Skip to content

आतला आवाज आणि बाह्य वागणूक जेव्हा जुळत नाही, तेव्हा व्यक्ती अस्वस्थ राहते.

आतला आवाज आणि बाह्य वागणूक जेव्हा जुळत नाही, तेव्हा व्यक्ती अस्वस्थ राहते.


मेराज बागवान


आजचा लेख आपल्या सर्वांच्या खूप जवळचा आहे.प्रत्येक जण ह्या मानसिकतेतून कधी ना कधी गेलेला आहे.अनेक सिनेमे देखील ह्या विषयावर झालेले आहेत. व्यक्तिप्रमाणे हे कमी अधिक प्रमाण असते पण हे मात्र खरे आहे की , आतला आवाज आणि बाह्य वागणूक जेव्हा जुळत नाही, तेव्हा व्यक्ती अस्वस्थ राहते. हे अनेक बाबतीत होऊ शकते, होत असते.

कधी अभ्यासाच्या बाबतीत तर कधी नोकरीत, कधी करिअर मध्ये तर कधी नातेसंबंधांमध्ये.जिथे आपला आतला आवाज म्हणजेच मन एक गोष्ट कर म्हणून सांगत असते पण प्रत्यक्ष बाहेरून कृती मात्र दुसरीच होत असते.मग ह्या जुगलबंदीत काहीच योग्य रित्या साध्य होत नाही.पण एक गोष्ट हाती येते, ती म्हणजे, ‘अस्वस्थता’.आणि अशा अस्वस्थतेचे प्रमाण समाजात दिवसेंदिवस वाढत आहे.माणसे तोंडाने हे सगळे बोलू शकत नाहीत, आणि म्हणूनच आणखीन ही अस्वस्थता वाढत चालली आहे.ज्यावर थोडा विचार आणि कृती करणे गरजेचे आहे ,मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी.

आपण शालेय मुलांपासून सुरू करूयात.पालकांना वाटत असते, आपल्या मुलाने इंग्रजी माध्यमातच शिकावे.म्हणून मग इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला जातो.पुढे हळू हळू , त्या मुलाला मराठी शाळेची ओढ लागते.पण पालकांच्या आग्रहामुळे (कधी कधी दबावामुळे) तो मुलगा काही करू शकत नाही.पण आतून कायम अस्वस्थ राहत असतो.बाहेरून तो तसे दाखवू शकत नाही, पण त्याचा आतला आवाज त्याला काही वेगळेच सांगत असतो.

असेच महाविद्यालयीन युवक-युवतींच्या बाबतीत देखील होते.वडिलांची इच्छा म्हणून मुलगी , ‘विज्ञान’ शाखेत प्रवेश घेते, पण तिला रुची मात्र ‘कला’ शाखेत असते.त्यामुळे तिचे मन विज्ञान शाखेत कधीच रमत नाही आणि मनातून ती नेहमी ‘कला’ शाखेची स्वप्ने रंगवत असते.

नोकरीच्या बाबतीत देखील असे होते.शिक्षण वाणिज्य शाखेतून घेतलेले असते.पण नोकरी मात्र दुसऱ्या क्षेत्रांत मिळते.आर्थिक परिस्थितीमुळे, किंवा आणखीन काही कारणास्तव ती नोकरी नाईलाजाने का होईना करावी लागते.पण फक्त एक गरज म्हणून ती नोकरी केली जाते, पण आतील आवाजाला आवडीचे क्षेत्र खुणावत असते.

नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचे तर , कधी प्रेम असते एकावर, पण लग्न मात्र दुसऱ्याशी करावे लागते. लग्न होते देखील, पण मानसिक सुख मिळत नाही.नाईलाजास्तव एखाद्या व्यक्तीपासून कायमचे दूर जावे लागते, पण आतून पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तीची आठवण सतावत असते.एखाद्या जवळच्या मित्राशी भांडणे होतात आणि अबोला धरला जातो. मनातून तर खूप बोलायचे असते त्याच्याशी पण कृती मात्र तशी होत नाही.मग अशा व्यक्ती कायम अस्वस्थ राहते.

