Skip to content

“आव्हानं त्यांच्या समोरच झुकतात, जे परिस्थिती समोर झुकत नाहीत..”

“आव्हानं त्यांच्या समोरच झुकतात, जे परिस्थिती समोर झुकत नाहीत..”


मधुश्री देशपांडे गानू


“जिंदगी कैसी है पहेली, हाय..

कभी तो हंसाये, कभी ये रुलाये…”

हे आयुष्य खरंच एक कोडं आहे. आपण जीव तोडून ते सोडवायचा प्रयत्न करत असतो. कधी वाटतं सुटलंय, तर कधी अधिकच क्लिष्ट होतं. सुख आणि दुःख हे तर आयुष्याचं “part & parcel of life “आहे. ऊन सावलीचा खेळ सारा.

सुखदुःखाच्या प्रसंगांना, आयुष्यात अकस्मात येणाऱ्या आव्हानांना सामोरं जावंच लागतं. यातून कोणाचीही सुटका नाही. हे अनुभव घेतच पुढे जायचं असतं. अनुभवांमधून आपण काय शिकतो, माणूस म्हणून किती प्रगल्भ होतो की कायमस्वरूपी कोसळतो हे जास्त महत्त्वाचे आहे.

प्रत्येक व्यक्तीची एक विचार प्रक्रिया, समजुती असतात. त्या व्यक्तिसापेक्ष असतात. आपल्याकडे गंमतीत एखाद्या व्यक्तीने एखादं वाक्य उच्चारलं तरीही, त्याचा संबंध त्या व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाशी, जीवनाशी लावण्याचा गैरसमज करून घेणारा समाज जास्त आहे.

स्वतःची कुवत, लायकी न ओळखता सहज कोणालाही नावं ठेवणं, काळा चष्मा घालून  व्यक्तीकडे बघणं आपल्याकडे होत असतं. प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा जीवनप्रवास, स्वतःचे अनुभव, स्वतःची सुखंदुःखं, त्यानुसार स्वभाव असतो. पण समाज त्याकडे स्वतःची फुटपट्टी लावून पाहतो. अर्थात लोक काय म्हणतील?? किंवा म्हणतात?? असं काही अस्तित्वातच नसतं म्हणा..

अचानक, अकस्मात समोर येणार्‍या दुःखद घटना, प्रसंग आणि त्यामुळे निर्माण होणारी सामाजिक, आर्थिक, मानसिक-शारीरिक आव्हानं, जीवन जगण्यासाठीचा संघर्ष यामुळे कोणीही खचून जाऊ शकतो. प्रिय व्यक्तीचा मृत्यू आणि त्याचा कायमचा वियोग ही गोष्ट तर सहनशक्तीच्या पलीकडे असते. तरीही त्यातून बाहेर पडून माणसं वास्तवाचा स्वीकार करून नव्याने आयुष्य जगतात ना!

प्रत्येक व्यक्ती समान विचार पातळीची नसते. जे सारासार विचार करू शकतात, ज्यांची विवेकबुद्धी जागरूक आहे आणि सत्सद्विवेक बुद्धीचा योग्य वापर करून ते त्या आव्हानांचा सकारात्मकतेने आणि वास्तववादी कृतीने सामना करतात. पण मानसिक दृष्ट्या कमजोर व्यक्ती मात्र कठीण प्रसंगांचा सामना करताना परिस्थितीला शरण जातात.

आणि आयुष्यभराचे नुकसान करून घेतात. शरीर मनाने तिथेच अडकून राहतात. अधिकाधिक निराश, उदास होतात. अनेक शारीरिक, मानसिक आजारांना बळी पडतात. आप्तस्वकीयांचं आयुष्यही कठीण बनवतात.

ज्या व्यक्ती जीवनातील कठीणातील कठीण प्रसंगांना समर्थपणे तोंड देतात, धीराने त्याचा सामना करतात त्याच व्यक्ती आयुष्यात सर्वार्थाने यशस्वी होतात. यशस्वी होणे म्हणजे फक्त पैसा कमावणे नव्हे.. तर स्वतःच्या मनातील दुबळेपणावर मात करून वास्तवाचा, परिस्थितीचा स्वीकार करून आपल्या जीवनाचा योग्य मार्ग शोधणे आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे म्हणजे यशस्वी होणे.

आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. पण  एका जागी साचलेले गढूळ डबकं व्हायचं की प्रसन्न, खळखळणारी, आजूबाजूची जमीन सुपीक करणारी नदी व्हायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. दुःखद घटनांनी आपण दुःखी, हताश होणारच. नकारात्मक विचार येणारच. फक्त हे दुःख किती काळ कुरवाळायचं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. ज्या व्यक्ती हे वास्तव स्वीकारून, अनुभवून पुढे जातात, नवा आनंद, स्वतःचे विश्व निर्माण करतात त्यांनाच जीवन खरंच समजलं.

आज अनेक आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक अडचणींना आपण कोविड काळात सामोरे जातोयं. पण चांगल्या पगाराची नोकरी गेल्यानंतर भाजी ची गाडी लावणारी व्यक्ती मला जास्त सक्षम वाटते. आव्हानांना सामोरे जाताना परिस्थीती समोर न झुकता, शरण जाता नवीन मार्ग शोधणे हे खरे यश.  कित्येक यशस्वी खेळाडू, उद्योगपती, कलाकार, व्यावसायिक यांनी सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष अनुभवलेला असतो. पण परिस्थिती समोर शरणागति न पत्करता त्यांनी आव्हानांचा सामना केला म्हणून आज ते एवढे यशस्वी आहेत.

खरा संघर्ष हा मानसिक असतो. सगळा तुमच्या मनोव्यापारांवर, विचार प्रक्रियेवर अवलंबून असतो. मानला तर आनंद हो!! नाहीतर दुःखं आहेतच सतत तोंड पाडून बसायला. अशा दुःखीकष्टी माणसांना दुसऱ्याचं सुख, दुसऱ्यांचा आनंदही पाहावत नाही. तुमच्या मनाची, विचारांची ताकद जर  तुम्हांला समजली, तर तुम्हीं कशाचाही समर्थपणे सामना करू शकता. जर तुम्हीं मानसिक दृष्ट्या आजारी असाल तर आव्हानांचा सामना तर सोडूनच द्या, दुसऱ्या व्यक्तीबद्दल गैरसमज, असुया, मत्सर, ईर्षा, भीती, आत्मविश्वासाचा अभाव, स्वकेंद्रित विचार आणि अहंकार या सहज लक्षात न येणाऱ्या पण भयंकर आजारांना बळी पडलेले असता.

तुमच्या मनाला वास्तवाचा स्वीकार करून, सकारात्मक विचारांची सवय लावली तर तुम्हीं येणाऱ्या कोणत्याही परिस्थिती समोर झुकत नाही. आणि नवीन आव्हानं लीलया पेलायला समर्थ असता. मग “फिनिक्स” पक्ष्यापमाणे तुम्हीं राखेतून उठून नव्याने तुमचं आयुष्य आनंदी, यशस्वी करू शकता. तुमचे स्वतःचे विश्व निर्माण करता. हे मी स्वानुभवाने सांगतेयं.

नुकताच एक व्हिडीओ पाहण्यात आला. परमेश्वर तुटलेल्या गोष्टींमधून नवीन चांगलं निर्माण करतो. ढग फाटतो तेव्हा पाऊस पडतो. जमीन दुभंगते तेव्हा त्यातून रोपटं बाहेर येतं.  बी फुटते तेव्हा त्यातून नवीन कोंब निर्माण होतात. त्याचप्रमाणे जेव्हा मनुष्य एखाद्या जीवघेण्या आघाताने संपूर्ण मनाने शरिराने हताश झालेला असतो, तेव्हाच परमेश्वर त्याला काहीतरी मोठं साकारण्याची शक्ती देतो. खूप आवडला हा विचार.

जे घडून गेलं ते वाईटच होतं, पण इथून पुढे सगळं चांगलं घडणार या विचाराने जर आपण आयुष्याला सामोरे गेलो तर खरंच आपण आपलं नवीन सुंदर विश्व निर्माण करू शकतो. हे सुंदर आयुष्य आनंदाने, भरभरून जगण्याचा प्रत्येक माणसाला पूर्ण अधिकार आहे. आणि तो प्रत्येकाने मिळवायलाच हवा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!