Skip to content

अचानक शांत झालेली व्यक्ती तुमच्या आजूबाजूस असल्यास हे प्राथमिक उपाय करून पहा.

अचानक शांत झालेली व्यक्ती तुमच्या आजूबाजूस असल्यास हे प्राथमिक उपाय करून पहा.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“Silence speak louder than words” असं म्हटल जात. म्हणजेच काय तर शांततेचा आवाज हा शब्दांहुन कितीतरी पटीने मोठा असतो, तिची शक्ती खूप मोठी असते. शांततेमध्ये खूप रहस्य दडलेली असतात. वरून सर्व साधं सोपं वाटत असल तरी ते तस नसत. एरवी खवळणारा समुद्र अनेकदा शांत भासतो, इथे आपण आपल्याला तो समजला अस म्हटल तर ती चूक ठरू शकते. कारण त्याच्या आत इतकी गूढता असते की त्याचा आपल्याला थांगपत्ता लागणार नाही. वरकरणी असणारी शांतता कदाचित आतल्या खळबळीला दाबून टाकणारी असेल, लपवणारी असेल.

काहीही असलं तरी मौनाला, शांततेला त्याच अस एक शब्दरूप असतच. जे उलगडण एकप्रकारे आव्हान असत. कारण बोलल्या गेलेल्या शब्दांचा, केलेल्या कृतीचा काहीतरी अंदाज लावता येतो, पण प्रत्यक्ष काही दिसत नाही तरी त्यामागे असलेल्या गोष्टींचा कसा ठाव घेणार? म्हणूनच जेव्हा वाद होतात, भांडण होतात एखादी व्यक्ती गप्प होते, अबोला धरते तेव्हा हा अबोला, ही शांतता दुसऱ्या व्यक्तीला बेचैन करणारी असते.

नवरा बायकोमध्ये अनेकदा अस पाहायला मिळत. त्यांच्यामध्ये वाद झाले की अनेकदा अस चित्र दिसत बायको बोलायची बंद होते. काय असते तेव्हा नवऱ्याच बोलण, तू भांडं, ओरड पण अशी शांत बसू नको. या शांततेने मला अधिक त्रास होतो. का? कारण त्यावेळी त्या बायकोच्या मनात काय चालू आहे हेच समजत नसत. तिला काय वाटत आहे याचा अंदाज लागत नसतो. कोणत्या भावना तिला जाणवत आहे हे लक्षात येतं नसत. बोलण्याने निदान गोष्टी तिथल्या तिथे मोकळ्या होतात. इथे ते होत नाही.

जेव्हा एखादी व्यक्ती विशेषतः चांगली बोलणारी सर्वामध्ये वावरणारी असते तेव्हा तिचं ते शांत बसणं लगेच नजरेत येत. कारण नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं झालेले आहे याची जाणीव होते. आणि त्या व्यक्तीच्या शांततेने बाकीच्यांना अनेकदा तिच्या जवळच्या व्यक्तींना त्रास होतो. कारण आधी म्हटल तस आपण बोलतो तेव्हा आपल्याला काय वाटत, आपण की सांगायचा प्रयत्न करत आहोत हे समोरच्या व्यक्तीला समजत तरी. पण अचानक शांत झाल्यावर कसं कळणार की नेमक झालय काय?

कारण व्यक्ती फक्त दुःखात शांत बसते अस नाही, तिथे आनंद पण असू शकतो, कसल्यातरी आठवणीने भरून येणं असू शकत, अशी काही गोष्ट असेल की शब्दात सांगता येणं जमत नसत. काहीही कारण असू शकतात. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती शांत होते तेव्हा तिला त्यातून बाहेर काढण, त्याची कारण शोधणे एक प्रकारे आव्हान होऊन जात.

आपल्या रोजच्या भेटीत असणारी व्यक्ती जरी अशी शांत झाली असेल तरी आपल्याला प्रश्न पडतो की अस कस काय? नेहमी इतकी बडबड करणारी व्यक्ती अचानक कशी शांत झाली? काय झालं असेल? साहजिक आहे याची उत्तरं पटकन सरळसोट मिळणं तर शक्य नसत. त्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला लागतातच. काही उपाय करायला लागतात. जर तुमच्या आजूबाजूला अशी कोणी व्यक्ती असेल जी अचानक शांत झाली आहे अस वाटतयं तर हे प्राथमिक उपाय करून पहा.

