आपण आयुष्यात अनेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण कधी स्वतःच्या मनात डोकावून पाहिलं आहे का? आपल्याला नेमकं काय हवं आहे, कशामुळे आनंद मिळतो, कशामुळे दुःख होतं आणि आपण स्वतःपासूनच का दूर जात आहोत? स्वतःला ओळखायचं असेल, तर रोज स्वतःला हे १० प्रश्न नक्की विचारा. कदाचित या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्याच एका नव्या रूपाची ओळख करून देतील!
आपण आपल्या आयुष्यात अनेक लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. कोणाला काय वाटत असेल, कोणाच्या मनात काय सुरू असेल, कोणाला आपल्याकडून काय अपेक्षित असेल, याचा विचार करण्यात आपला बराच वेळ जातो. मात्र या सगळ्यात आपण स्वतःला किती समजून घेतो, हा प्रश्न अनेकदा अनुत्तरित राहतो.
आपल्याला नेमकं काय हवं आहे? आपण आनंदी आहोत की फक्त आनंदी असल्याचं दाखवत आहोत? आपल्याला कोणत्या गोष्टींचा त्रास होतो? आपण एखाद्या परिस्थितीत वारंवार तीच चूक का करतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्वतःच्या मनात शोधावी लागतात.
मानसशास्त्राच्या दृष्टीने स्वतःला समजून घेण्याच्या या प्रक्रियेला ‘Self-Awareness’ म्हणजेच आत्मजाणीव असं म्हणतात. आत्मजाणीव म्हणजे स्वतःचे विचार, भावना, वागणूक, इच्छा, मर्यादा आणि गरजा यांची जाणीव असणे.
ज्या व्यक्तीला स्वतःच्या भावना आणि विचार समजतात, तिला स्वतःच्या वागण्यामागची कारणं शोधणं अधिक सोपं जातं. त्यामुळे भावनिक निर्णय घेण्याऐवजी विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता विकसित होऊ शकते.
स्वतःला समजून घेण्यासाठी रोज काही मिनिटं स्वतःसाठी काढा आणि स्वतःला खालील दहा प्रश्न विचारा.
१. आज मी खरोखर आनंदी आहे का?
दिवसभर आपण अनेक कामं करतो, लोकांशी बोलतो, हसतो आणि आपली जबाबदारी पार पाडतो. पण या सगळ्यात आपण मनापासून आनंदी आहोत का, हे तपासतो का? कधीकधी आपण बाहेरून आनंदी दिसत असतो; परंतु आतून अस्वस्थ असतो. त्यामुळे स्वतःच्या भावनांना समजून घेण्यासाठी हा प्रश्न स्वतःला विचारा. आपल्या मनात नेमकं काय सुरू आहे, हे स्वीकारायला शिका.
२. सध्या माझ्या मनात सर्वाधिक कोणता विचार सुरू आहे?
आपल्या मनात दिवसभर असंख्य विचार येत असतात. काही विचार भविष्याबद्दल असतात, काही भूतकाळातील घटनांबद्दल असतात, तर काही इतर लोकांच्या वागण्याबद्दल असतात. मात्र कोणता विचार आपल्याला सतत अस्वस्थ करत आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण एखादा विचार वारंवार मनात येत असेल, तर त्यामागे अपूर्ण अपेक्षा, भीती, चिंता किंवा एखादी भावनिक गरज असू शकते.
३. मी स्वतःसाठी पुरेसा वेळ देतो का?
आपण कुटुंबासाठी, मित्रांसाठी, कामासाठी आणि इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वेळ काढतो. मात्र स्वतःच्या आवडीसाठी, विश्रांतीसाठी आणि मानसिक शांततेसाठी किती वेळ देतो? स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थी होणं नाही. उलट स्वतःच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि मानसिक ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी तो आवश्यक असतो.
४. मला नेमकी कोणती गोष्ट मानसिक त्रास देते?
काही लोकांचं वागणं, सततच्या जबाबदाऱ्या, अपयश, तुलना, आर्थिक चिंता किंवा नात्यांमधील तणाव अशा अनेक गोष्टी आपल्याला मानसिक त्रास देऊ शकतात. मात्र प्रत्येक वेळी आपल्याला नेमकं कशामुळे त्रास होतो, हे समजत नाही. त्यामुळे स्वतःच्या अस्वस्थतेचं कारण शोधण्याचा प्रयत्न करा. कारण समस्या समजल्याशिवाय त्यावर योग्य मार्ग शोधणं कठीण असतं.
५. मी स्वतःकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतो का?
प्रत्येक काम परिपूर्ण झालं पाहिजे, प्रत्येक वेळी यश मिळालं पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत चूक होता कामा नये, अशा अपेक्षा आपण स्वतःकडून ठेवतो का? स्वतःला सतत सिद्ध करण्याच्या प्रयत्नात अनेकदा आपण मानसिकदृष्ट्या थकून जातो. स्वतःकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही; पण त्या वास्तववादी असणं आवश्यक आहे. स्वतःच्या चुका स्वीकारून त्यातून शिकणं हीसुद्धा प्रगतीच आहे.
