Skip to content

आयुष्यभर असे जगावे की मृत्यू समयी अपराधीपणाची भावना फिरकता नये.

आयुष्यभर असे जगावे की मृत्यू समयी अपराधीपणाची भावना फिरकता नये.


मेराज बागवान


माणूस म्हटला की चुका ह्या आल्याच.किंबहुना जो चुकतो तोच माणूस.जर माणूस कधी चुकलाच नसता तर मग देवाची गरजच कधी भासली नसती.पण फक्त चुका करणे आणि सोडून देणे हे माणुसपणाचे लक्षण नाही.

जो चुकतो आणि ती चूक सुधारतो तसेच त्याच चुकीची पुनरावृत्ती करीत नाही आणि केलेल्या चुकीची जो माफी मागतो, इतरांकडे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो तोच खरा माणूस आणि तेच खरे माणूसपणाचे लक्षण.

म्हणूनच अपराध केला तरी वेळेच तो सुधारता आला पाहिजे. जेणेकरून जीवनाच्या अंतिम क्षणी कोणतीही अपराधीपणाची भावना मनात राहणार नाही.म्हणूनच आयुष्यभर असे जगावे की मृत्यू समयी अपराधीपणाची भावना फिरकता नये.

आपण अनेकदा काही गोष्टींमुळे रागावतो.चिडतो.आणि हा राग जवळच्या कोणावर तरी निघतो आणि रागाच्या भरात आपण त्या व्यक्तीला खूप काही बोलून जातो.पण राग शांत झाल्यावर आपल्याला अपराधी वाटू लागते .मग अशा वेळी आपण मनात इतर कोणताच विचार न आणता त्या व्यक्तीची मनापासून माफी मागितली पाहिजे.ती व्यक्ती काय प्रतिक्रिया देईल , माफ करेल वा ना करेल याचा विचार न करता, आपण मनापासून त्या व्यक्तीकडे दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. जेणेकरून कधी आयुष्यात ही सल टोचत राहणार नाही.

काही वेळेस जवळच्या नात्यांमध्ये, मैत्रीमध्ये फूट पडते.गैरसमजातून नाती तुटण्याच्या मार्गावर असतात.चुकीच्या संभाषणामुळे काही गोष्टींचा चुकीचा अर्थ लावला जातो. आणि मग जो तो आपल्या आपल्या परीने त्याचा अर्थ घेतो आणि मनात अढि ठेवून आयुष्यभर आपण तसेच जगत राहतो.

पण कुठेतरी मन मोकळे होणे अत्यंत गरजेचे असते.नाती पूर्ववत नाही झाली तरी स्पष्टपणे बोलणे गरजेचे असते.मनात फक्त अहंकार ठेवून किंवा ‘मीच का बोलू’ हा विचार ठेवला तर काहीच साध्य होत नाही .म्हणूनच वेळीच सर्व गोष्टी स्पष्ट करणे फार गरजेचे असते.जेणेकरून आयुष्याच्या शेवटच्या क्षणी कोणतीही अपराधीपणाची भावना मनात राहणार नाही.

आयुष्य जगत असताना तुम्हाला अनेक माणसे भेटतील.ज्यांचे स्वभाव, विचार, मते पूर्णपणे तुमच्याशी मिळतेजुळते नसतील.मग इथे, तक्रार न करता, समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर ठेवता आला पाहिजे. तुमची मते त्यांच्यावर लादली तर जात नाहीत ना हे पाहिले पाहिजे.कारण अनेकदा आपण नकळत समोरच्यावर काही अंशी जबरदस्ती करीत असतो पण त्या व्यक्तीची मात्र घुसमट होत असते.म्हणूनच प्रत्येकाचा आदर करावा.कोणतीही अपेक्षा न ठेवता आयुष्य जगावे.म्हणजे मनात कोणतीही तक्रार राहणार नाही आणि अपराधी देखील वाटणार नाही.

आयुष्य फार अवघड नाही.पण आपणच ते अवघड करून ठेवतो. थोडा संयम ठेवला की गोष्टी सुरळीत होतात. थोड्या अपेक्षा बाजूला केल्या की गोष्टी सोप्या होतात.थोडा धीर ठेवला की समस्या सुटतात.थोडे मन मोकळे केले की गैरसमज दूर होतात.थोडा स्पष्टपणा ठेवला की वेळीच पुढची गुंतागुंत टळते.वेळीच काही कठोर तर काही हलकेसे निर्णय घेतले की शांतता लाभते.असे हे जीवन सरळ सोपे असते. पण आपणच आपल्या मार्गात अडसर ठरतो आणि मनात नेहमीच अशांतता राहते.म्हणूनच आयुष्य हे असे जगायचे आहे की अंतिम क्षणी कोणतीच सल राहणार नाही.

हट्टी स्वभावामुळे , सतत इतरांकडून अपेक्षा ठेवल्यामुळे , आपण जसे आहोत तसेच जग आहे असा सतत विचार केल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात आणि मनात अनेक गोष्टी बराच काळ तशाच राहतात. आणि मग आयुष्य विस्कळीत झाल्यासारखे होते.म्हणूनच आयुष्यात फार काही तत्वज्ञान आत्मसात न करता देखील आयुष्य अगदी सोपे, साधे, सरळ आणि कोणतीही सल मनात न ठेवता जगता येते.

हसत राहा.वाटेल तेव्हा रडा. वाटेल तेव्हा व्यक्त व्हा.मोकळे व्हा.इतरांना भरभरून मदत देखील करा.पण असे कधी जगू नका की मृत्यूसमयी अपराधीपणाची भावना मनात साठून राहील.

शक्य तेवढा जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “आयुष्यभर असे जगावे की मृत्यू समयी अपराधीपणाची भावना फिरकता नये.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!