१. बऱ्याचदा अस होत की एखादी व्यक्ती अचानक शांत झाली तर आपण बेधडक प्रश्नांचा मारा सुरू करतो, काय झालं तु बोलतच का नाहीस? गप्पच का आहेस?बोल बोल अस केल जात. यातून ती व्यक्ती बोलत तर नाहीच उलट अजून त्रासते. आपल्याला कारण पाहिजे असत तेही मिळत नाही आणि आपण त्या माणसाचा त्रास अजून वाढवतो.

म्हणून अस न करता सरळ सरळ असले प्रश्न न विचारता फक्त त्यांच्या शेजारी जाऊन बसा, जरा इकडच्या तिकडच्या हलक्या फुलक्या गप्पा मारा, आपल्याला जरी माहीत असल की ती शांत झाली आहे तरी ते आपल्या वागण्यातून, सरळसोट बोलण्यातून जाणवून द्यायची काही गरज नसते. त्या माणसाला जरा नॉर्मल स्टेटला आणायचा प्रयत्न करा. जेव्हा ती जरा बोलेल, तिला मोकळं वाटेल तेव्हा कदाचित तिच्या मनातल ती सांगायची शक्यता असते.

२. खेळ, वेगेवगळ्या ॲक्टिव्हीटीस हे एक उत्तम माध्यम आहे माणसाच्या मनातल्या गोष्टी ओळखायचं. त्यांचा अंदाज लावयच. तोंडाने न बोललेल्या गोष्टी यातून बाहेर पडतात. त्यामुळे अश्या गोष्टींमध्ये त्या माणसाला सामाविष्ट करून घ्या. काहीतरी लिहिण असेल, रेखाटन असेल अशी कोणतीही गोष्ट जी तिला व्यक्त व्हायला मदत करते ती करायला देणे. आणि हे करताना मुद्दाम तिला बोलत करण्यासाठी, त्याची कारण शोधण्यासाठी हे केल जात हे कुठेही भासू द्यायचं नाही. लहान मूल पडत म्हणून कधी रडत नाही, तर आपल्याला पडलेलं कोणीतरी पाहिलं, त्यांना ते समजलं याची जाणीव होते जेव्हा रडत. त्यामुळे त्याला ती जाणीव न देता त्यातून बाहेर काढायचं असेल तर आपल्याला ही त्यावेळी शांत राहाव लागत.

३. मित्र, मैत्रिणीशी संपर्क करा. अस होत की अनेकदा माणूस घरातल्या माणसांना ज्या गोष्टी सांगत नाही त्या मित्र मैत्रिणींना सांगतो. कारण ते वय एक असत, समजूत घेण्याची दृष्टी एकसारखी असते. त्यामुळे आपलं मुल अस झाल असेल, जी कोण व्यक्ती अश्या अवस्थेत आहे तिच्या या फ्रेंड सर्कलला भेटणे. त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत असतात. त्यातून आपल्याला बरीच माहिती मिळू शकते.

४. सोशल मीडिया अकाऊंट, त्यावरच्या पोस्ट तपासणे. आताचा काळ हा पूर्वीसारखा राहिला नाही. आधी जिथे काहीही झालं तरी मन आई बाबांजवळ मोकळं केलं जायचं, घरातल्या इतर सदस्यांना सांगितल जायचं तिथे या सर्व गोष्टी आता सोशल मीडिया अकाऊंट वर टाकल्या जातात. तसच अचानक अस्वस्थ होण्याची कारणही यात दडलेली असू शकतात. काहीतरी पोस्ट टाकली तर त्यावर ट्रोलिंगच प्रमाण हल्ली खूप वाढलं आहे. या सर्व गोष्टी एखाद्याचा मनावर खूप परिणाम करू शकतात.

५. त्या व्यक्तीला वेगळ्या वातावरणात घेऊन जाणे. वातावरणात केलेला बदल खूप मोठा प्रभाव पाडू शकतो. त्यामुळे अश्या व्यक्तीला दुसरीकडे घेऊन जाणं, मोकळ्या वातावरणात फिरणं, निसर्गात फिरणं फायदेशीर ठरू शकत. असे काही उपाय आपण सुरुवातीला करू शकतो. पण इतकं करूनही ती व्यक्ती प्रतिसाद देत नसेल, तर इथे तज्ञ माणसाची मदत घेणंच योग्य ठरतं. कारण अश्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या नाहीत तर पुढे अनेक समस्यांना तोंड द्यायला लागू शकत. डिप्रेशन, चिंता, मनावर झालेला एखादा आघात यासारख्या मानसिक आजारांची, त्रासाची सुरुवात ही अशी असू शकते. त्यामुळे दुर्लक्ष करून चालत नाही. वेळीच त्यावर काहीतरी पाऊल उचललं गेलं पाहिजे.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!