६. मी माझ्या भावनांना मोकळेपणाने व्यक्त करतो का?
काही वेळा आपल्याला राग येतो, दुःख होतं, भीती वाटते किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे मन दुखावतं. मात्र समोरची व्यक्ती काय विचार करेल, या भीतीने आपण भावना व्यक्त करत नाही. सतत भावना दाबून ठेवल्यामुळे भावनिक अस्वस्थता वाढू शकते. त्यामुळे आपल्या भावना ओळखणं, त्यांना योग्य शब्द देणं आणि गरजेनुसार विश्वासू व्यक्तीशी बोलणं महत्त्वाचं आहे.
७. मी माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टी बदलण्याची गरज आहे?
आपल्या आयुष्यातील काही सवयी, विचार करण्याची पद्धत किंवा वागण्याच्या काही पद्धती आपल्यासाठी अडचणी निर्माण करत असतात. उदाहरणार्थ, प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करणं, सतत इतरांशी तुलना करणं, प्रत्येकाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करणं किंवा स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करणं. या गोष्टी लक्षात आल्यावर त्यामध्ये हळूहळू बदल करण्याचा प्रयत्न करा. स्वतःमध्ये बदल घडवण्याची सुरुवात स्वतःच्या चुका ओळखण्यापासून होते.
८. मी माझ्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींची दखल घेतो का?
अनेकदा आपण आयुष्यात काय मिळालं नाही, याचाच विचार करत राहतो. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. आपले प्रयत्न, छोटी यशस्वी कामं, चांगली माणसं, मिळालेल्या संधी आणि स्वतःमधील सकारात्मक गुण यांची दखल घेणं आवश्यक आहे. यामुळे स्वतःबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते.
९. मी इतरांच्या अपेक्षांनुसार जगतोय की स्वतःच्या मूल्यांनुसार?
अनेकदा इतरांना काय वाटेल, लोक आपल्याबद्दल काय बोलतील किंवा आपल्याला नकार दिल्यामुळे कोणाचं मन दुखावेल, या विचारातून आपण निर्णय घेतो. हळूहळू आपण स्वतःच्या इच्छा आणि आवडींपासून दूर जातो. त्यामुळे स्वतःला विचारा की मी जे काही करतोय, ते माझ्या खऱ्या इच्छेनुसार आहे का? की केवळ इतरांना आनंदी ठेवण्यासाठी करत आहे? स्वतःच्या मूल्यांनुसार जगण्याचा प्रयत्न केल्यास स्वतःबद्दल समाधान निर्माण होण्यास मदत होते.
१०. उद्यापासून स्वतःमध्ये कोणता एक छोटासा सकारात्मक बदल करू शकतो?
स्वतःला समजून घेणं महत्त्वाचं आहेच; पण त्यातून मिळालेल्या जाणिवांचा उपयोग आपल्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी करणं त्याहून महत्त्वाचं आहे. कदाचित उद्यापासून तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढाल, एखादी वाईट सवय कमी कराल, नियमित व्यायाम कराल किंवा मनातल्या गोष्टी विश्वासू व्यक्तीशी बोलून व्यक्त कराल. बदल किती मोठा आहे यापेक्षा तो सातत्याने करण्याची तयारी अधिक महत्त्वाची आहे.
स्वतःला समजून घेणं ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे!
लक्षात ठेवा, स्वतःला समजून घेण्यासाठी नेहमी दुसऱ्यांच्या सल्ल्याची किंवा मार्गदर्शनाची गरज नसते. कधीकधी शांत बसून स्वतःच्या मनाशी संवाद साधणंही पुरेसं असतं.
रोज रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनिटं स्वतःसाठी काढा. वरील प्रश्न स्वतःला विचारा. शक्य असल्यास त्यांची उत्तरं एका डायरीमध्ये लिहा. काही दिवसांनी ती उत्तरं पुन्हा वाचा. तुम्हाला स्वतःच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि वागण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल जाणवू शकतात.
स्वतःला समजून घेतल्यामुळे स्वतःच्या गरजा ओळखणं, भावनांचं व्यवस्थापन करणं, निर्णय घेणं आणि नात्यांमध्ये योग्य मर्यादा ठेवणं अधिक सोपं होऊ शकतं.
कारण आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे, हे विचारलं तर उत्तर स्वतःपासून सुरू झालं पाहिजे. इतरांना समजून घेण्यापूर्वी स्वतःला समजून घ्या. कारण स्वतःशी असलेलं नातं जितकं निरोगी असेल, तितकं आयुष्य अधिक समतोल आणि अर्थपूर्ण बनवता येईल.
धन्यवाद.

