Skip to content

या तीन प्रसंगात तुम्ही अहंकार दाखवला नाही तर तुम्ही प्रचंड दडपणाखाली येऊ शकता.

या तीन प्रसंगात तुम्ही अहंकार दाखवला नाही तर तुम्ही प्रचंड दडपणाखाली येऊ शकता.


अपर्णा कुलकर्णी


मधुराच्या लग्नाला पाच वर्षे उलटून गेली होती. मधुराचे माहेर अत्यंत गरीब तर सासर खूप श्रीमंत होते. मधुरा दिसायला अत्यंत देखणी आणि तितकीच हुशार शिवाय सर्वगुणसंपन्न होती. तिच्या माहेरच्या गरिबीमुळे तिच्या बाबांनी तिला फार न शिकवता बारावी झाली की लग्न करून टाकले. त्यात तिचे सौंदर्य पाहून आलेले श्रीमंत स्थळ कोणता बाप नाकारेल ??

आपल्या मुलीला आयुष्यभर काहीही कमी पडणार नाही आणि ती सुखी राहील असा विचार करून तिच्या बाबांनी तिचे लग्न लावून दिले होते. मधुराला चार बहिणी. त्यात मधुरा दोन नंबरची. मोठ्या बहिणीचे सासरी परिस्थिती मुळे झालेले हाल सगळ्यांनी पाहिले आणि चांगली परिस्थिती पाहून लग्न करून दिले.

महेश एक उत्तम व्यवसायिक होता. व्यापार क्षेत्रात त्याची मोठी वचक होती, त्याच्या शब्दाला मान होता. शिवाय दिसायला ही खूप देखणा आणि मधुराला साजेसा होता महेश. लग्न झाले आणि मधुराच्या पावलांनी खरंच लक्ष्मी महेशच्या घरी धावून आली. त्याच वेळी महेशला व्यवसायात खूप नफा झाला आणि त्याचे नाव प्रसिध्दीस आले. त्यातच वर्षभरात मधुराने त्यांच्या घराण्याला वारस दिला होता त्यामुळे सगळेच उत्तम चालू होते.

पण महेशला मधुराचे असे साधे सिंपल रहाणे आवडत नसे. त्याच्या मानाने मधुरा कमी शिकलेली तर हा उच्चशिक्षित असल्याने त्याच्या वागण्यात एक वेगळाच माज असे नेहमी. तर मधुरा मात्र साधी राहणी उच्च विचारसरणी या विचारांची होती. त्यात तिची सासू आणि जाऊ तिला सतत तिच्या माहेरच्या गरिबीमुळे आणि तिच्या कमी शिकण्यावरून तिला तुच्छ लेखत असत. त्यातच मधुराच्या लहान बहिणीचा घटस्फोट झाला असल्याने ती माहेरीच होती त्याचेही टोमणे मधुराला ऐकून घ्यावे लागत होते. पण तिचा नवरा सतत दारू पिऊन मारहाण करत होता तर ती तर काय करणार त्याला पण मधुरा काहीच बोलून फायदा होणार नाही हे लक्षात घेऊन गप्प रहात होती.

एकदा मधुरा आणि तिची जाऊ किचनमध्ये काम करत होते. तिची जाऊ सासूला चहा देण्यासाठी हॉलमध्ये गेली, मधुरा सगळ्यांसाठी चहा ओतत होती तेवढ्यात तिच्या जावेची मुलगी मधुराला येऊन बिलगली आणि तिच्या धक्क्याने मधुराकडून गरम चहा मुलीच्या अंगावर सांडला आणि तिला भाजले. तेवढ्यात जाऊ आणि सासू तिथे आल्या आणि मधुराचे काहीच ऐकून न घेता तिला वाट्टेल तसे बोलल्या. मधुराची काहीच चूक नसताना तिला खूप ऐकून घ्यावे लागले.

मधुराने तिच्या सासूची खोली आवरायला घेतली होती. त्यांचे काही दागिने त्यांनी कपाटातून काढून बेडवर ठेवले होते. मधुराने सगळेच दागिने पुन्हा होते तसे कपाटात नीट ठेवून दिले रूम झाडून घेतली आणि कपडे आवरून ठेवले आणि ती आराम करायला तिच्या खोलीत आली. महेश आज सुट्टीमुळे घरीच होता. दोघेही खोलीत आराम करत होते तेवढ्यात सासुच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून दोघेही तिथे गेले तर सासूची अंगठी हरवल्याचे मधुराला समजले.

तेंव्हा ती म्हणाली, मी तर सगळे दागिने नीट उचलून ठेवले होते कपाटात पण घरात तिचे कोणी ऐकून घेतले तर खर ना ?? सगळ्यांनी पुन्हा तिला खूप काही ऐकवले आणि तिच्या जावेने तर तिच्यावरच अंगठी चोरल्याचा आरोप केला. तेंव्हा मात्र मधुरा खूप दुखावली गेली निदान आता तरी नवरा तिची बाजू घेऊन काहीतरी बोलेल असे वाटले पण तसे काहीच झाले नाही. थोड्या वेळात सासरे आले आणि त्यांनी सगळा प्रकार ऐकून घेतल्यावर ते म्हणाले, प्रमिला मी तुला सकाळीच जाताना सांगून गेलो होतो तू काढलेल्या दगिन्यातील अंगठी मी घेऊन जात आहे सोनाराकडे आणि तू हो पण म्हणाली होतीस मग सूनबाईवर आरोप का केलेस ??

