Skip to content

असा एकही व्यक्ती नाही ज्याला ओढ, प्रेम, आतुरता, भावभावनांविषयी आकर्षण नाही.

असा एकही व्यक्ती नाही ज्याला ओढ, प्रेम, आतुरता, भावभावनांविषयी आकर्षण नाही.


संतोष राजदेव.


तारुण्याच्या उंबरठ्यावर गुलाबी स्वप्ने कुणाला पडली नसतील?……

असा माणुस शोधुनही सापडणार नाही, ज्याला ओढ, प्रेम, आतुरता, तल्लीनता, तद्रुपता, उत्कटता….इ.. भावभावनांविषयी आकर्षण नसेल.पण ह्याच आकर्षणाला जर जबाबदारीचे कोदंण नसेल तर त्या प्रेमाला खरं पुर्णत्व येत नाही.म्हणुनच जबाबदारीचे भान ,आणणारी,जीवन शिकवणारी विवाहसंस्था,त्याच्याविषयीचा रुढार्थ व त्याचा आधुनिक समज समजुन घेण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न….

वास्तविक लग्न म्हणजे तरी नेमकं काय?

लग्नात पडलेले वा पडणाऱ्या दोन युवा जीवांची होणारी घालमेल वा त्यांना करावे लागणारे व्यवहाराचरण कसे साधावेत,असावेत,हे नुकतंच लग्न करणाऱ्यांना अनुभवाखेरीज,मार्गदर्शनाखेरीज कळणं तसं कठीणच म्हणा.मुळात केवळ शिक्षणातुन ह्या जीवनातील गुजगोष्टी समजणं तसं कठीणच .घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना ऐकीव व नुसत्या अनुभवाने जरी काही अनुभव आलेले असतील तरी पुरेश्या संवादाअभावी वा स्थितीअभावी,वेळेअभावी इतरांपर्यंत ते नेणं, हे आजच्या संवादाची प्रगती झालेल्या काळातसुद्धा कठीणच झालय.म्हणूनच आज सुधारलो जरी असली तरी गल्लोगल्ली विवाहपुर्व व विवाहपश्चात समुपदेशनाचे धंदे उभे राहिलेत.बहुतेक वृद्धांना कोरड्या सल्ल्याशिवाय अजुनही बोलण्याच्या वा प्रत्यक्ष कार्य करण्याच्या काही महत्वाच्या वेळा साधायच्यात,हेही समजणं बऱ्याचदा राहुन गेल्यासारखं वाटतंय.समाजशास्त्री वा धर्मशास्त्र्यांकडुन समाजव्यवस्थेचाच एक भाग म्हणून असलेल्या कुटुंबव्यवस्थेसाठी, ती टिकावी वा वाढावी,तिचा उदोउदो व्हावा म्हणुन काही जाणीवपुर्वक प्रयत्न होताना दिसत नाहीयेत.

योग्य जीवनशिक्षण वा जीवनानुभव न मिळालेला आजचा युवकवर्ग लग्नानंतरचे समाजशिक्षण(after marriage life)घेण्यात काहीसा चाचपडतोय असंच वाटतं.चांगले शिक्षण घेऊन त्याच्या दृष्टीने चांगल्या नोकरीस लागुन (ज्याला आपण वेल सेटेल्ड समजतो)असे शिक्षित तरुणही ह्याच गर्तेत अडकलेले आपल्याला आढळतात.एकतर शिक्षणाचा जीवनाशी संबंध येतोच असेही नाही.त्यामुळे नवखा चाचपडणारच..महत्व न कळल्याने प्रवाहात वाहत जाण्या-यांचे प्रमाणही वाढले…

म्हणुनच नवखा अडचणीत आल्यावर उद्विग्न तर होतो नाही तर निराश तरी होतो. दिवसेंदिवस सातत्याने आलेले नैराश्य आणि त्यातुनच आलेल्या व्यसनाधिनतेपायी आजची युवापिढी वाममार्गाकडे तर जात नाही ना?,ह्याचा विचार आज प्रत्येक घरांगणिक पालकांना करावा लागतोय.

ज्याच्यासोबत लग्नाच्या गाठी बांधल्या गेल्यात,तो वर(नवरा) उंच असावा असं आजही म्हणतात,मग ती कुठली उंची?

