बायकोच्या कष्टाची दखल घेणारा नवरा प्रत्येक स्त्रियांना हवा असतो.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“अरे देवा आज खूपच उशीर झाला निघायला, अजून घरी जाऊन जेवण करायचं आहे, अनिकेत पण निघाला असेल.” ऋतूला खूप टेन्शन आलं होत. आज कॉलेजमध्ये अचानकच ज्यादा लेक्चर घेतल तेही काहीही न सांगता. चुकवता पण येणार नव्हत. तरीही तिने विचार केला की लेक्चर संपवून आपण वेळेत घरी जाऊ शकतो. पण व्ह्यायचा तो उशीर झाला. अनिकेत, तिचा नवरा प्रायव्हेट कंपनी मध्ये जॉबला होता. गेल्याच महिन्यात त्यांच्या लग्नाला दोन वर्ष पुर्ण झाली होती.
लग्नाच्या वेळी ऋतूच ग्रॅज्युएशन झालं होत. पण तिला पुढे शिकायची इच्छा होती. तिला जॉब ही करायचा होता. अनिकेतची पण या सगळ्याला संमती होती. तो या विचारांचा अजिबात नव्हता की मुलीने फक्त घर सांभाळल पाहिजे. त्याच पण हेच म्हणणं होत की मुलीची स्वतःची ओळख असली पाहिजे. त्यामुळे त्याने लग्नाच्या वेळीच सांगितल होत की तिच्या पुढच्या शिक्षणासाठी, कामासाठी तो तिला मदत करणार. आता हे आपणा सर्वांना माहीत आहे की लग्नाच्या वेळी बोलणारे बरेच जण असतात. पण पाळतात किती जण? खूप कमी. त्यातलाच अनिकेत होता.
लग्न झाल्यावर जेव्हा काही महिन्यात ऋतू सेटल झाली तेव्हा त्याने तिला सांगितलं की तू तुझ कॉलेज सुरू करू शकतेस. इथे गम्मत अशी झालेली की ऋतू आता या सर्वात म्हणजेच संसारात जास्त रमली होती. त्यामुळे तिचं जरा हो, नाही अस चाललं होत. पण अनिकेतला माहीत होत की आताच चांगल्या पद्धतीने शिकू शकते. नंतर जबाबदाऱ्या वाढल्यानंतर तिलाच सर्व कठीण जाईल. म्हणून त्याने आग्रह करून तिला एडमिशन घ्यायला लावले. अनिकेतचे आई बाबा त्यांच्या गावी राहत आणि हा जॉबमुळे दुसरीकडे राहत होता. घरात दोघच असल्याने त्यांनी कामाला कोणाला ठेवलं नव्हत.
जेव्हा ऋतू कॉलेजला जाऊ लागली तेव्हा अनिकेतने विचारलं की कामाला कोणाला ठेवायच का तर तिने साफ नकार दिला. तिने सांगितलं की दोन्ही गोष्टी ती सांभाळू शकते. आणि तिने ते करून दाखवलं. सकाळी लवकर उठून ती घरात सर्व आवरून दोघांचा नाश्ता, डबा बनवत असे. त्यानंतर अनिकेत तिला कॉलेजला सोडून पुढे कामाला जाई. येताना मात्र ती एकटी येई कारण तीच कॉलेज आधी संपत असे. आल्यावर परत घरातली काम, जेवण बाकीचं काम सर्व ती करत असे. हे सर्व करत असताना देखील तिला कधी कामाचा कंटाळा आला नाही की तिने कसली तक्रार केली नाही. का?
कारण जरी तिने या सगळ्याची जबाबदरी घेतली असली तरी अनिकेत ने तिला गृहीत धरून हे सर्व तिच्यावर लादल नाही. ती दोन्ही गोष्टी म्हणजेच कॉलेज तिथला अभ्यास आणि घर सांभाळत होती आणि त्यात कष्ट हे होतेच. आणि या कष्टाची त्याला जाण होती. तो फक्त तू किती काम करतेस ना अस वरवर बोलून दाखवत नसे तर त्याच्या वागण्यातून, त्याच्या काळजीतून तिला हे दिसून येई. आणि हेच तिच्यासाठी जास्त महत्त्वाचं होत. हेच तिचं energy drink होत.
