Skip to content

आयुष्य इथेच थांबत नाही!!!

आयुष्य इथेच थांबत नाही!!!


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आणि ती गेली, कायमची मला सोडून. तिची आकृती दिसेनाशी होईपर्यंत मी तिथेच तसाच थांबलो होतो. विश्वासच बसत नव्हता की ती मला अशी सोडून जाऊ शकते. भांडण व्हायची आमच्यामध्ये. पण ती कोणामध्ये होत नाहीत? तुमच्यातदेखील होतच असतील. हे काही कारण असू शकत नाही ना सोडून जायचं. तिला मात्र तेवढच कारण पुरेस होत. भांडणात देखील मला सारखं मी तुला एक दिवस सोडून जाईन हा! अस म्हणण्यात तिला कोण मजा यायची. एरवी पण तिची ही चेष्टा चालयचीच. ती गेल्यावर मी एकटा पडेन याची जी भीती माझ्या चेहऱ्यावर दिसायची ती पाहून तिला खूप हसू यायचं. हसत हसत मला म्हणायची, नाही रे कुठे जात मी! असा घाबरु नको. किती आधार वाटायचा त्या शब्दांचा. किती विश्वास होता त्यात.

चार चौघांसमोर आदर्श वाटावं असं काही आमचं नात नव्हतच. पण मला लोकांना आम्ही किती छान राहतो हे दाखवण्यात रस देखील नव्हता. हे आमचं दोघांचं जग होत आणि त्यातच मी सुखी होतो. समोरून पाहणारा म्हणायचा, अरे तू जितका तिला जीव लावतो तेव्हढा ती लावते का तुला? प्रेम हे दोघांकडून असावं लागत. तु एकट्याने त्यात कितीही जीव ओतलास आणि समोरून ते रीतच असेल तर त्याचा काय उपयोग? माझ्या लेखी या बोलण्याला काही किंमत नव्हती. तिचा स्वभाव होता फटकळ, रागीट. पण अस जरुरीचं नाही ना की दोघांनी तितकच प्रेमळ असल पाहिजे. कदाचित मी ज्या पद्धतीने सहज प्रेम व्यक्त करायचो तस तिला कधी जमलं नाही. पण म्हणून ती काही माझ्यावर प्रेमच करत नाही अस होत नाही. पण हे लोकांना कोण सांगणार? अगदी सुरुवाती सुरुवातीला मी तसा प्रयत्न करायचो. पण नंतर मी असल्या गोष्टी सोडून दिल्या. कारण शेवटी हे आमचं दोघांचं नातं होत. यात तिसऱ्या कोणाच्या मताला प्रवेश नव्हता.

किती गुंतलो होतो मी तिच्यामध्ये. एकप्रकारे परावलंबित्व आल होत माझ्या आयुष्याला. जेव्हापासून ती माझ्या आयुष्यात आली होती तेव्हापासून माझं आयुष्यचं तिचं झालं होत. ती थट्टेत जरी म्हणाली की सोडून जाईन तरी जीव घाबरून जायचा. कारण तिच्याशिवाय जगायची कल्पनाच सहन नव्हती.

पण आता; आता जे काही घडलं ती माझी कल्पना नव्हती. ते प्रत्यक्ष घडल होत. माझ्या डोळ्यांसमोर घडल होत. जितक्या सहज ती माझ्या आयुष्यात आली तितक्याच सहज ती निघूनही गेली. तिच्या चेहऱ्यावर मला दुःखाची, पश्चातापाची एवढीशी खुणही दिसली नाही. साहजिक आहे. मनात नसेल ते चेहऱ्यावर येईल कसं? रादर तिला तो खोटेपणा कधी आणताच आला नाही. पण माझं काय? जर हीच वस्तुस्थिती होती तर मी इतके दिवस जगत होतो ते जग कोणत होत? ते खरच होत की माझं दिवास्वप्न?

स्वतःच्या मनाला कितीही प्रश्न विचारले तरी उत्तर एकच येत होत की उर्वि मला सोडून गेली आहे. कायमची. ती परत येणार नाही. तिच्याकडे त्याची स्पष्टीकरण होती. तिला यात अडकायच नव्हत, तिचं आयुष्य पुढे न्यायचं होत. तिला आयुष्यात पुढे जायचं होत म्हणून ती गेली पण माझं आयुष्य मात्र इथेच थांबल्यासारखं झाल. तिच्याशिवाय पुढे काय करायचं हा विचार मी कधी केलाच नाही. मागे फिरता आलं नसत. पुढे जाता येत नव्हत. एका क्षणात किती काही घटना घडल्या नाही? दिसताना फक्त मी एका ठिकाणी उभा आहे अस दिसत होत. पण आतून पूर्ण उलथापालथ होत होती. डोक्याला एक प्रकारे बधिरपणा आला होता. तश्याच अवस्थेत मी कधी रूमवर आलो मला देखील समजले नाही. गेले चार वर्ष मी इथे राहत होतो. आई बाबांपासून दूर. इथे आलो आणि तेव्हाच तिची भेट झाली होती. त्यामुळे हा खोलीत देखील तिच्याच आठवणी जास्त होत्या. कित्येक दिवस आम्ही इथे गप्पा मारण्यात, एकत्र जेवण बनवण्यात, अगदी भांडणात काढले होते. एका क्षणात ते सर्व कसं पुसल जाईल?