ज्याने प्रगतीसाठी केलेल्या स्वकष्टाने,प्रामाणिकतेने व स्वपुरुषार्थाने,घामाने कमावलेल्या मध्येच मी संतुष्ट राहील,घरात विविध स्वभावांशी संतुलन राखण्याची, ठेवण्याची वृत्ती जेव्हा तरुणी जोपासेल, तत्समयी चार इंच छाती पुढे काढुन त्याला साजेसे कुटुंबसमर्पणयुक्त वर्तन तरुण आपल्या प्रत्यक्ष व्यवहारात आणेल, तेव्हा तो उंच झाला असे समजावा.लग्नाआधी ही उंची वधुकडच्यांना तपासुन पाहावी लागते.लग्न झाल्यावर घरात काही कमी का जास्त हा प्रश्नच नाही.कमी असेल तरी जगता आले पाहिजे आणि जास्त असेल, तर ते व्यवस्थित संयोजन करुन जगता आले पाहिजे.विपुलतेत जरी सुख असले तरी काही कमी असले तरी मिळुन वाटुन खाण्याचा आनंद कमी नाही,असा आनंद ज्याला आला तो आयुष्यभर तो विसरत नाही…शेवटी सुखदुःखात एकमेकांची साथ महत्वाची.

माझ्या पतीशीच/पत्नीशीच घनिष्ठतेसाठी,सुखी वा आनंदी परिवारासाठी एक होण्यासाठी काहीच बाऊ न करता काही प्रयत्न करावे लागतात,काही जबाबदाऱ्या वेळीच्या वेळेवर पार पाडाव्या लागतात,हे ध्यानात घेणे अत्यावश्यक आहे.तरच  कर्तृत्वशील व प्रयत्नशील बनुन काही मिळवण्याची वा संघर्षात टिकण्याची,कुटुंबासाठी काही करण्याची महत्वाकांक्षा वाढते .एकमेकांची सततच्या भेटीची आतुरता,आठवण यामुळे प्रेमस्थिरता लाभते. मग आलेल्या अडीअडचणीत मार्गदर्शनाची साथ लागते ती भावनेने समृद्ध झालेल्या वृद्धांची.भले त्यांनी त्यांच्या आयुष्यात यशाचा फार मोठा टप्पा गाठलेला नसु देत, पण अनुभवांचा साठा तर असतोच ना!त्याच अनुभवाच्या श्रवणामृताने जीवनशिक्षण अधिकाधिक प्रगल्भ होत जाते.म्हणुन त्यांचे सन्मान,आदराथित्य,संगोपन व्यवस्थित व्हायलाच हवे,तरच कुटुंब टिकतं,वाढतं,स्थिर होतं,भाववाही होतं…आपल्या लग्नसंस्थेत आवर्जुन ही गोष्ट आहे.

भांडण ही होतात,तशी शमतात देखील. पण त्याला अधिक महत्व न देता त्यात सुसंवाद साधुन योग्य रुपाने प्रसंगी समजंसाने माघार घेऊन घराचे चिरकाल सौंदर्य टिकवण्याकडे संवादरुपी,कृतीयोग्य कल असला पाहिजे.नवरा-बायकोच्या भांडणात विचाररुपी संवाद असला तर ती लवकर शमतात.नाही तर विसंवाद व अप्रतिसाद असेल तर त्याचे दुरगामी परिणाम पुढील निर्णयावर होतात,आणि माणुस आपल्या जीवनात जिथल्या तिथेच अडकून राहतो. जग कुणासाठी थांबत नसते,आणि आयुष्यात निर्णय तर पटापट घ्यायला लागतात,तेव्हा विसंवादाने,अधोरेखित न केल्याने वा प्रतिसाद न दिल्याने,बाहेर घरातल्या क्षुल्लक गोष्टी बाहेर नको त्याच्याशी शेअर केल्याने अख्खं कुटुंब भांडणाच्या दरीत जातं.