आज देखील तिला कॉलेज मधून यायला वेळ झाला होता आणि घरी काहीच तयार नव्हत म्हणून तिला टेन्शन आलेल. कारण अनिकेत पण दमून येई आणि भुकेलेला असे. घरी जाऊन आता कधी सर्व करायचं अस स्वतःशीच बडबडत ती घराजवळ आली. तिने पाहिलं तर दार उघड होत. ती अजूनच घाबरली कारण तिला समजलं की अनिकेत आला असणार. ही गोष्ट खरी होती की तो कधीच तिला कोणत्या गोष्टीत उशीर झाला म्हणून काही बोलत नसे.
उलट तो समजून घेई. पण त्याच्या याच स्वभावाने तिला अधिक अपराधी वाटे. आता पण ती सावकाश घरात गेली तर तिला जेवणाचा छान वास आला. ती किचन कडे जातच होती तेव्हढ्यात अनिकेत तिथून आला आणि तिला welcome म्हणाला. त्याचा अवतार पाहण्यासारखा झाला होता. नाका तोंडाला पीठ लागलेलं, हातात चमचा. त्याच्याकडे पाहून ऋतू हसू लागली. तिला समजलं होत की त्याने जेवण बनवलं असणार. तिला हसताना पाहून अनिकेत म्हणाला, “या अवताराकडे लक्ष देऊ नको. यातून जे अनोखं जेवण निर्माण झालय त्याचा आस्वाद घे बालिके!” म्हणत त्याने तिला डायनिंग टेबलकडे नेले व तिथेच खुर्चीवर बसवत तिला पाणी देऊ लागला.
त्याच्या या वाक्यावर ऋतूला अजूनच हसू आले. ती म्हणाली, “सॉरी मला उशीर झाला. पण तु कधी आलास आणि हे जेवण वैगरे कधी केलस? मी येऊन करणारच होते.” तिला थांबवत अनिकेत म्हणाला, “मला येऊन झाला खूप वेळ. एक मीटिंग होती पण कॅन्सल झाली. म्हणून लवकर आलो. आणि जेवणाच म्हणशील तर काय आहे ना रोज रोज तुझ्या हातच खाऊन मी कंटाळलो होतो. आज विचार केला मस्त स्वतःच्या हातच जेवू. शेवटी तुला पण समजेल तुझा नवरा किती मोठा शेफ आहे ते!” “हो का? मला माहीतच नव्हत हा.” ऋतूने अस म्हणत दोघांच्या प्लेट घेतल्या व ती फ्रेश व्हायला गेली.
आल्यावर त्या दोघांनी एकत्र जेवण केले. ऋतूला माहीत होत की अनिकेत जे काही बोलला ते खर नव्हत. तिला आल्यावर परत काम करायला लागू नये, त्रास पडू नये म्हणून त्याने आज जेवण केले होते. पण त्याची ती सवयच होती की तो स्वतःच कधी कौतुक करत नसे आणि दुसऱ्यासाठी काही केलेलं बोलून दाखवत नसे. त्याला तिच्या कष्टाची जाणीव होती आणि म्हणून तो जमेल तस तिला मदत करत असे. आणि त्याच्या मनात असलेली ही जाणीव, त्याच हे तिच्या कष्टाचं अस दखल घेण तिला अजून प्रेरणा देत असे शिकण्यासाठी, काम करण्यासाठी.
अस अनेकदा व्हायचं की कॉलेजला जायच्या नादात ती घरातली काही काम विसरे किंवा तिच्याकडून चुकत. पण अनिकेत ते पाहून नीट करे. तिच्या परीक्षा असताना तो मुद्दाम घरी लवकर येई जेणेकरून तिला कामात मदत करू शकेल. दोघांपैकी कोणीही विशिष्ठ काम तूच कर किंवा मीच करेन अस ठरवून घेतल नव्हत. त्यावेळी जो रिकामा असेल, ज्याला जे जमेल तो ते करत असे. उणीव भरून काढत असे.
कोणत्याही बायकोला अजून काय हवं असतं? बऱ्याच जणांना अस वाटत की बायकोच्या खूप जास्त अपेक्षा असतात त्यांना दागिने, साड्या, किमती वस्तू यात आनंद असतो. पण अस नाही. स्त्री कितीही काम करू शकते, कष्ट करू शकते. तिला फक्त इतकच हवं असत की तिच्या कष्टाची नवऱ्याने दखल घ्यावी. त्याच्या डोळ्यात ते दिसावं की हो मला समजत आहे तू किती करतेस आणि तुझ्यासोबत मी आहे. खांद्यावर एक आपुलकीचा हात असावा इतकीच अपेक्षा असते तिची. एवढं जरी मिळालं तरी बायको समाधानी होते. आणि असाच नवरा बायकोला हवा असतो.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
