Skip to content

आवडत नसलेली गोष्ट आवडून घेण्याची वेळ आल्यास कशी सुरुवात करावी?

आवडत नसलेली गोष्ट आवडून घेण्याची वेळ आल्यास कशी सुरुवात करावी?


मेराज बागवान


आपल्याला अनेक गोष्टी मनापासून आवडतात.मग त्या आवडीमध्ये कोणी व्यक्ती असू शकते, एखादि वस्तू असू शकते, किंवा एखादे करिअर.मग आवडत असलेल्या गोष्टीसाठी आपण काहीही करतो.ती गोष्ट मिळविण्यासाठी मनापासून प्रयत्न देखील करतो.त्यासाठी खूप कष्ट करतो.पण इतके करूनही ती गोष्ट आपल्याला मिळत नाही.आणि मग त्या बदल्यात दुसरी न आवडणारी गोष्ट आपल्या पदरी येऊन पडते.याला नशीब म्हणा हवे तर.मग अशा वेळी काय करायचे? ही न आवडणारी गोष्ट आवडून कशी घ्यायची?

१)स्वीकार करणे – तुम्हाला एखादे करिअर करायचे होते.पण ते तुम्ही करू नाही शकलात आणि त्यामुळे तुम्हाला दुसरे करिअर निवडावे लागले तर तुम्ही ते मनापासून स्वीकारले पाहिजे.स्वीकारण्यात खूप मोठी शक्ती असते. जर तुम्ही स्वीकार करायला शिकलात तर ती न आवडणारी गोष्ट देखील तुमहाला नक्की आवडू शकेल.

२) सकारात्मकता – तुम्हाला अमुक एका व्यक्तीशी लग्न करायचे होते.पण काही कारणास्तव ते होऊ शकले नाही.तुम्हाला आवडणारी व्यक्ती तुमची जीवनसाथी होऊ शकली नाही.पण दुसरीकडे एक अशी जीवनसाथी तुम्हाला मिळाला/मिळाली जी तुमच्यावर अतोनात प्रेम करते,कायम तुमची साथ देते.मग तुम्ही देखील त्या व्यक्तीला साथ दिली पाहिजे.अनेकदा आपण कुणावर प्रेम करतो यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करते हे फार महत्वाचे असते.आणि आपण त्या व्यक्तीचे हेच प्रेम समजून घेतले पाहिजे.मग हळू हळू ती व्यक्ती देखील आवडणारी होऊन जाईल.

३) संयम बाळगणे- काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत.अमुक एका कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाले नाही, अमुक एका कंपनीत नोकरी मिळाली नाही,म्हणून काहीच फरक पडत नाही.किंबहुना त्याहून कित्येक पटीने चांगल्या कॉलेज मध्ये,चांगल्या कंपनीत तुम्हाला संधी मिळते.मान्य आहे ते तुमच्या आवडीचे नसते.पण थोडा धीर धरला तर,मन शांत ठेवले तर ,भावना नियंत्रित केल्या तर जे मिळाले आहे ते देखील सोन्यासारखे वाटते.

४) विश्वास ठेवणे – जेव्हा आवडत नसलेली गोष्ट आवडून घेण्याची वेळ येते तेव्हा त्या गोष्टीवर विश्वास ठेवणे गरजेचे असते. जे मिळाले आहे ते आपल्या भल्याचे आहे, यातून आपले चांगलेच होणार आहे हा विश्वास कायम बाळगला पाहिजे.उगाच शंका-कुशंका न घेता जे मिळाले आहे त्यावर विश्वास ठेवावा.

५) स्वसंवाद – जेव्हा तुम्हाला न आवडणारी गोष्ट आपलीशी करायची आहे तेव्हा स्वतःशी हितगुज नक्की साधावे.जे हातातून निघून गेले त्याचा विचार सोडून द्यावा.आणि मला जे मिळाले आहे ते स्वीकारत आहे असे स्वतःला सांगावे.जे झाले ते चांगल्यासाठीच हे नेहमी स्वतःला सांगावे.ही न आवडणारी गोष्टच मला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल असे मनावर नेहमी बिंबवावे.

६) इतरांशी संवाद साधाणे – जेव्हा न आवडणारी गोष्ट पदरात पडते त्यावेळी मन सुन्न होते.कशातच मन रमत नाही.सुरवातीला सर्वांचे असेच होते.मग अशावेळी फक्त त्याच विचारात न राहता, नैराश्यात जाण्याआधी जवळच्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद साधावा.तुम्हाला जे काही वाटते ते त्या व्यक्तीकडे व्यक्त व्हावे.यामुळे मनातील घालमेल दूर होते.एक नवी दिशा मिळते. ही जवळची व्यक्ती कोणीही असू शकते.फक्त तुम्ही व्यक्त होणे मात्र गरजेचे असते.

अशा काही वरील गोष्टींसह आपण एक नवी सुरवात नक्की करू शकतो.अनेकदा होते काय, आवडणारे मिळाले नाही की कधी नशिबाला तर कधी इतरांना दोष दिला जातो.चिडचिड,नैराश्य, ताण यांसारख्या मानसिक समस्या निर्माण होतात. आणि जे मिळाले नाही त्याच त्याच गोष्टीचा विचार माणूस करू लागतो जे की बरोबर नाही.

आपले सुख-दुःख आपल्याच हाती असते,ना की इतर कुणाच्या.महत्वाची ठरते ती आपली मानसिकता, दृष्टिकोन,विचारक्षमता आणि जीवनशैली.प्रत्येक आवडीची गोष्ट प्रत्येकाला मिळाली असती तर मग आयुष्याला अर्थच उरला नसता.खरे तर ,आयुष्यातील काही आवडणाऱ्या गोष्टी न मिळणेच गरजेचे असते ;आयुष्याचा समतोल साधण्यासाठी.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!