म्हणुनच आपल्याकडे एक पद्धत आहे.लग्न झाल्यावर एकमेकांचा दृढपरिचय होण्याकरता सुरुवातीला काही व्यवहाराचे रितीरिवाज पाळावे लागतात,त्यामागचा पारंपारीक भाव समजुन ती गोष्ट थोडी का होईना,पण वेळच्या वेळेवर करावी लागते.जोडप्यांमधला परस्पर गाढ विश्वास अधिकाधिक दृढ होणं,त्यासाठी ऐकीव माहितीवर लगेचच घरातल्या इतरांनी प्रतिक्रिया न नोंदवणं हे फार महत्वाचं ठरतं,अन्यथा संघर्ष ठरलेलाच.काही कमी असले तरी चालेल पण ज्याच्यावर प्रेम करतो/करते, त्यावरील विश्वास मात्र अंखड आणि अभंग असावा.अख्ख जग जरी विरोधात गेले तरी चालेल,काही वस्तु वा पैसा कमी असला तरी चालेल पण माझ्या प्रेमाच्या व्यक्तीवर प्रश्नचिन्ह कुणी उपस्थित करता कामा नये,ह्या वृत्तीमुळे संसार उभारी घेतो.ज्याच्यावर प्रेम त्याच्यासाठी काहीतरी करण्याची तीव्र’ अभिलाषा निर्माण होते.पण ज्या व्यक्तीसाठी संपूर्ण आयुष्य दिले, त्यानेच जर त्या व्यक्तीपरोक्ष किंवा सर्वांसमक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर संसारमन तुटते.तुटलेले ह्रद्य,मन एक तर तथाकथित ऐकिव त्यागाकडे(?)जाते किंवा व्यसनाधिनतेकडे वा वाममार्गाकडे जाते.म्हणुन आपल्याकडे धर्मशास्त्री म्हणत असतात.एक होण्यासाठी तुम्ही जितका प्रयत्न करता तितकाच प्रयत्नसंघर्ष एका ध्येयाचे ,एका महत्वकांक्षेचे,एका विचारांचे,एका कार्याचे होण्यासाठी झाला पाहिजे.

ज्या गोष्टींमुळे ,तसेच ज्या माणसांमुळे आपले अस्तित्व आहे ,त्यांना जपलं पाहिजे. दोघांचे  जीवन उभे करण्यासाठी जी माणसं झिजली ,अशांची जपणूक दोघांनी करणं क्रमप्राप्त आहे. अशा संसारात,व्यवहारात,देवकार्यात जे काही कडु-गोड संघर्ष होतील त्यात एकमेकांची अतुट साथ लाभली तर नक्कीच संसाराबरोबर आयुष्यही आनंदार्थी विकास पावेल.जीवनार्थाच्या जवळ जाण्यासाठी मदत होईल.म्हणुन आपल्याकडे विवाहाचे बंधन फार महत्वाचे मानले जाते.काहीही झाले तरी आजन्म मी एकाच पत्नीशी/पतीशी एकरुप होण्याचा जीवापाड प्रयत्न करेल,ह्याच धर्तीवर आपले कायदेशास्त्र सुद्धा बरेच काही सुचित करते.विवाह घटस्फोट सहजता व व्यक्तीस्वातंत्र्यवाद अमर्याद फोफावल्यानेच समाजाचा एक कप्पा असलेली कुटुंबव्यवस्था/गृहस्थाश्रम ढासळत आहे.आज त्यामुळेच विवाहबंधने नकोशी वाटायला लागलीयेत.त्याविषयी प्रत्येकाला अभ्यास करावा लागेल.भविष्यात त्याचे होणारे दुरगामी परिणाम आज अभावाने कुठे ना कुठे पाहायलाही मिळत आहेत.म्हणुन लग्न केले तर निभवावे लागते अशा व्यवहारु कामचलाऊ वृत्तीने जगण्यापेक्षा आधी लग्न म्हणजे तरी नेमकं काय? ते तरी प्रत्येकाने समजुन घ्यायला हवं….!

आपल्याकडे लग्न बंधन खरं,पण लादलेलं नाही,तर स्वतःहुन स्विकारलेलं,आणि ते ही देवाधर्माच्या साक्षीने.स्विकारलेल्या आणि लादलेल्या बंधनात फार मोठा फरक आहे.प्रेमापोटी स्वतःहून घालुन घेतलेल्या बंधनात आणि जबरदस्तीने लादलेल्या बंधनात फरक असतो.उदात्त होण्यासाठी झाड जसं मुळांचं,आणि नद्या जश्या काठांचं बंधन स्विकारतात न अगदी तसंच!वर्षानुवर्ष झाडांच्या मुळास खतपाणी वेळच्यावेळी प्रेमाने दिले तर संसाराचा वटवृक्ष बहरतो.नदी काठाचं बंधन स्विकारून ती कितीतरी जणांची क्षुधातृष्णा भागवत नंतर समुद्रास जाउन भेटते,नि कृतार्थ होते.आणि हे आपल्या संस्कारात सर्वश्रृत आहेच.नेमक्या ह्याच वृत्तीने स्वत:चे मीपण समर्पण भावाने आयुष्यभर द्वयिंनी जोडुन घेतले तर अनेक कुटुंबे भाववाही व संस्कारी बनून समाज नक्कीच विकास पावेल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “असा एकही व्यक्ती नाही ज्याला ओढ, प्रेम, आतुरता, भावभावनांविषयी आकर्षण नाही.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!