खूप वेळ उलटून गेला होता. तरी मला मनासारखं उत्तर मिळत नव्हत. माझ्यासमोर आता मला एकच पर्याय दिसत होता. आयुष्य संपवण्याचा. कारण एकच होत. तिच्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नव्हतो. मग अस जिवंत दगड बनून राहण्यात काय अर्थ होता? त्यापेक्षा स्वतःला संपवलेल काय वाईट आहे? मनात विचार आला मात्र, यांत्रिकपणे हालचाली सुरू झाल्या. समोर पंखा होता, टेबल होते.

मी चादर घेतली, टेबल पंख्याखाली ठेवले त्यावर चढलो आणि चादर पंख्याला बांधली. फास तयार करून गळ्यात घालणारच होतो की तेवढ्यात डोळे मिटले. डोळे मिटताक्षणीच एक दृश्य डोळ्यासमोर तरळू लागलं. एक छोटा मुलगा, हसत होता. बागेत इथे तिथे धावत होता आणि आई मला पकड, मला पकड म्हणून ओरडत होता. त्याची आई पण त्याच्या मागे धावत होती. दोघही खूप हसत होती. तिथेच बाकड्यावर बसलेला एक माणूस त्यांचे फोटो काढत होता. त्याच्या चेहेऱ्यावर पण आनंद दिसत होता. अजून एक आठवण डोळ्यांसमोर आली. त्याच मुलाचा आज वाढदिवस होता. सर्व मित्र मंडळी आली होती. चिल्लर पार्टीसाठी बरच काही काही ठेवलं होत. बाबांनी आज त्याची आवडती सायकल त्याला भेट म्हणून दिली होती. स्वारी एकदम खुश होती. हातातला फास जितका तो घट्ट पकडायला पाहत होता तितकी डोळ्यांसमोर दृश्य येत होती.

आताच दृश्य अगदी अलीकडच वाटत होत. तो मुलगा आता मोठा झाला होता. कुठेतरी बाहेर चालला होता. त्याची आई त्याच्याजवळ आली व डोक्यावर हात ठेवून म्हणाली, खूप शिक, मोठा हो, आम्हला नाही जमलं, पण तू करून दाखव. आमचा विश्वास आहे तुझ्यावर. हे दृश्य दिसता क्षणीच त्याने लगेच डोळे उघडले, त्याच्या हातातला फास देखील सुटला आणि तो जवळ जवळ खाली कोसळला.

आतलं सर्व दुःख बाहेर पडलं आणि तो रडू लागला. पण हे रडू येणं फक्त ऊर्वि सोडून गेल्याचं नव्हत. डोळ्यांसमोर आता जी काही दृश्य तरळून गेली ती काल्पनिक नव्हती. त्या त्याच्या आठवणी होत्या. काही सुखद आठवणी. ज्यात त्याचे आई बाबा होते. ऊर्वी गेली म्हणून स्वतःच आयुष्य संपवायला निघालेला तो किती सहजपणे त्या दोघांना विसरला होता. त्यांच्यामुळे तो हे जग पाहू शकला. चार वर्षाचं प्रेम इतक्या वर्षाच्या प्रेमावर इतकं भारी व्हावं की त्यांचं विचारही मनात येऊ नये? त्यांना अस विसरून जाण हा एकप्रकारे स्वार्थीपणा नव्हता का? जाणीव होताक्षणीच त्याला स्वतःच्या कृत्याची लाज वाटली. त्याला दिसलेल्या आठवणी या फक्त आठवणी नव्हत्या.

या आठवणींनी त्याला खऱ्या अर्थाने आयुष्याचा अर्थ समजला. त्याला समजलं की आपण एकटे नाही. त्याला समजलं की आपलं आयुष्य थांबलेलं नाही. आपण जगावं अशी माणसं आपल्या आयुष्यात अजूनही आहेत. झाला प्रसंग आयुष्यात दुःख देऊन गेला अस जरी असल तरी तो आयुष्याला थांबवु मात्र शकला नाही. काहीतरी नव्याने समजल होत आणि हीच जाणीव त्याला मोकळेपणा देऊन गेली. आता तो कोणासाठी आपलं आयुष्य थांबवणार नव्हता. त्याला त्याच्या आयुष्यच मूल्य समजल होत.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!