अशांसाठी अजिबात रडू नका, ज्यांनी तुमचं हसणं विसरायला लावलंय.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
आपल्या आयुष्यात जी वेगवेगळी नाती असतात ती आपल्याला आधार देत असतात, आपली सोबत करत असतात. गडद अंधारात आशेचा जसा एक किरण येतो तशी ही नाती असतात. एक चांगल कुटुंब, एक चांगला समाज यातूनच तयार होत असतो. पण जशी एखाद्या गोष्टीची चांगली बाजू असते तशी त्याच्या उलट पण बाजू असतेच. म्हणजेच काय तर आपल्या जीवनात जी काय नाती असतात, माणसं असतात सगळीच चांगला, छान अनुभव देऊन जातात अस नाही. सर्वांकडूनच आपल्याला प्रेरणा मिळते अस नाही.
आपल्याला वाईट अनुभव देखील येतात. बरेचदा आपल्या माणसांकडून तर कधी अगदी थोडी ओळख असलेल्या व्यक्तींकडून. पण जास्त प्रभाव कोणाचा पडत असेल तर तो ज्यांना आपण आपल मानतो, जवळच मानतो, ज्यांच्यासाठी आपण आपल्या आयुष्यातील बहुमूल्य वेळ दिलेला असतो त्यांचा असतो. आपण अश्या व्यक्तीसाठी आपली ऊर्जा, वेळ, पैसा सर्व काही खर्ची पाडत असतो. पण अस होत की बदल्यात आपल्याला फक्त त्रास मिळतो. आपण त्या व्यक्तीकडून काहीतरी अपेक्षा ठेवलेल्या असतात. एक माणूस म्हणून त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी स्थान दिलेले असत. पण त्या व्यक्तीकडून त्याची जाण ठेवली जात नाही. त्यांच्या आयुष्यात आपल्याला म्हणावी तशी किंमत नसते, ना आपलं महत्त्व असत.
त्यामुळे आपण कितीही चांगल वागल, त्यांच्या मनासारखं केल तरी त्याचा काही फायदा होत नाही. आपल्याला बदल्यात मनस्ताप मिळतो. आपल्या चांगल्या, हसत्या खेळत्या आयुष्यावर गोष्टीचा प्रभाव पडतो. समोरच्या व्यक्तीने दिलेले दुःख, त्रास एक ट्रॉमा बनून जातो जो माणसाचं आयुष्य बदलून टाकतो. इतकं की आपल्या स्वभावात, आपल्या वागण्या बोलण्यातच फरक पडतो. आपला स्वभाव बदलतो. आपल्या चेहऱ्यावरचं ते हसू, आयुष्य भरभरून जगण्याची आपली उर्मी कुठेतरी कमी होऊन जाते. कारण नकारात्मक भावना मनात घर करतात. ज्या माणसावर विश्वास ठेवलेला असतो त्याच्याकडून वेगळीच वागणूक मिळाल्याने एक फसवले गेल्याची भावना मनात येते. कारण तशी अपेक्षाच नसते.
करीना कपूर आणि शाहीद कपूरचा जब वुई मेट हा मुव्ही आपण सर्वांनी पाहिलाच असेल. त्यात करीना कपूर ने गीत अशी एक पंजाबी मुलीची भूमिका साकारली आहे. बडबड्या स्वभावाची, हसरी, आयुष्यावर प्रेम करणारी ही गीत. हीच एका मुलावर प्रेम असत. त्याच्यासाठी ती स्वतःच्या घरातून पळून जाते. कोणाला काहीही सांगत नाही. त्या मुलावर तिचा इतका विश्वास असतो की तिला वाटत असत आपण आपल्या घरातून जरी पळून गेलो तरी ज्याच्याकडे आपण जाणार आहोत तो आपल्यावर खूप प्रेम करतो. आपण त्याच्यासोबत आयुष्यभर सुखाने राहू शकतो. पण काय होत? जेव्हा ती त्याच्याकडे जाते तेव्हा तो तिला आल्यापावली तसच परत पाठवून देतो. ती परत परत त्याच्याकडे जाते तरीही तो तिला दाद देत नाही. घरातून पळून गेलेली असते त्यामुळे परत घरी जाऊ शकत नाही. ज्याच्यासाठी गेलेली असते तोदेखील तिला स्वीकारत नाही. यावेळी सुरवातीच्या गीत मध्ये जो बदल होऊन जातो तो करीना कपूरने खूप सुंदररित्या वठवला आहे. ती हसणच विसरून जाते. ती जगायचं म्हणून जगू लागते. त्यात आनंद कुठेच नसतो जो पूर्वीच्या गीतमध्ये असतो.
चुकीची माणसं, किंवा अश्या माणसांकडून जेव्हा असे अनुभव येतात तेव्हा अश्या प्रकारे प्रभाव पडतो. आता आपल्या आयुष्यात आलेली सर्वच माणसं काही अस वागत नाहीत. पण चांगले तसे वाईट अनुभव देखील येतात जे आपल्याला खूप काही शिकवून जातात. त्यातून आपण शिकणं गरजेचं आहे. बरेचदा आपण भावनिक होतो. आपल्याला ज्यांच्याकडून त्रास मिळालेला असतो, ज्यांनी आपलं हसू घालवलेले असते त्यांच्यासाठी आपला जीव तुटत असतो. ही व्यक्ती परत आयुष्यात आली, जरा प्रेमाचे शब्द बोलली की आपण पाघळतो.
पण आपण आपल्या अनुभवातून धडा घेणं महत्त्वाचं आहे. चुका होतात, सगळ्यांकडून होतात, माफ केलं पाहिजे ही गोष्ट जरी खरी असली तरीही ज्या व्यक्तीकडून आपल्याला त्रास मिळाला आहे, आपली मनस्थिती, आपलं स्वास्थ्य ज्यातून बिघडलेले अश्या व्यक्तीसाठी आपण परत रडत बसण हे कितपत योग्य आहे याचा आपण विचार केला पाहिजे. आपण जे काही करतोय त्याचा आता आणि पुढे जाऊन काय परिणाम होणार आहे याचा विचार करून आपण ठरवलं पाहिजे की आपण कोणासाठी किती रडायचं.
एकदा ठेच लागली की आपण शहाणं झालं पाहिजे. नाहीतर मग अनुभव जे सारखे येतच असतात. आपण त्यातून काही घेत नसू तर त्या अनुभवांचा काही उपयोग नाही.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Lekh khupch chan aahe
अति सुंदर लेख
खूपच छान आहे