Skip to content

जे तुम्ही नाहीत, ते होत बसू नका !!!

जे तुम्ही नाहीत, ते होत बसू नका !!!


टीम आपलं मानसशास्त्र


वंदना ही घरातल्या सततच्या येणाऱ्या समस्यांना कंटाळली आहे. वर्षभरापूर्वीच तिचे लग्न झाले. सासू, सासरे, दीर आणि नवरा असं तिचं अक्ख कुटुंब. कंटाळलेल्या अवस्थेत असताना ती फार चिडचिडी होते. मनात येईल ते बोलते. नंतर त्याचेच तिला वाईट वाटते. म्हणून यातून मार्ग काढण्यासाठी ती जावेसारखी वागायला लागलीये. जावेसारखी ती पुढे-पुढे करायला लागलीये. त्यामुळे तिच्याकडे सहसा कोणी लक्ष देत नाही.

अमोल एका आय.टी कंपनीत काम करतो. मान-सन्मानाच्या तो खूप बढाया मारत असतो. इतरांकडून मान-सन्मान मिळावा म्हणून तो फुशारकीच्या गोष्टी करत असतो. तसेच नोकरीमध्ये बढती मिळावी म्हणून वरिष्ठांना खुश करण्यासाठी तो मिळेल ते काम करतोय. इतरांच्या नजरेत अमोल हा फार नाटकी दिसायला लागलाय. म्हणून सहकारी वर्ग त्याला सारखे दुर्लक्ष करायला लागले आहेत.

नंदा ही एका कॉलेजच्या लायब्ररीत एक असिस्टंट म्हणून काम पाहते. सहसा महाविद्यालयाचे इतर सहकारी आणि शिक्षक स्टाफ यांना तिचा संकुचित स्वभाव कळला आहे. कोणीही हवी तशी साथ न दिल्यामुळे ती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खूप जवळ करत आहे. सहमती मिळविण्यासाठी गोड बोलून हसत राहते.


वरील अनेक प्रकारची वागणूक ठेवणाऱ्या व्यक्ती आपण दररोज पाहत आहोत. कधी कामाच्या ठिकाणी, कधी प्रवासा दरम्यान तर काही वेळेस घरामध्ये सुद्धा आपल्याला अशी वागणूक ठेवणारी माणसं सर्रास सापडतातच. किंबहुना आपल्यामध्ये सुद्धा अशी वागणूक आहे, हे आपल्याला कळलेलं नसतं.

अशी वागणूक ठेवण्याचा मुख्य हेतू म्हणजे समोरच्याचा मनात स्वतःविषयी छाप पाडणे हा असून मग ती छाप पडल्यानंतर पुढे अनेक मनसुबे मांडले जात असतील किंवा निव्वळ आपण जे नाही आहोत ते असल्याचा एक प्रकारचा ढोंग अशा व्यक्ती करताना दिसतात.

आणि मुख्य म्हणजे अशा वागण्याची इतकी सवय जडलेली असते कि समोरचा जेव्हा ओळखून निर्देश किंवा सूचना करतो तेव्हा त्यांना सुद्धा ते जुमानत नाहीत. त्यांचं वागणं एका सूक्ष्म निरीक्षकाला पटकन बनावट वाटतं कारण नैसर्गिकरित्या त्या वागण्याचा आकार उकार पूर्णपणे बदललेला असतो.

म्हणून असे म्हटले जाते कि, जे तुम्ही प्रत्यक्ष नाही आहात, अगदी तसंच तुम्ही दीर्घकाळापर्यंत वागलात तर तुमचं सामाजिक आयुष्य धोक्यात येण्याची दाट शक्यता असते. तसेच त्यामध्ये तुम्ही इतके गुरफटून जाल कि हे वर्तन तुमच्यामध्ये आहे, याचा तुमच्याकडून कधी स्वीकाराच होणार नाही.

त्यासाठी तुमच्याठिकाणी असणाऱ्या कलागुणांना तुम्ही प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. एखादी परिस्थिती हाताळणं हि सुद्धा एक कलाच आहे. म्हणून सय्यमाने ती कला ओळखून बाहेर काढायला हवी आणि ते पाहूनच लोकं तुम्हाला नक्कीच स्वीकारतील, यामध्ये अजिबात शंका नाही.

कारण तुम्ही बनावट वागलेले नसता.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!