आयुष्यात आलेले वाईट अनुभवच आपल्याला जशाच तसे वागण्यास भाग पाडतात.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
कीर्ती नाईक, एक यशस्वी उद्योजिका. आज तिने स्वतःचा खूप मोठा कारभार उभा केला होता. खुप साऱ्या महिलांचं, मुलींचं ती एक प्रेरणास्थान बनली होती. बऱ्याच जणींना तिने रोजगार उपलब्ध करून दिला होता. ज्या महिलांना, मुलींना कष्टाची आवड आहे, ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं आहे अशांना तिचा नेहमी पाठिंबा असायचा. गेल्याच वर्षी तिने बेस्ट बिझनेस वुमन ऑफ दी इयर या किताब देखील पटकावला होता. पण जरी ती आता या यशाच्या शिखरावर असली तरी हे यश तिला काही लगेच मिळालं नव्हत. कोणालाच ते मिळत नसत. त्या मागे प्रत्येकाचा काही ना काही संघर्ष हा असतोच. एका दिवसात ठरवलं ते झालं अस कोणाच्याही बाबतीत होत नाही. या संघर्षात आपण कसे टिकून राहतो, त्यातून न थांबता पुढे कसे जात राहतो यावर ते असत.
कीर्तीचा पण असाच काहीसा संघर्ष होता. जेव्हा तिने स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा तिच्यासोबत कोण नव्हत. साधं मध्यमवर्गीय कुटुंब, चांगली नोकरी करावी आणि आपलं आयुष्य नीट जगावं अशी एक विचारसरणी. घरातल्या माणसांचा तिच्या या स्वप्नाला विरोध होता अस नाही. पण व्यवसाय म्हटल की त्यात पैसे गुंतवण आलं. स्थिर व्हायला वेळ लागतो, जम बसावा लागतो, तोपर्यंत पैसे मिळतील का? कितपत मिळतील, व्यवसाय पसरवण, टिकवण आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला लोकांचा मिळणारा प्रतिसाद. सगळ्याच गोष्टी एका माणसाने सांभाळणं तस जोखमीचे काम होत. व्यवसाय नाही चालला तर नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांची या निर्णयावर फारशी खुशी नव्हती. तरी कीर्तीने त्यांना विश्वासात घेतल, त्यांना खात्री दिली की ती सर्व सांभाळेल, तिचा स्वतःवर विश्वास होता की तिला ही गोष्ट करायला जमेल. त्यामुळे आई बाबांनी या गोष्टीला मंजुरी दिली. पण कामाचा भार तिच्यावरच होता.
तिने मार्केट स्टडी वगैरे करून माणसं, डीलर वगैरे जोडून घ्यायला सुरुवात केली. देशी सुतांपासून वेगवेगळ्या गोष्टी ज्यामध्ये कपडे, बॅग्स, दागिने या सर्व गोष्टी येतात ते करून विकणे असा तिचा व्यवसाय होता. त्या दृष्टीने ती माणसं जोडू पाहत होती. तिने काही व्यवसायाच तांत्रिक शिक्षण घेतलेले नव्हत. स्वतःची आवड आणि या गोष्टीमधला अभ्यास या जोरावर ती हे करू पाहत नाही. अनुभव नव्हताच त्यामुळे माणसांची पारख देखील नव्हती. त्यामुळे सुरुवातीला तिला खूप वेगवेगळ्या, वाईट अनुभवांना समोर जावं लागलं.
ज्या माणसांना तिने विश्वासाने स्वतःच्या व्यवसायाशी जोडलेलं होत. पण ती त्यांच्यावर जसा विश्वास ठेवत होती तशी ती माणसं नव्हती. आगाऊ पैसे घेऊन चुकीचा, नकली माल देणं, वेळेवर सामान न पाठवण यासारख्या गोष्टी तिच्यासोबत सुरुवातीला खूपदा झाल्या. बरं पैसे परत मागितले तरी ही लोक देत तर नसत वर दादागिरी वैगरे दाखवत असत.
त्याशिवाय मार्केट मध्ये सुरुवातीपासून स्थिर असणारे व्यवसाय असतातच. त्यात कीर्तीचा स्वभाव असा की ती कधी कोणाशी उलट सुलट, उद्धटपणे बोललेली नाही की तिला कसले छक्के पंजे माहीत होते. सरळ मार्गी विचार करणारी ती मुलगी होती. व्यवसाय सुरू करताना तिने फक्त एकटीचा विचार केलेला नव्हता. इतरांना देखील यातून काही ना काही मदत होईल असाच तिचा हेतू होता.
पण याउलट झालं. पैश्याच नुकसान, मालमध्ये केलेला गोंधळ या गोष्टी कुठेतरी तिच्या उत्पादनावर देखील परिणाम करत होत्या. बऱ्याच वेळा अस झालं की आपण हा व्यवसाय पुढे टिकवू शकतो का नाही अशी भीती तिच्या मनात निर्माण होऊ लागली. पण तिने शेवटी एक खूणगाठ बांधली की कसही करून आपल्याला आपला व्यवसाय चालवायचा आहे. आपण थांबायचं नाही. त्या दिवसापासून तिने स्वतः मध्ये पण हळू हळू बदल करायला सुरुवात केली.
तिला कळून चुकल होत की प्रत्येक ठिकाणी अती चांगुलपणा, नम्रपणा असून चालत नाही. व्यवसाय करायचा असेल तर चतुर असावं लागतं. माणसांची नीट पारख व्हायला लागते. त्यांना ओळखता यायला लागतं. एक जो बिझनेस माईंडसेट लागतो तो तिने स्वतःमध्ये घडवायला सुरुवात केली. कोण आपल्याशी कसं वागतयं, कोण आपल्याला फसवत, सर्व गोष्टींचा ती बारीक विचार करायला लागली. माणूस पाहून वागायला लागली. जो जसा आहे त्याच्याशी तसच वागायला लागत हे तिला आता समजलं होत.
अश्या पद्धतीने स्वतःमध्ये हळू हळू बदल घडवत, शिक्षण घेत, माणसांना ओळखत तिने स्वतःच्या व्यवसायाला तिने एक नवीन ओळख मिळवून दिली. आता तिचा यातला अनुभव इतका होता की समोरच्या माणसाला तिच्याशी बोलताना विचार करावा लागे. इतका सर्व कारभार तिने एकटीने निर्माण केला होता, सांभाळला होता आणि अजून सांभाळत होती. यात तिने प्रचंड मेहनत घेतलेली होती, पण खर शिक्षण तिला तिच्या वाईट अनुभवांनीच दिलं. त्याशिवाय तिच्यात हे बदल घडण शक्य नव्हत.
हे असे अनुभव आपल्या बाबतीत पण घडतात. व्यवसाय अस नाही तर आयुष्य जगतानाच आपल्याला अश्या प्रकारच्या अनुभवांचा सामना करावा लागतो. पण हे अनुभव आपल्याला शिकवून पण जातात. आपल्यात कोणते बदल होण आवश्यक आहे हे आपल्याला समजत. हे समजून, त्यातून काहीतरी चांगल घेऊन आपण पुढे जात असू तर त्यांचा काहीतरी उपयोग होतो. नाहीतर अनुभव हे सर्वांचेच असतात पण सर्व काही शहाणी होत नाहीत. आपल्याला शहाणं व्ह्यायच आहे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

