असं कुठलंच सुख नाही, जे आयुष्यभरासाठी आपल्याला समाधान देत राहील.
काव्या धनंजय गगनग्रास
(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
मनुष्य हा सुखी असा कधी नसतोच. कदाचित आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची सुखाची व्याख्याच बदलत असावी आणि म्हणूनच तो नवीन सुखाच्या शोधात असतो.
तर हे सुख म्हणजे नेमके काय? आनंद, समाधान, कृतज्ञता, तृप्ती. एक सकारात्मक जाणीव. आता हे सुख प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकत. कोणाचं सुख दुसऱ्यांना मदत करण्यात असेल, कोणाचं सुख पैश्यात असेल, कोणाला संसारात सुख मिळत असेल तर कोण एकटं राहून देखील सुखी होतो. म्हणजेच काय तर सुख हे व्यक्तीनुसार, त्याच्या स्वभावानुसार बदलत जात. पण आता ज्यात आपण सुखी आहोत तेच आपल्याला आयुष्यभर समाधान देऊ शकत का? पुढील गोष्टीतून हे लक्षात येईल.
प्रदीप सर्व सामान्य कुटुंबात वाढलेला. घरात फार काही सुबत्ता नाही. पण सर्व एकत्र होते. एकमेकांसोबत होते. त्याच्या लहानपणी त्यांनी सर्वांनी एकत्र राहण, चांगल्या वाईट प्रसंगात एकमेकांना साथ देणं, अगदी छोट्या छोट्या गोष्टी जसे की आईने जास्त खेळायला देणं, खाऊला पैसे देणं, सणाला नवीन कपडे, खेळणी य सर्व गोष्टी सुख देणाऱ्या होत्या.
तो शिक्षण घेत जसा जसा मोठा होत गेला तेव्हा मित्रांमध्ये जास्तवेळ रमण, पिक्चरला जाणं, परीक्षेत नंबर येणं, शिक्षकांनी कौतुक करणं या सर्व गोष्टी त्याला समाधान देऊ लागल्या. तो अभ्यासात हुशार होता. त्यातून त्याला चांगल्या ठिकाणी अजून शिकायची संधी मिळाली. ज्याचा उपयोग त्याला नोकरी मिळवण्यासाठी झाला. शिक्षण झाल्याबरोबर त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. आता इथे परत त्याच सुख बदललं. आता त्याला आपल्या पगारातून आई बाबांना मदत करणं, त्यांना फिरायला घेऊन जाणं, आपल्या आवडी निवडी पूर्ण करणं, तसच एखादे वेळी गरजू माणसाला मदत करण आवडू लागलं. काही वर्षांनी लग्न झाल.
प्रदीपची आता कामाच्या ठिकाणी देखील बढती झाली होती. त्यामुळे पगार चांगला होता. प्रदीपने लहानपणी अगदीच गरिबी पहिली नसली तरी फार संपन्नतापण पाहिली नव्हती. त्यामुळे आता आपल्याला जितकं काम करता येईल तितकं करून घरी जास्त सुबत्ता कशी आणता येईल, जास्तीत जास्त पैसा कसा कमावत येईल यावर तो विचार करू लागला. त्याने तसे कष्टही घेतले. पण हे सर्व करताना त्याला अनेकदा घरातल्या लोकांना, बायको तसेच मुलांना वेळ देता येत नसे. तो मुद्दाम करत होता असे नाही.
पण यावेळी त्याला पैसा कमावून आपण जास्त सुखी समाधानी जीवन जगू शकतो अस वाटत होत. त्यासाठी तो हा खटाटोप करत असे. कधी कोणी तक्रार केली तर त्याच म्हणणं असे, मी हे माझ्या एकट्यासाठी करत नाही. आपल्या सर्वांच्या सुखासाठी करत आहे. अशाप्रकारे अनेक वर्ष उलटली. त्याने खूप पैसा कमावला. सर्वजण तोही सुखी होते. पण आता मुल मोठी झाली. त्यांच्या शिक्षणाच्या, कामाच्या निमित्ताने ती बाहेर निघून गेली. प्रदीप पण आता निवृत्त झाला होता. घरात तो आणि बायको. तीनेदेखील अनेक वर्ष घरात एकटी त्यामुळे काही छंद जोपासले होते. त्या निमित्ताने बाहेर जाणे, भिशी या सर्व गोष्टी ती करायची. त्यामुळे आता प्रदीप घरात एकटाच झाला.
दिवसभराचा एकच रूटीन. आता हातात पैसा होता. सुबत्ता होती. घरातली सर्व जण सुखी होती. खुश होती. काही वर्षांपूर्वी किंबहुना काही दिवसांपर्यंत प्रदीप ला ही या सर्व गोष्टीच सुख देत होत्या. पण आता निवृत्त झाल्यापासून यातून त्याला सुख मिळेनास झालं. कारण त्याला आता स्वतःच्या माणसांची, त्यांच्यासोबत वेळ घालविण्याची ओढ लागली होती. त्यात त्याला खर सुख जाणवत होत. उमेदीच्या काळात त्याने खूप काम केले, त्यात त्याला घरातली लोकांसोबत फार वेळ घालवता आला नाही, त्यांच्या आनंदात फारसं कधी सामील होता आलं नाही आणि त्यावेळी त्याचं त्याला काही वाटलं देखील नाही.
कारण त्याचं सुखच त्यावेळी वेगळ्या गोष्टींमध्ये होत. पण आता अस नव्हत. आता त्याला जास्त करून आपल्या माणसांमध्ये सुख जास्त जाणवू लागलं. त्यांच्यासोबत राहणं, गप्पागोष्टी करण, मन मोकळं करण, फिरायला जाणं जास्त सुख देईल असं वाटलं. म्हणून तो काही दिवस मुलांकडे जाऊन राहू लागला. तसेच बायकोसोबत फिरायला जाणे, घरी गप्पा गोष्टी करणे, आपल्या जुन्या मित्र मंडळीना घरी बोलवू लागला. अर्थात या ही गोष्टी आता त्याला सुखाच्या वाटत असल्या तरी अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्याही बदलू शकल्या असत्या. पण आता तरी याच गोष्टी त्याला सुख देत होत्या.
काय समजत या गोष्टीतून? हेच की कोणतीही एकच गोष्ट माणसाला आयुष्यभर सुख देऊ शकत नाही. आता आपल्याला ज्या गोष्टी सुखी करत असतील, आनंद समाधान देत असतील गरजेचं नाही त्या गोष्टी शेवटपर्यंत राहतील. वयानुसार, अनुभवानुसार, परिस्थितीनुसार आपलं सुख बदलत जात. त्यानुसार आपण काही ना काही करत राहतो. ते सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. आता या नवीन सुख मिळवण्यात प्रगती पण असू शकते.
कारण जर आपण एकाच गोष्टी सुखी राहायला लागलो तर नवीन काहीतरी करण्यासाठी धडपडणार नाही, प्रयत्न करणार नाही. तसच यातून नुकसान पण होऊ शकत ते कस? तर आताच्या सुखाकडे डोळेझाक करून नवीन सुख शोधणे. म्हणून असं न करता दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन राखता आले पाहिजे. जरी आपल आत्ताच सुख कायमस्वरूपी टिकणार नसेल तरी त्याचा आनंद घेत घेत नवीन सुख शोधले पाहिजे. ते जीवन खर सुखी होईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