हे झाले काही प्रसंग किंवा घटना,ज्यामुळे व्यक्ती मनाविरुद्ध काही गोष्टी करते मात्र आतून कायम निराश, उदास राहते.ह्या व्यतिरिक्त देखील काही गोष्टी आयुष्यात अशा घडत असतात ज्यामुळे देखील व्यक्ती आतील आवाजाकडे दुर्लक्ष करीत असते आणि त्यामुळे कृती देखील मनाविरुद्ध होत असते.अशा काही गोष्टी काही कारणांमुळे प्रत्यक्षपणे जवळच्या व्यक्तींना सुद्धा बोलून दाखवता येत नाही.पण मन कायम अस्वस्थ असते.

कधी घरगुती जबाबदाऱ्यानमुळे, आर्थिक समस्यांमुळे ,तर कधी घरातील आजारपणामुळे, घरगुती कालहांमुळे आपले मन जे सांगत असते ते करता येत नाही.ह्या सर्व कारणांमुळे, समस्यांमुळे व्यक्ती कामात, जबाबदार्यामध्ये व्यस्त राहते.कामाच्या व्यापात कधी कधी ते लक्षात देखील येत नाही.पण एक क्षण येतो तेव्हा मन अस्वस्थ होऊ लागते.घरातील, जवळच्या व्यक्ती सोबत असल्या तरी देखील ही अस्वस्थता कमी होत नाही.कारण मन कुठे तरी आतल्या आवाजावर लक्ष केंद्रित करू पाहत असते, पण प्रत्यक्षात वेगळेच काही तरी होत असते.कधी त्यागाची भावना तर कधी जुळवून घेण्याचा स्वभाव यामुळे आतील आवाज नकळत दाबला जातो.पण यामुळे अशांती वाढीस लागते.


‘आतला आवाज आणि बाह्य वागणूक जुळत नाही, आणि त्यामुळे व्यक्ती अस्वस्थ राहते’, ही खरे तर झाली समस्या. आणि ही समस्या का निर्माण होते, कशी निर्माण होते, त्यामागील कारणे, त्या व्यक्तीची मानसिकता काय असू शकते हे आपण पाहिले.आता समस्या नक्की काय आहे हे लक्षात आले.पण इतक्यावरच थांबून चालणार नाही, तर ह्या समस्येवर काय उपाय करता येऊ शकतात ह्याचा देखील विचार केला पाहिजे जेणेकरून व्यक्ती अस्वस्थ राहणार नाही आणि तिचे मानसिक आरोग्य जपले जाईल.




जसे की ;
१) व्यक्त होणे
२) जवळच्या व्यक्तींशी संवाद साधणे
३) परिस्थिती स्वीकारणे
४) वास्तव स्वीकारणे
५) स्वतःवर भावनिक नियंत्रण ठेवणे
६) जास्त गरज भासल्यास समुपदेशकाची मदत घेणे
७) ध्यानधारणा
८)स्वसंवाद
९) आत्मपरीक्षण
१०) सकारात्मक दृष्टिकोन
११) स्वतः प्रयत्न करणे, पुढाकार घेणे


असे काही उपाय आपण नक्कीच करू शकतो, ज्यातून मानसिक अस्वस्थता कमी होण्यास मदत होते.जेव्हा जेव्हा तुम्हाला अशी अस्वस्थता जाणवेल तेव्हा तेव्हा तुम्ही हे उपाय करू शकता.किंबहुना केलेच पाहीजेत.कारण मानसिक आरोग्य चांगले असेल आणि ते नीट राहिले तर आणि तरच शारीरिक आरोग्य चांगले राहील आणि मगच व्यक्ती आयुष्यात काही तरी करु शकेल आणि पुढे जाऊ शकेल.

शेवटी , इंग्रजीतून एक वाक्य म्हणावेसे वाटते,

” Accept ,Say It’s okay and Move on.Then you will be fine for forever”.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आतला आवाज आणि बाह्य वागणूक जेव्हा जुळत नाही, तेव्हा व्यक्ती अस्वस्थ राहते.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!