तेंव्हा सासूबाई म्हणाल्या, अग बाई खरंच मी विसरूनच गेले. नाहीतर मी कशाला तिला बोलले असते ?? हे ऐकून जाऊ खाली मान घालून निघून गेली खरी पण मधुराच्या स्वाभिमानी मनावर खूप घाव बसले. मधुरा गरिबीत वाढली होती खरी पण ती खूप प्रमाणिक आणि स्वाभिमानी होती. इतक्या वर्षांच्या स्वभावाला ओळखून तरी निदान नवऱ्याने चार शब्द तिच्या बाजूने बोलावे हे अपेक्षित होते तिला पण तसे झाले नाही.

बरेच दिवस निघून गेले. एकदा सगळ्या व्यापाऱ्यांची पार्टी होणार होती. त्यात सगळे लोक आपल्या बायकोला घेऊन येणार असल्याने महेशने ही मधुराला घेऊन जायचे ठरवले. तसे त्याने मधुराला सांगितले पण त्याला मधुरा मॉडर्न लूक मध्ये पार्टीत यायला हवी होती पण मधुराला मात्र छान साडी नेसूनाच जायचे होते. पण ऐकेल तो महेश कसला, त्याने सरळ मधुराला सांगितले हा माझ्या अब्रचा प्रश्न आहे. मला तिथे तुझ्यामुळे मान खाली गेलेली चालणार नाही. सगळ्यांच्या बायका छान तयार होऊन येतील आणि तू मात्र गौंधळ बाई सारखी साडी नेसून येणार. ते काही मला चालणार नाही. मी तुला सांगतोय तेच कर तू हेच मॉडर्न कपडे घाल आणि ये. मला उगाच जबरदस्ती करायला लावू नको. ती आहे तशी नवऱ्याने तिला स्वीकारावे अशी तिची अपेक्षा पण शेवटी त्याचा भंग झाला आणि रडत रडत नाईलाजाने मधुरा तयार होऊन पार्टीला गेली.

पण गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांचा मानसिक ताण मधुराच्या मनावर आला आणि त्यामुळे ती आजारी पडली. खरतर तिला कोणतेच शारीरिक दुखणे नव्हते पण मानसिक आधार न मिळाल्यामुळे, समजून घेणार कोणी नसल्याने तिला एकाकी वाटू लागले आणि ती शांत पडून राहू लागली. बरेच डॉक्टर केल्यावर एका कौन्सेलरने तिला बोलते केले आणि तिची तगमग थांबली. डॉक्टरांनी तिची केस व्यवस्थित महेशला समजून सांगितली आणि महेशला त्याचे गांभीर्य समजले. त्याने तिची नाजूक स्थिती घरच्यांना सांगितली आणि सगळ्यांनी मिळून तिची व्यवस्थित काळजी घेतली.

मित्रांनो आपल्याकडे समाज कितीही सुधारला असला, जग प्रगती करत असले, एकविसावे शतक सुरू असले तरीही आजही पुरुषप्रधान संस्कृतीच आहे. तो पगडा काही अजून संपला नाही. बायकांची फरफट अजून संपली नाहीच हे खेदाने सांगावे लागते. या कथेतील मधुरा गरीब घराण्यातील होती, कमी शिकलेली होती. चार मुली असलेल्या बापाने चांगले स्थळ बघून लग्न तर लावून दिले पण ते निभावताना मधुरची मात्र तारांबळ उडाली. त्यात एक बहिण कायमची माहेरी निघून आल्यामुळे आधीच टेन्शन मध्ये असलेल्या आई बाबांना अजून का टेन्शन द्यायचे यामुळे शिवाय कमी शिक्षणामुळे अडकून पडलेली मधुरा गप्प बसून राहिली.

पण चूक नसताना ही उगाच ऐकून घ्यावे लागल्या मुळे, चोरीचे आळ आल्यामुळे स्वाभिमान दुखावला गेलेल्या आणि त्यात मनाविरुद्ध नवऱ्याला हवे म्हणून स्वतःच्या राहणीमानात बदल करावा लागल्यामुळे मनाविरुद्ध अनेक गोष्टी तिला सहन कराव्या लागल्या. त्यात बोलण्याची सोय नव्हती म्हणून मनाची घुसमट वाढली आणि कुढत राहून दडपण खाली गेली मधुरा. इतकी की तिला बोलण्यासाठी कौन्सेलर ची गरज पडली आणि तिथे तिची घुसमट बाहेर पडली.

हे का झाले, कारण मधुराला बोलण्यासाठी जागाच नव्हती. या परिस्थितीतून बाहेर पडता येत नव्हते. सगळ्यात महत्त्वाचं तिच्यावर तिच्या स्वाभिमानावर झालेले आघात तिने न बोलता सहन केले कारण तिचा नाईलाज होता आणि त्यामुळेच तिला दडपण आले. त्यामुळे जेंव्हा तुमचा स्वाभिमान दुखवला जाईल, तुमच्या अस्तित्वावर प्रश्न उभे केले जातील, मनाविरुद्ध वागण्यास भाग पाडले जाईल तेंव्हा तुमच्यातला अहंकार जागा करा आणि बोलून मोकळे व्हा. अन्याय सहन करत बसू नका नाहीतर दडपणाखाली जल.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!