Skip to content

आयुष्यात एकदा जगलेला क्षण पुन्हा त्याच पद्धतीने जगता येऊ शकतो का?

आयुष्यात एकदा जगलेला क्षण पुन्हा त्याच पद्धतीने जगता येऊ शकतो का?


मेराज बागवान


आयुष्य हे क्षणभंगुर आहे.कोणतीच गोष्ट आयुष्यात कायम नसते.एकदा गेलेला क्षण पुन्हा जशाचा तसा परत येत नाही.म्हणजेच काय, तर , काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही.तसेच एखादा क्षण आयुष्यात येण्यासाठी योग्य वेळ देखील यावी लागते.प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आणि त्या वेळेच्या आधी कोणालाच काही मिळत नाही.भूतकाळ-वर्तमानकाळ-भविष्यकाळ यामध्ये आपली ओढाताण चाललेली असते. कित्येकदा मन वर्तमानात नसतेच. एक तर ते भूतकाळा रमत असते, नाहीतर मग भविष्याचा ध्यास घेण्यासाठी आतुर झालेले असते. मग प्रश्न पडतो , आयुष्यात एकदा जगलेला क्षण पुन्हा त्याच पद्धतीने जगता येऊ शकतो का?

शाळा-कॉलेज चे दिवस सर्वांनाच खूप आवडतात.अगदी हवेहवेसे वाटतात.त्या दिवसात कोणतेच असे मोठे दडपण नसते.मित्र-मैत्रिणींच्यात खूप मौज-मजा केलेली असते. मग हे शाळा-कॉलेज संपले की हे सुखद दिवस देखील आपोआप संपतात.ते क्षण, ते दिवस पुन्हा येत नाहीत.पण मग काही वर्षांनंतर तोच कॉलेज च्या ग्रुप पुन्हा जमतो आणि पुन्हा ते दिवस नव्याने जगता येतात.पूर्वी जगलेला क्षण आणि अनेक वर्षांनंतरचा हा क्षण पूर्णपणे वेगळा असतो.काळ वेगळा असतो.पण तेच क्षण पण नव्या दिमाखात जगण्याची संधी काही जणांना मिळते.

नवीन लग्न झाल्यानंतर जोडीदारासोबत कधी तरी सुंदर चित्रपट पाहिलेला असतो. शांत ठिकाणी फक्त दोघेच बसून कित्येक तास हातात हात घेऊन ते प्रेमळ क्षण अनुभवलेले असतात.अनेक वेळा एकमेकांशी हितगुज साधलेले असते. कधी खूप भरभरून मन मोकळे केलेले असते. अश्रू देखील एकमेकांशी शेअर केलेले असतात.मग काळ लोटतो.घरातील, मुलांच्या आणि इतर सर्व जबाबदार्यामुळे हळूहळू हे सर्व क्षण काळाच्या आड जातात.वय वाढू लागते.मुले त्यांच्या त्यांच्या संसारात व्यस्त होतात.मग पुन्हा दोघेच राहतात. वय जरी वाढले असले तरी साथ मात्र कायम असते.मग त्या क्षणी पुन्हा दोघेच जण कुठे तरी फिरायला जातात.अगदी हात हातात नाही घेतले तरी शेजारी बसून निवांत क्षण पुन्हा अनुभवलेले जातात.

कधी आयुष्यात ट्रेकिंग करण्याची संधी येते.खूप ‘थ्रिलिंग’ असे अनुभव येतात.ह्या सहलीतून स्वतःची पुन्हा नव्याने ओळख होते.’ऍडवेनचर’ गोष्टी बिनधास्त पणे केल्या जातात.कायम लक्षात राहणारी अशी ती सहल होऊन जाते.अशीच सहल पुन्हा आयुष्यात होतेच असे नाही.पण तरी देखील आयुष्याच्या एका वळणावर हे सर्व अनुभव आठवून मन पुन्हा ते क्षण जगू लागते.

आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात.अनेक माणसे भेटतात.विविध क्षण पहावयास मिळतात. पण पुन्हा तोच क्षण त्याच पद्धतीने जगता येत नाही. कारण येणारी प्रत्येक परिस्थिती सारखी नसते. काळ बदलत जातो. आणि बदल मात्र हा कायम असतो. म्हणूनच आयुष्यात जे जे क्षण जगायला मिळत आहेत.ते ते सर्व क्षण त्या त्या वेळी जगून घेतले पाहिजेत.

नवीन बाईक/कार शिकणे असो, पोहणे,नवीन कला शिकणे असो.एखादे नवे शिक्षण घेणे असो, अथवा छंद जोपासणे असो.संधी मिळेल तेव्हा सर्व काही केले पाहिजे.आयुष्य जे जे आपल्या समोर आणते ते ते सर्व अनुभवण्यासाठीच असते.त्यातून आयुष्य , नियती, निसर्ग आणि विधाता आपल्याला खूप काही शिकवू पाहत असतो.आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जाण्यासाठी हे सर्व जण आपल्याला नेहमी संधी देत असतात. आणि ती संधी जगून घ्यायची की धुडकावून लावायची हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.

आपण अनेकदा आपल्या ‘कम्फर्ट झोन’ मधून बाहेर पडायला तयारच नसतो.त्यामुळे नवे काही घडतच नाही आणि आयुष्य ‘स्टक’ होऊन बसते.मग आपण आयुष्याला दोष देत बसतो.पण थोडा शांत विचार केला तर समजते की, निसर्गाला, विधात्याला आपली खूप काळजी असते, नेहमीच असते.पण आपणच तो क्षण जगण्यासाठी पुढे येत नाही.

म्हणूनच आहे तो क्षण पूर्णपणे जगता आला पाहिजे. म्हणजे आयुष्यात कोणत्या गोष्टीसाठी ‘रिग्रेट’ राहणार नाही.’अरे मी तिच्याकडे माझे प्रेम कबूल करायला हवे होते, पत्नी ला एकदा तरी आय लव यु म्हणायला हवे होते, मी एकदा तरी बाईक शिकण्याचा प्रयत्न करायला हवा होता, मी एकदा तरी ट्रेकिंग /थ्रिलिंग अनुभव घ्यायला हवा होता, एकदा तरी परिवारासोबत सहलीला जायला पाहिजे होते, एकदा तरी बिनधास्तपणे डान्स करायला हवा होता’ ,असे सगळे बोलण्याची वेळ आयुष्यात कधी स्वतःवर येऊ देऊ नका.

कारण आयुष्य एकदाच मिळते, प्रेम करणारी माणसे देखील खूप नशिबाने मिळतात, नवीन गोष्टी शिकण्याची संधी देखील खूप दुर्मिळपणे मिळते, एखादे विश्वासू, निस्सिम प्रेम करणारे, कायम काळजी घेणारे नाते देखील क्वचितच लाभते.आणि म्हणूनच आयुष्यात एकदा जगलेला क्षण पुन्हा त्याच पद्धतीने जगता येईलच याची शाश्वती नसते.

आयुष्य म्हणजे आश्चर्यचकित करणारा प्रवास आहे.म्हणूनच येणारा प्रत्येक क्षण भरभरून जगून घ्या, वर्तमानात पूर्णपणे मिसळून जा. कारण हा क्षण पुन्हा येणे नाही.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!