जर तुम्हाला सतत बाहेर प्रॉब्लेम दिसत असतील तर मन तपासण्याची गरज आहे.
काव्या धनंजय गगनग्रास
(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
व्यक्ती तितक्या प्रकृती! म्हणजेच काय तर जितकी माणसं तितके त्यांचे वेगवेगळे स्वभाव, वेगवेगळ्या विचारपद्धती. काही जणांना कोळश्यातून सोन काढायची सवय असते तर काही जण समोर महाल असला तरी त्याच्या बाजूला असलेल्या झोपडीकडे पाहतील. एकंदरीत माणसाप्रमाणे स्वभाव बदलत जातो. तसेच त्यांचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. म्हणूनच आपण प्रसंग एक असला तरी प्रतिक्रिया मात्र विविध देत असतो.
एक असत वाईटामध्ये चांगलं पाहणं आणि दुसर असत फक्त वाईट तेवढ पाहणं. असा हा दुसऱ्या प्रकारे विचार करणारी अनेक लोक असतात. त्यांना जिथे तिथे फक्त चूक, प्रॉब्लेम पहायची सवय असते. आता खरच तिथे काही पूर्ण चूक आहे का, काही गंभीर समस्या आहे का हा मुद्दा वेगळा. पण त्याअाधीच त्यांची नजर या समस्येकडे जाते.
विचारांच्या या पद्धतीला किंवा या विचारसरणीला सीबीटी च्या भाषेत “mental filter” असे म्हटले जाते. ही एक वैचारिक चूक आहे. यामध्ये माणूस फक्त चुकीच्या गोष्टीकडे पाहतो. आपण चहा गाळल्या नंतर जसे आपल्या नजरेला फक्त चोथा म्हणून राहिलेली चहापुड दिसते तसच या माणसांना बाकी सर्व गोष्टी गाळून, शक्यता गाळून फक्त त्या एकाच जी कदाचित थोडीफार वाईट असू शकते, समस्या देणारी असू शकते अश्या गोष्टीकडे लक्ष द्यायची सवय असते.
यातून होत काय की नुसता प्रॉब्लेम पाहत राहिल्याने मनात एक प्रकारची नकारात्मकता निर्माण होते. साहजिक आहे. फक्त आपण समस्या पाहत राहिलो तर मनात अजून येणार तरी काय? याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी गमतीशीर अशी उदाहरणं पण असतात.
आपले बरेचसे नातेवाईक असे असतात आणि हे दिसून येत लग्न समारंभात किंवा अन्य कोणत्या तरी सोहळ्यात. त्यांची कितीही चांगली बडदास्त करा, बोलणं असत. साडी काही चांगली दिली नाही. लग्न अगदी उत्तम केलेलं असुदेत, स्वीट डिश काही मला आवडली नाही. खूपच गोड होत.
घरी आल्यावर चहा पाणी दिलं तरी, मला आधी दिलं नाही. अगदी किमती भेटवस्तू दिली तरी सुत काही चांगलं नव्हत. अशी बरीच जण आपल्याला भेटतात आणि आपल्या मनात येत देखील की अरे, यांना प्रत्येक गोष्टीचा कसा काय प्रॉब्लेम असतो?काहीही केलेले आवडत नाही.
जसं व्यक्तिगत पातळीवर तसच बाहेर यांना जिथे तिथे फक्त प्रॉब्लेम पहायची सवय असते. कोरोनाचे पेशंट वाढत्यात हे जरी खरं असलं तरी त्यावर उपचार देणं सुरू आहे, लस निघते आहे, काही ना काही उपाय चालू आहेत या खरतर जमेच्या बाजू असतात. पण हे दिसतच नाही. दिसत काय की पेशंट वाढत आहेत. लस ही जेव्हा नवीन आली होती तेव्हा अनेकांना त्याचे साईड इफेक्ट जाणवले होते, काही जण दगावली होती पण त्याला काही लस हे एकमेव कारण नव्हत त्याला त्यांची काही वैयक्तिक कारणही होती. पण हे न पाहता फक्त लसच कशी कारणीभुत आहे, कशी ती नुकसान करू शकते असं वाटून कित्येक जण लस घ्यायला तयार नव्हते.
जसं अगदी पांढरा शुभ्र पडदा असतो आणि त्यावर एखादा काळा ठिपका पडतो आणि नेमका तोच दिसतो असा यांचा स्वभाव असतो.
पण हा स्वभाव ही विचारसरणी वेळीच बदलली पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की बाहेर फक्त प्रॉब्लेम आहेत, फक्त चुकीच्या, वाईट गोष्टीचं आहेत, तर अस नाहीये. इथे स्वतःच मन आधी तपासून पहा.
असं फक्त समस्या पाहून तुम्ही चांगल्या गोष्टीकडे सरळ सरळ पाठ फिरवता, डोळेझाक करता ज्यातून नुकसान तुमचं होणार. कारण आपण जेव्हा हे मान्य करतो की जश्या समस्या आहेत तशा काही चांगल्या गोष्टी पण आहेत तेव्हा आपल्याला निदान ही आशा असते की आपण ही समस्या सोडवू शकतो. पण फक्त समस्या पाहून आपण त्यावर काही उपाय आहे, मिळू शकतो हेच नाकारतो आणि म्हणून आपल्याला अधिक त्रास होतो.
म्हणून बाहेरच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित न करता आधी आपल्या अंतरंगात डोकवल पाहिजे. इथल्या वैचारिक समस्या दूर झाल्या की आपोआप बाहेरच्या दूर होतील.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
