Skip to content

अतिशय सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यात नकारात्मक बदल घडवतात ,कसं ते वाचा

अतिशय सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यात नकारात्मक बदल घडवतात ,कसं ते वाचा


दिपाली मुळे

(लाइफ कोच
इमेज कन्सल्टंट)


नितीन आणि उन्मेष बिझनेस पार्टनर …….नितीन अतिशय सुस्वभावी ,कायम फक्त सकारात्मक विचार करणारा…. उन्मेष मात्र आतल्या गाठीचा ,वर वर अगदी सगळं चांगलं वागतो असं दाखवणारा…. यामुळे नितीन उन्मेष बद्दल कधीही वाईट विचार करत नसे.त्यांचा बिझनेसही चांगला चालला होता. उन्मेषला नितीन चा विश्वास मिळवणे जराही कठीण गेले नाही. कारण नितीन कायम चांगलाच विचार करत होता. सकारात्मकतेचा आहारी गेल्याने उन्मेष आपलं काही नुकसान करेल अशी कल्पना देखील नितीन करू शकत नव्हता .काही काळानंतर उन्मेषने सगळा बिजनेस स्वतःच्या आधिपत्याखाली घेतला .हे सगळं पाहिल्यावर नितीन ला प्रचंड मानसिक धक्का बसला उन्मेष असे करू शकत नाही असेच नितीनला अजूनही वाटत होते. याच विचारांमुळे नितीन नैराश्यात गेला.मैत्रीच्या नावाने नितीन आता घाबरत होता.

दुसरे उदाहरण पाहू या …अभिषेक आणि रेवा एक मध्यमवर्गीय जोडपे … रेवा शाळेत शिक्षिका आणि अभिषेक बँकेत क्लार्क…. रेवा अतिशय महत्त्वाकांक्षी आणि अभिषेक एकदम साधा कायम अति सकारात्मकतेने विचार करणारा.. या त्याच्या विचारसरणीमुळे त्याला रेवाच्या वागण्याचा कधीही संशय आला नाही. पण झटपट श्रीमंत व्हायच्या धडपडी मुळे रेवा मात्र वाईट मार्गाला लागली…. शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत प्रेमाचे नाटक करत होती…. अभिषेक आपल्या मित्रांना नेहमी सांगत असे की रेवावर माझा स्वतः पेक्षा जास्त विश्वास आहे .ती कधीच चुकीचे वागू शकत नाही .पण जेव्हा सत्य अभिषेक समोर आले.अभिषेक चा संताप झाला .नात्यांवरचा त्याचा विश्वास उडाला त्याने रेवाला घटस्फोट दिला पण पुन्हा कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

तिसरे उदाहरण …… अमित सॉफ्टवेअर इंजिनियर… दिवसभर काम करावे लागे.त्याला व्यायामाचा कंटाळा ….त्यातून मी खूप स्ट्रॉंग आहे ,मला कधीच काही होऊ शकत नाही अशी अति सकारात्मक मानसिकता… कायम बैठे काम… व्यायामाचा अभाव …चुकीची जीवनशैली…. जंक फूड खाणे ….व्यसनांचा भडिमार …….याचा परिणाम व्हायचा तोच झाला. अमित आजारी पडला. बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्याची तब्येत जरा सुधारली पण मानसिकता मात्र पूर्णपणे नकारात्मक होऊन तो बारीक-बारीक शारीरिक बदलांना देखील फारच गांभीर्याने घेऊ लागला. त्यामुळे कायम तणावग्रस्त राहू लागला…. आपल्याला काही होणार तर नाही ना या अनामिक भीतीने अमितला ग्रासले.

चौथे उदाहरण पाहूया… शिवम… पुनम व अनुपचा मोठा मुलगा …कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला ….पण एवढ्यात त्याचे वागणे एकदम बदललेले तो कायम एकटा राहू लागला… पैसे जास्त खर्च करू लागला…. कधीकधी तर रात्रभर बाहेर राहत असे..पूनम आणि अनुपने त्याला चांगले संस्कार दिले होते .पण त्याच्या मित्रांकडे मात्र लक्ष दिले नाही .शिवम कधीच वाईट मार्गाला जाणार नाही अशी अतिशय सकारात्मक समजूत दोघांचीही होती .ज्यावेळी शिवम आजारी पडला तेव्हा डॉक्टरांकडून कळाले त्याला दारूचे आणि ड्रग्जचे व्यसन लागले होते. शिवम वाईट संगतीला लागला होता अजूनही हे सत्य स्वीकारण्यास तयार नव्हते. यामुळे शिवमला पुन्हा व्यसनाकडे वळण्यापासून ते रोखू शकले नाही. शिवम आता पूर्ण व्यसनाधीन झाला होता.

