Skip to content

अतिविचार हे मनामध्ये अवास्तव भ्रम उत्पन्न करतात.

अतिविचार हे मनामध्ये अवास्तव भ्रम उत्पन्न करतात.


हर्षदा पिंपळे


‘अतिविचार’…… जो की माणूस आजकाल सातत्याने करताना दिसतो.खरं तर अतिविचार हे मनामध्ये अवास्तव प्रकारचे भ्रम उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतात.त्यावरून लक्षात येऊ शकतं की अतिविचार करणं किती घातक असू शकतं.

आता भ्रम म्हणजे थोडक्यात काय तर एखाद्या गोष्टीबद्दल आधीच नाही तो समज करून घेऊन त्याच विचारात राहणे.आता माणूस अतिविचारामध्ये इतक्या खोलात जाऊन विचार करतो की काही विचारायलाच नको.वास्तवात जे आहे त्यापलिकडे जाऊन माणूस विचार करतो.आणि वास्तवात जे घडलं नाही त्याच भ्रमात माणूस राहतो.अतिविचारांमुळे वेगवेगळे अवास्तव असे भ्रम माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होतात.अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो.कधी कधी तर त्यापैकी एक आपण स्वतःच असतो.

सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे परिक्षा आणि परिक्षेचा रिझल्ट….

(परिक्षा जसजशी जवळ येऊ लागते तसतस मुलांची अवस्था पहायची.भित्र्या सशापेक्षाही त्यांची कित्येकदा बिकट अवस्था झालेली असते.मुळातच परिक्षेला जाण्याआधीच ते खूप म्हणजे खूप विचार करतात.हाच अतिविचार मुलांच्या मनात “पेपर अवघड जाणार,मला काही लिहीता येणार नाही,घरचे ओरडतील ,शिक्षकही खूप ओरडतील” अशाप्रकारचा अवास्तव भ्रम उत्पन्न करतात. याच भ्रमात मुलं राहतात.परिणामी याचा मुलांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यताच जास्त असते.

आता अनेकदा कितीतरी पालकांची मुलांच्या परिक्षेतील भूमिका ही भीतीदायकच वाटते.आपल्या मुलाने चांगला अभ्यास करावा,चांगल्या मार्काने पास व्हावं असं प्रत्येक पालकांना वाटतं.आणि त्यात काही गैरही नाही. परंतु काही पालकांच्या अपेक्षाच इतक्या असतात की खरच यावर काय बोलायच नी काय नाही हेच कळत नाही.हे पालक आपल्या पाल्याबद्दल इतका विचार करतात की…हो, माझ्या मुलाला ९५% पडणार आहेत.आणि पडायलाच हवे.त्याच्यापेक्षा त्याला कमी पडूच शकत नाही. असं त्यांना वाटत राहतं.परंतु कधी कधी ह्या अपेक्षा पूर्णच होत नाही. नंतर स्वतःच स्वतःला दोष बसतात. मी उगाचच या भ्रमात राहिले. आत्ता कळतय हा माझा भ्रम होता वगैरे वगैरे.)

प्रामाणिकपणे सांगायच झालं तर…..

मुलांनी त्यांच्या परिने सगळं काही दिलेलं असतं.आणि त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना ते मिळतं.नेहमीच अवास्तव अशा अपेक्षा करून काय उपयोग असतो..? साधं सरळ सोपा विचार करूच शकतो न आपण…? ठीक आहे,जे काही असेल ते त्याला ते मिळेल असा विचार करून पुढे गेलो तर काही अडचण आहे का…? अतिविचार करून काही पालकांच्या मनात उगाचच अवास्तव असा भ्रम उत्पन्न होत राहतो.आणि अनेकदा भ्रमनिरासही होतो.

पहा या उदाहरणावरून नक्कीच लक्षात येईल की,अशा कोणत्याही वेळी अतिविचार करण्याची खरच गरजच नाही. एक साधा विचार मनात येणं अगदी नैसर्गिक आहे परंतु अतिविचार करणं मात्र हानिकारक आहे. हा अतिविचार नको तो अवास्तव भ्रम निर्माण करून माणसाला उद्ध्वस्त करू पाहतो.

खरचं , अतिविचार हा घातकच…! माणूस हा विचार करणारा प्राणी आहे हे जरी खरं असलं तरीही सध्याच्या ह्या धकाधकीच्या काळात माणसाला अतिविचाराने ग्रासलेले आहे.सध्याचा माणूस विचार नाही तर अतिविचार करत आहे.माणूस इतका विचार करतोय की त्याला थांब म्हणून सांगावं लागतय.रोज सवयीने न चुकता जेवण करतो तसच हल्ली माणूस न चुकता अतिविचार करतो.एक वेळ माणसाच्या खाण्यावर नियंत्रण आहे पण अतिविचार करण्यावर किंचितही नियंत्रण दिसत नाही.

अतिविचार ही गोष्ट एखाद्या समस्येसारखीच झाली आहे.दिवसागणिक ती वाढतच आहे.

लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवले जाते की माणसाने विचार करायला हवा.आणि त्यानंतर एखादी कृती करायला हवी. माणूस जितका चांगला विचार करतो तितकच त्याच आयुष्य निरोगी राहतं.त्यामुळे माणसाने चांगला विचार जरूर करावा हे आपल्याला सांगितल जातं.परंतु आत्ताची परिस्थिती पाहता चित्र वेगळ आहे.माणूस हा एक विचारी प्राणी राहिला नसून तो अतिविचाराने ग्रासलेला आहे. याच अतिविचारामुळे माणसाला वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक व्याधी जडताना दिसतात.

अतिविचारांमुळे शरीरातील कोर्टीसोल हार्मोन्स वाढू लागतात आणि याचाच परिणाम मेंदूतील कनेक्टिव्हिटीवर होत जातो.त्यामुळे चिडचिड, ताणतणाव,चिंताग्रस्त राहणे, मूड स्विंग्स होणे,आतड्यांची कार्यक्षमता, डोकेदुखी ,निद्रानाश अशा अनेक समस्यांना माणसाला तोंड द्यावे लागते.

खरचं… कोणतीही गोष्ट असुद्या. त्या गोष्टीविषयी आधीच इतका विचार करू नका की जेणेकरून मनामध्ये अवास्तव असे भ्रम उत्पन्न होऊ शकतात. ज्याचा परिणाम आपल्या शरिरावर, मानसिकतेवर होऊ शकतो.

थोडा थोडका नी सरळ विचार करा.एखादी गोष्ट घडलीच नसेल तर त्याविषयी आधीच अतिविचार करणं सोडून द्या.जे समोर आहे त्याचा विचार करा.कारण अतिविचार करणं केव्हाही घातकच ठरू शकतं.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “अतिविचार हे मनामध्ये अवास्तव भ्रम उत्पन्न करतात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!