणूस आणि भावना यांचं खूप जवळच नात आहे. जन्मानंतर अगदी काही काळातच मुल विविध भावना विकसित करू लागतं. कारण आपल्या मेंदुतच तशी रचना आहे. संवेनशीलता, भावनाप्रधान असणे हे माणसाचे एक मूलभूत गुणतत्व आहे. इतरांना काय वाटतं, त्याचं सुख, दुःख आनंद, तळमळ समजून घेण्यासाठी आपण स्वतः मुळात तेवढं भावनाप्रधान असणे गरजेचे आहे.

तर आपण इतरांना समजून घेऊ शकतो. अस जर होत नसेल, तर ही एक प्रकारची भावनिक उणीव ठरेल. कारण आपल्या भावना नीट समजून घेणं, त्या नीट व्यक्त करता येणं, त्यांचं व्यवस्थापन नीट करता येणं, तसेच इतरांच्या भाव भावना समजून घेणं हे सर्व खूप गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी भावनिक बुद्धिमत्तेत समाविष्ट होतात आणि आपल्या शैक्षणिक बुद्धिमत्तेबरोबरच भावनिक बुद्धिमत्ता ही खूप गरजेची आहे आणि बऱ्याच शास्त्रज्ञांनी देखील हे सिद्ध केले आहे. त्यामुळे भावना या मानवी स्वभावामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.

पण भावनाप्रधान असण आणि अती भावनिक असण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काही लोक अजिबातच भावना व्यक्त करत नाहीत तर काही जण अती भावनाशील असतात. कोणत्याही प्रसंगात ते भावनिक होतात. आता भावनिक होण म्हणजे फक्त रडू येणं, दुखी होण, अस नाही. कारण भावना या बऱ्याच प्रकारच्या आहेत. त्या त्या प्रसंगानुरूप त्या येत असतात. पण त्या योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात व्यक्त करण हे एक कौशल्य आहे. तेच बरेच जणांना जमत नाही.

एक छोटा प्रसंग देखील त्यांना भावनिक करून टाकतो. ही लोकं लगेच रडतात, रुसून बसतात, चिडतात, वाईट वाटून घेतात. यातून ती परिस्थिती अजून विचित्र होऊन जाते. ज्याचा त्रास या माणसांना ही होतो आणि समोरच्याला देखील. एक उदाहरण पाहू. एका माणसाने नवीन कार खरेदी केली होती, नुकतीच आणली होती. त्याचा मुलगा लहान होता. एक दिवस त्याने त्याच्या मुलाला त्या कारवर काहीतरी रेघोटे ओढताना पाहिलं आणि त्याला त्याचा राग अनावर झाला. कारण गाडी नवीन होती त्यात त्याचा मुलगा त्यावर काहीतरी खरडत होता. त्याने तसच मुलाला पुढे ओढून खूप मारल.

एकदाही त्याला नेमक तो काय करत आहे हे पहावसं वाटलं नाही. कारण त्याच त्याच्या रागावर नियंत्रण नव्हत. नंतर जेव्हा त्याने कार पाहिली तेव्हा त्याला दिसल की नेमके मुलगा काय करत होता. मुलाने त्या कार वर I love you Daddy असं लिहिलं होतं. ते पाहून त्या माणसाला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप झाला. कारण त्याने जर स्वतःच्या भागावर ताबा ठेवला असता, उगाच भावनिक न होता नेमके काय चालू आहे हे नीट पाहिलं असतं तर इतकं सर्व झालं नसत.

आपण अनेकदा आपल्या जवळच्या लोकांना गृहीत धरतो. बाकी कोण कसेही वागुदेत पण यांनी आपल्याशी नीट वागलच पाहिजे असा आपला अट्टाहास असतो. अशा वेळी त्यांनी जरा काही आपल्या मनाविरुद्ध केलं, बोलल की लगेच वाईट वाटत. बरेचदा समोरची व्यक्ती आपल्या चांगल्यासाठी सांगत असते. काही गोष्टी करत असते. पण ते न पाहता, त्यामागचं वास्तव नीट समजून न घेता आपण आपल्या मनातच काहीतरी धरून चालतो आणि भावनिक होतो. आपले अंदाजच आपल्याला खरे वाटू लागतात. ज्यातून अधिक गैरसमज होण्याची शक्यता असते.

नवरा बायको मध्ये हे अनेकदा होताना दिसत, जरा काही मागे पुढे झालं, भेटायचं ठरवलेलं असताना उशीर होणं असेल, वेळेवर जेवायला न येणं असेल, काही चूक झाली आणि ती दाखवून दिली. या सर्व गोष्टी रोजच्या जीवनात घडणाऱ्या आहेत. तरी यांचा अनेकजणांना त्रास होतो. कारण त्यांनी त्यांच्या मनात यांना नको तितक मोठं केलेल असतं. त्यातून त्या भावना अधिक तीव्र होतात आणि मग अस का झालं असेल याचं कारण न समजून घेता मनाशी तयार केलेल्या अंदाजांवर माणूस वागतो.

पण हे कमी केलं पाहिजे. साध्या साध्या गोष्टीत भावनिक न होता त्याच्या बाकीच्या शक्यता पण तपासल्या पाहिजेत. आपल्याला वाटते तेवढी खरच ही गोष्ट मोठी आहे का हेही तपासल पाहिजे. तसच आपला समोरच्याच्या बाबतीत, परिस्थितीच्या बाबतीत जो अट्टाहास असतो तो आधी कमी केला पाहिजे. कारण आपलं कोणावरही नियंत्रण नाही.

आपल्या भावना आपल्याला नीट ओळखता आल्या पाहिजेत, त्यांना नीट व्यक्त करता आला पाहिजे. थोडक्यात, आपली भावनिक बुद्धिमत्ता आपल्याला चांगल्या पद्धतीने विकसित करता आली पाहिजे. याच गोष्टी आपल्याला मनाने भक्कम बनवतात आणि तो प्रसंग चांगल्या पद्धतीने हाताळायला मदत करतात.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “कशावरूनही भावनिक होण्याआधी त्यामागचं वास्तव नीट तपासायला हवं.”

  1. Ravindra Bhaurale

    लेख खरच खूप छान, जीवनामध्ये भावानिक बुद्धी ला खूप महत्व आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!