मित्रहो वरील चारही उदाहरणांमध्ये आपण पाहिले की आपल्या सकारात्मक विचारांमुळे आयुष्यात किती नकारात्मक बदल झाले .पहिल्या उदाहरणात नितीनने उन्मेष बद्दल इतका सकारात्मक विचार न करता बिझनेस बद्दल थोडे जागरूक राहायला हवे होते .मैत्री जरी असली तरी जिथे पैशांचा व्यवहार होतो तिथे डोळसपणे वागायला हवे होते .म्हणजे नितीन नैराश्याला सामोरे जावे लागले नसते .मैत्री वरचा त्याचा विश्वास उडाला नसता .

अति सकारात्मकतेने नितीन ला माणसांवर विश्वास ठेवू नये अशा नकारात्मक बदलाकडे लोटले. दुसऱ्या उदाहरणात अभिषेकला रेवाचा महत्त्वाकांक्षी स्वभाव माहीत होता. तरीही अत्यंत सकारात्मक विचारांमुळे रेवा या थराला गेल्याचे त्याला कळाले नाही .त्यांने जागरूक राहून वेळीच रेवाला समजावले असते, थांबवले असते तर कदाचित आज रेवा व अभिषेक सुखाने संसार करत असते .पण अभिषेक सकारात्मक विचारांमुळे गाफील राहिला परिणामी रेवाच्या विश्वासघातामुळे अभिषेक चा लग्न संस्थेवरचा विश्वास उडाला. आणि पुन्हा लग्न न करण्याचा नकारात्मक बदल त्याने त्याच्या आयुष्यात घडवून घेतला .

तिसऱ्या उदाहरणात अमितच्या अधिक सकारात्मक विचारांमुळे त्याने त्याच्या शारीरिक आरोग्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले. परिणामी आजारपण आले .अति प्रमाणात शारीरिक त्रास सहन करावा लागला. काळजी आणि तणाव असे नकारात्मक बदल त्याच्या आयुष्यात झाले आणि कायम भयग्रस्त असे जीवन जगू लागला. चौथ्या उदाहरणात पूनमआणि अनुप यांनी त्यांच्या मुलावर अतिसकारात्मकतेने विश्वास टाकला आणि शिवम वाईट संगतीला लागलेले त्यांना लक्षात आले नाही .आई-वडील चांगले संस्कार देतात पण तरीही तरुण मुलाकडे थोडे बारीक लक्ष द्यावे लागते याकडे संपूर्ण डोळेझाक केल्याने शिवम पूर्ण व्यसनाधीन झाला .

मंडळी प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात .सकारात्मक विचार करायचा म्हणजे त्या गोष्टीबद्दल किंवा माणसाबद्दल नकारात्मक बाजूचा विचार अजिबातच करू नये असे नाही .सकारात्मक विचार करणे म्हणजे त्या गोष्टी माणसाचे चांगले वाईट दोन्ही बघणे .त्याला चांगल्या गोष्टींकडे वळवणे .सकारात्मकता म्हणजे संपूर्ण स्वीकार करणे गुणदोषांसकट किंवा फायद्या-तोट्यासह. पण याचा अर्थ आंधळेपणाने वागणे वा विचार करणे असा नव्हे ..जागरूक राहून वेळच्यावेळी नुकसान टाळता येते.’ अति सर्वत्र वर्जयेत’ या उक्तीप्रमाणे गोष्ट चांगली असो वा वाईट वा सकारात्मक असो … अति प्रमाणात वापरल्यास विषाचे काम करते .तेव्हा अतिप्रमाणात नकोच.कुठलीही गोष्ट प्रमाणातच चांगली वाटते नाहीतर जीवनाची चव जाते .बरोबर ना ….? मग सकारात्मकताही अति नको. सृष्टीच्या लॉ ऑफ अट्रॅक्शन अंतर्गत विरुद्ध गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात .म्हणजे जिथे अति सकारात्मकता असेल तिथे कमालीची नकारात्मकता आकर्षिली जाणारच ..म्हणून सकारात्मकता सुद्धा प्रमाणातच असलेली बरी …..!!

धन्यवाद !!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!